गणित!

गर्द अरण्यात शिरताना
हंस स्वतःशीच म्हणाला,
"शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध -
शून्य, अपूर्ण की पूर्ण?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा,
अंधुक फुटलेला एक हुंदका
शून्याकडून पूर्णाकडे झेपावला...
***
पंख आवरून उतरताना
भूमीवर पाहिलं हंसानं
तेव्हा 'शून्या'तही त्याला
एक संख्या दिसली...
दिसणं, आणि असणं
या खेळाचे नियम
उमजेपर्यंत तो हरला...
उंचावत श्वेत-धवल पंख
एकाकी उड्डाण केलं तेव्हा
त्याच्याकडंच पाहात
ती संख्या म्हणाली,
"शून्य हेच तर पूर्ण!"

रचना: केव्हातरी, २००८