सिरियल किलर

काही दिवसांपूर्वी शमिता नावाच्या माझ्या मैत्रीणीचा सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमाराला फोन आला. तिच्या स्वरावरून खूप डिप्रेस वाटत होती. म्हणाली, "थोडावेळ तुझ्याकडे येऊ का गं"?. म्हटलं, "ये, त्यात विचारायचं काय? " शमिता तशी बिनधास्त मुलगी. रोखठोक बोलणं पण मनाने एकदम स्वच्छ. आज अचानक परवानगी घेऊन माझ्या घरी येण्याची हिला का गरज भासली, मला कळेचना.

अखेर आली. लेकाला सोबत घेऊन आली म्हणून मीही खूष झाले. मी दरवाजा उघडल्यावर दारातूनच मान आत घालून इकडे तिकडे पाहिलं नि मग म्हणाली, "थॅंक गॉड! " ती कशाला ’थॅंक गॉड’ म्हणाली, ते मलाही समजलं नाही पण आलीय म्हणजे बोलणार आहे, हे निश्चित होतं म्हणून मी काही प्रश्न विचारले नाहीत.

सरबताचा दुसरा घोट घेताना तिने घडाघडा बोलायला सुरूवात केली. तिने जे काही सांगितलं ते, जर म्हटलं तर काहीच नव्हतं. अगदी चेष्टेवारीसुद्धा नेता आलं असतं. म्हटलं तर खूप गंभीर होतं. महाराष्ट्र टाईम्समधील 'शंभर धागे दु:खाचे’ या लेखावरून मला त्याची कल्पना आली.

शमिता नाही, शमिताच्या सासूबाई संध्याकाळी सात वाजता टी. व्ही. वरील मालिका पाहण्यास सुरूवात करतात ते रात्री अकरा पर्यंत त्यांच्या ’बॅक टू बॅक’ मालिकांचा अत्याचार सुरूच असतो. त्यांच्या या मालिका प्रेमावर शमिता जाम म्हणजे जाम वैतागली होती.

"खरं सागते, एक वेळ त्यांनी माझा सासू म्हणून छळ केला असता, तर परवडलं असतं मला पण ह्या मालिका नकोशा वाटतात गं. " शमिताच्या चेहेऱ्यावर वैतागल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.

"तुला माहितेय, दिवसभरात कितीतरी गोष्टी विसरतात त्या पण संध्याकाळी सात वाजता त्या टि. व्ही. लावायला आजपर्यंत विसरलेल्या नाहीत. मी इकडे देवापुढे दिवा लावत असते आणि तिकडे त्यांची सिरीयल सुरू होते. इकडे मी सोहमसोबत ’शुभं करोती’ म्हणत असते आणि तिकडे हॉलमध्ये त्यांच्या कुठल्या ना कुठल्या सिरियलमध्ये काही तरी वाईट घडलेलं असतं. मग रडारड सुरू होते. दर दोन मिनिटांनी एक आलाप आळवला जातो. मला तर सिरियलमधील त्या आलापाच्या आवाजावरून आता या वेळी कोणती सिरियल सुरू आहे, हे समजतं. कधी कधी तर हे मालिकेचं संगीत आहे की कुत्र्याचं रडणं, यातला फरक कळेनासा होईल, इतपत हा आलाप आळवला जातो आणि हा अत्याचार रात्री अकरा पर्यंत सुरूच असतो. "

मला हसू आवरलं नाही पण तिची समस्या गंभीर होती. तिला म्हटलं, "शमे, तुला बोलायला खूप लागतं ना? इतकं आहे, तर जरा सासूबाईंसोबत बोलत जा की. मुद्दाम आपल्या कुकींग टिप्स विचारायच्या. स्वयंपाक करता करता एखादी गोष्ट त्यांना विचारायची. इतक्या वर्षांनीही सुनेला आपला सल्ला लागतो, हे पाहून सासू म्हणून त्यांनाही बरं वाटेल. तू घरात असून त्यांच्याशी बोलत नसशील तर त्या तरी बिचाऱ्या कशात मन गुंतवणार गं? "

