सदिच्छा

आपण वाढदिवस, लग्नसमारंभ किंवा अन्य आनंदाच्या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो. शुभेच्छा म्हणजेच सदिच्छा. शुभेच्छा व्यक्त केल्याने चांगले वातावरण निर्माण होते. आणि आपल्याला वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते. दुसऱ्याबद्दल व्यक केलेली चांगली इच्छा म्हणजे सदिच्छा. सदिच्छा ही अंतःकरणातून उत्पन्न होत असल्याने सदिच्छा व्यक्त करणारा हा खरोखर आपल्या मनाचे सौंदर्यच उघड करीत असतो. सदिच्छा व्यक्त करणे म्हणजे चांगली इच्छा व्यक्त करणे, दुसऱ्याच्या सुखात सुख पाहणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणे. विशुद्ध मनाच्या उन्नत अवस्थेतच हे घडू शकते. या सदिच्छेला तत्परतेची जोड मिळाल्यास वेगळीच उंची गाठली जाते. सदिच्छेबद्दल जितके लिहावे तितके थोडेच आहे. सदिच्छेचा उदय हा नेहमी शुद्ध व शांत मनाच्या प्रांगणात होत असतो. कामक्रोधादि विकार मनात किल्मिष निर्माण करतात. दम्भोदर्पाभिमान हे सदिच्छेला प्रतिबंध करतात. सुसंस्कारांनी मशागत केलेल्या मनात सदिच्छेचे बीज उत्तम प्रकारे रुजते व फोफावते. सदिच्छा ही माणसाला आनंदाकडे घेऊन जाते. आनंदाशिवाय जीवाला समाधान नाही. सौंदर्याशिवाय आनंद नाही. प्रेमावाचून सौंदर्य नाही. तन्मयतेशिवाय प्रेम नाही. स्वतःला विसरल्याशिवाय तन्मयतेचा अनुभव नाही. निसर्गाचा हा नियम आहे. त्याला अनुसरून माणूस कुठेतरी प्रेम करीत असतो. स्वतःला विसरण्याचा प्रयोग करीत असतो. प्रेम नसेल तर सदिच्छा येईल कोठून ? सदिच्छा ही तर प्रेमस्वरुपच असते. सदिच्छा ही आकर्षण निर्माण करणारी आहे. अखिल जगताचे मूळ कारण आहे परमतत्व. या परमानंदाविषयी सर्वांनाच आकर्षण आहे. भगवान श्रीकृष्ण हे परमानंदाचे मूर्तिमंत स्वरुप. अखिल विश्वालाच श्रीकृष्णाचे आकर्षण आहे. कृष्ण हा शब्दच मुळी आकर्षण या शब्दातून निर्माण झाला. सदिच्छेने लोक जोडले जातात. सदिच्छेने  आपुलकी निर्माण होते. प्रेमभावना उदयास येते. लोकांच्या भावना एकत्रित होतात आणि एकजिनसीपणा निर्माण होतो. तो सर्वांच्याच कल्याणास उपयुक्त ठरतो. सदिच्छा हा शब्द सत्+इच्छा असा आहे. सत् हे ईश्वरी तत्त्व आहे. सच्चिदानंदस्वरुपाचे द्योतक आहे. सदिच्छा व्यक्त करणे म्हणजे परमेश्वराची आराधना करण्यासारखेच आहे. ईश्वराला जगन्नाथ म्हटले आहे. ईश्वर हा सर्व प्राणीमात्रात वास करतो. दुसऱ्याबद्दल व्यक्त केलेली सदिच्छा ही शेवटी " आकाशात्पतितं तोयं" या न्यायाने त्या जगन्नाथाकडेच जाते. सुदाम्याची सदिच्छा श्रीकृष्णाने उपहाररुपाने स्वीकारली आणि इकडे सोन्याची सुदामनगरी निर्माण झाली. सदिच्छेत मैत्रीची भावना असते. "भूता परस्परे जडो मैत्र जीवाते" याच्या मुळाशी हीच सदिच्छा आहे. आणि त्यातूनच "जो जे वांछील तो ते लाहो" ही परिणति उत्पन्न झाली.

सदिच्छेने माणूस कार्यप्रवण होतो व सत्कार्याला लागतो. सदिच्छा ही माणसाला गुणसमुच्चयाकडे घेऊन जाते व त्या गुणांचा विकास घडविते. परमार्थाचा सारा भर आहे तो या गुणवत्तेचा विकास करण्यावर कारण ही मानवी गुणवत्ताच देवत्ताकडे होणाऱ्या प्रगतीसाठी अपरिहार्य असते. ज्याच्या मुखातून नित्य सदिच्छाच बाहेर पडती तो माणूस सर्वांना हवाहवासा वाटतो. त्याच सहवास सुखावह असतो. ज्याच्या ठिकणी सदिच्छा आहे त्याचा अवघाची संसार सुखाचाच होणार. सदिच्छेत सुविचार असतो आणि सुविचार सुभाषितात असतो. असत् शब्द ओरडून उच्चारला तरी निमिषात स्तब्ध होणार. तेच सुभाषित हळूवार सुरात उच्चारले तरी जगात निनादत राहणार. सुभाषित ईश्वराचे गुणगान करते. देव कोठे आहे ? मनाला शुद्ध करणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जागा म्हणजे ईश्वर. स्वार्थविरहितपणे तुमचे पालन करणारे निव्वळ प्रेममूर्ती आईवडील हे ईश्वर. म्हणजे ईश्वर ही वृत्ती आहे. ईश्वर ही प्रवृत्ति आहे. सदिच्छा सदाचार हाच ईश्वर. सदिच्छा ठेवा आणि मग समर्थ म्हणतात तसे - ' सर्वामुखी मंगल बोलवावे'.

_ नारायण भु. भालेराव