"तुला काय वाटतं, मी हे सगळं करून पाहिलं नसेल? अगं, त्यांच्या मालिका सुरू असताना त्यांना नुसती हाक मारली तर त्या वैतागतात. अशा टिप्स विचारायला गेले तर काय होईल कुणास ठाऊक? परवा त्यांची भाची आली होती घरी, त्यांना भेटायला. ह्या तिच्याशी मोजकंच बोलल्या. का, तर म्हणे, "तिच्याशी बोलत बसले असते, तर ’जनम-जनम’ च्या भागात शेवटी काय होतं ते कळलं नसतं. बरं एकदा शेवट बघून भागत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी या सगळ्या सिरियल्सचं पुर्नप्रक्षेपण होतं, तेही त्यांना पहायचं असतं. मगाशी तुझ्या घरात आले तेव्हा टी. व्ही. सुरू नाही हे पाहून बरं वाटलं. "

तिच्या ’थॅंक गॉड’चा अर्थ मला आत्ता कळला.

"मग असं कर, तूही सासूबाईंसोबत मालिका पहायला बसत जा.... " शमिताच्या चेहेऱ्यावर असे काही भाव आले की मी वाक्य अर्धवटच सोडून दिलं.

"बाई गं. मालिकेत पाहण्यासारखं काही असतं तर मी एकतरी मालिका पाहिली असती. दोन दिवस मी त्यांच्यासोबत मालिका पहायला बसले. सासूबाई खरंच खुष झाल्या होत्या पण खरं सांगते, त्या पाहत असलेल्या एकाही मालिकेत मला काहीही विशेष आढळलं नाही. त्याच त्या गडद मेक-अप केलेल्या बायका, तेच ते प्रसंग आणि तीच ती रडारड.

परागच्या वागण्यावरसुद्धा याचा खूप परिणाम झालाय गं. पूर्वी साडेसातच्या ठोक्याला घरी येणारा पराग आता रात्री नऊ वाजले, तरी ऑफिसमध्येच असतो. रात्री अकरा ही त्याची घरी येण्याची बदललेली वेळ आहे. त्याला विचारलं, "हल्ली खूप काम असतं का ऑफीसात? " तर म्हणाला, "ऑफिसच्या कामाचं टेन्शन परवडतं पण संध्याकाळी घरात आल्यावर हे जे अभद्र रडगाणं ऐकावं लागतं, त्यापेक्षा ऑफिसमध्ये चांगला वेळ कटतो. परागने त्याच्यासाठी मार्ग शोधून काढला. मी काय करू गं? " शमिताच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.

मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, "शमू, तू एकदा सासूबाईंशीच याबाबत बोलून बघ ना!. त्यांना समजावून सांग. त्यांना म्हणावं, सोहमशी खेळत चला थोडावेळ. "

शमिताचा चेहेरा खूप केविलवाणा झाला होता.

"काही बोलायची सोय उरली नाहीये, गं. मागच्या आठवड्यात परागच त्यांच्याशी बोलला. बोलला कसला माय-लेकाचं भांडणच झालं! सासूबाई त्याला जे काही म्हणाल्या, त्यावरून त्या या सिरियल्सच्या किती आहारी गेल्यात याची मला आणि परागला कल्पना आली. परागने तर हातच जोडलेत त्यांच्यापुढे"

"का गं? काय झालं? "

"आयुष्याचा जोडीदार निघून गेला की आपल्याला जोडे खावे लागतात.... असलं काहीतरी डायलॉगवजा भंपक उत्तर दिलं त्यांनी आणि सिरियलमधल्या बायका जशा तरातरा आपल्या खोलीत निघून जातात तशाच त्या निघून गेल्या. तुला विश्वास बसणार नाही, त्यांचा तो डायलॉग मी आदल्याच दिवशी ’सोबत ही सात जन्मांची’ या सिरियलमध्ये ऐकला होता. त्या प्रसंगापासून त्या परागशी बोलतच नाहीयेत. "

शमितावर अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नव्हता. तिच्या सासूबाईंबद्दल तिला किती आदर आहे, हे मला माहित होतं. प्रेमाला घरून विरोध झाला म्हणून पराग-शमिताने पळून जाऊन लग्न केलं पण परागच्या आईने म्हणजे शमिताच्या सासूबाईंनी कायम शमिताची बाजू घेतली. तिला आपल्या मुलीसारखी वागणूक दिली. त्या माऊलीबाबात शमिताला कळकळ वाटत होती. त्यांना ह्या मालिकेच्या दुष्टचक्रातून कसं सोडवावं, हे तिला कळत नव्हतं म्हणून बेजार झाली होती ती. तिला काही मदत करता येत नाही म्हणून मलाही वाईट वाटलं. थोडावेळ बसून ती निघून गेली. मी विचार करत होते.

पूर्वी रामन राघव सारख्या माणसाने निरपराध लोकांच्या खुनांचं सत्रं आरंभलं होतं म्हणून त्याला ’सिरियल किलर’ म्हणायचे. आता ह्या टी. व्ही. वरच्या सिरियल्सच आपल्या किलर झाल्यात. सिरियलमधल्या कुटुंबांमध्ये काय होतं ह्याची इतकी काळजी लागून राहते की आपल्या कुटुंबात काय चाललंय याचा विसर पडतो. सिरियलचं दु:ख आपलं होतं आणि त्या दु:खाला कुरवाळत आपण आपल्याच माणसांना किती दुखावतोय, किती दुरावतोय हे लक्षातच येत नाही.

मनात हा विचार चालू असतानाच मला आईची आठवण झाली. बरेच दिवसात फोन केला नव्हता तिला. तिच्याकडे आता मोबाईल असल्यामुळे तिला कुठेही फोन करता येतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा!

"हॅलो, आई? "

"हं! कशी आहेस गं? बऱ्याच दिवसात फोन नाही. "

"ठीक आहे. जरा कामात अडकले होते गं आई. तू कशी आहेस? "

"मी पण ठीक आहे. ए.... मी तुला पंधरा मिनिटांनी फोन करू का? "

"बिझी आहेस का? "

"नाही पण.... अगं टी. व्ही. वर ’ताईची माया’ सुरू आहे. कालचा भाग पाहता नाही आला मला.... "

मी "बरं" म्हणून हसत हसत फोन बंद केला. काय बोलणार?

कालची गोष्ट, सासूबाई बऱ्याच दिवसांनी घरी आल्या म्हणून त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला. सर्वजण जेवायला बसलो तश्या सासूबाई आपली प्लेट घेऊन हॉलमध्ये गेल्या. सगळेच अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले. त्यांच्याही ते लक्षात आलं. तशी ओशाळं हसून म्हणाल्या, ’परदेसी पिया’ ही माझी आवडती सिरियल आहे, एकही भाग चुकवलेला नाही ना म्हणून... "

सगळ्यांनी मुकाट जेवायला सुरूवात केली.

जेवण झाल्यावर पाहिलं तर सासूबाई आता ’अनोखा बंधन’ नावाची सिरियल पाहत होत्या. शमिताचा प्रसंग काही डोक्यातून जात नव्हता म्हणून मीही कौतुकाने डोकावून पाहिलं की असं काय असेल ह्या सिरियल मध्ये की सासूबाई आमच्याबरोबर जेवायचं सोडून टी. व्ही. समोर जाऊन बसल्या. छान प्रसंग होता - एक सासू आपल्या सुनेच्या माहेरी जाते आणि सुनेच्या माहेरच्यांना अद्वातद्वा बोलून सुनेकडून दागिने मागून घेते. सिरियलमधील आई आणि सून दोघी रडत असतात आणि सुनेची भावजय सुनेकडे पाहून कुत्सित हसत असते.

सासूबाई सिरियलमध्ये चांगल्याच रंगल्या होत्या. मी माझी कामं आटोपण्यासाठी वळले आणि सासूबाईंचा मागून प्रश्न आला, "काय गं, ह्या सिरियलमधल्या सासूसारखी सासू तुला मिळाली असती, तर तू काय केलं असतंस? "

मला उत्तरच सुचलं नाही. मला समर्थांच्या ओळी आठवल्या, "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. "

*****

टीप: प्रस्तुत कथेतील प्रसंग शंभर टक्के खरे आहेत. फक्त कथायोजनेसाठी प्रसंगातील पात्रांची व मालिकांची नावे बदलली आहेत. या कथेतील ’मी’ ही व्यक्तिरेखा म्हणजे लेखिका नाही. जिच्या नजरेतून ही कथा लिहीली आहे, ती ही व्यक्तीरेखा आहे.