'लँडमार्क फोरम' नावाची संघटना

कदाचित आपल्याला कल्पना नसलीच तर : लँडमार्क फोरम नावाची जागतिक संस्था आहे.

सध्या मुंबईत त्यांचे प्रशिक्षण चालू आहे.

ते व्यक्तीकडून रुपये ८००० घेतात. तीन दिवसाचे प्रशिक्षण आहे. त्यात सकाळी आठ ते रात्री अकरा असा कालावधी असतो.

लोकांकडून घेतलेल्या पैशातून एक अत्यंत महागडे सभागृह ३ दिवसांसाठी भाड्याने घेतले जाते. सध्या म्हणे मरीन ड्राईव्हवर रोजी १,३०,००० रुपये भाडे असलेले सभागृह घेतले जाते.

या संघटनेचे उद्देश त्यांच्या संकेतस्थळावर आहेतच.

महत्त्वाचा उद्देश म्हणजे व्यक्तीच्या जीवनविषयक दृष्टिकोनामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणणे. यात अनेक गोष्टींवर चर्चा केली जाते. एका वेळी ३०० माणसे सहभागी होतात. त्यांना एक सल्लागार / मार्गदर्शक मिळतो. तो त्यांच्यातीलच एक बनून अत्यंत मनोहारी पद्धतीने सर्वांना बोलण्यास भाग पाडतो. लोक जसजसे चर्चेत भाग घ्यायला लागतात तसतसे त्यांचा सहभाग व त्याची तीव्रता वाढू लागते. येथेच लँडमार्क फोरमचा विजय होतो.

कामकाज कसे होते -

१. लोकांना त्यांची पार्श्वभूमी विचारणे
२. त्यांच्या अडचणी विचारणे
३. त्यांची ध्येये वगैरे विचारणे
४. आपले पुर्वग्रह कसे बनतात हे सिद्ध करणे
५. आपल्या तक्रारींमधली सत्यासत्यता पुर्वग्रहांनी सिद्ध होते हे सिद्ध करणे
६. आपले साहेब, कुटुंबीय, मित्र, सहकारी, नातेवाईक व इतर सर्व जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन देणे
७. हा दृष्टीकोन देण्यासाठी 'आपले पुर्वग्रह', आपल्या क्षमतांचे ज्ञान वगैरेबाबत जाहीर चर्चा करणे
८. भाषा ही जगासाठी बनलेली नसून भाषा होती म्हणून जग निर्माण होऊ शकले असा एक सिद्धांत मांडणे

थोडक्यात म्हणजे जाहीररीत्या अंतर्मुख व्हायला लावून आपल्यात काय काय बदल केल्यास आपण जगात अधिक उत्तमपणे कसे जगू शकू याचे ज्ञान आपल्यालाच आपली माहिती विचारून देणे!

मी या प्रशिक्षणाला गेलेलो नसून (कधी जाणेही शक्य नाही ) माझा एक मित्र नुकताच जाऊन आला आहे व तो भलताच प्रभावित वाटत आहे.

हा उपक्रम बंद व्हावा असे का वाटते?

१. प्रशिक्षणामुळे परिस्थिती बदलत नाही.
२. आपल्यात झालेले फरक किती काळ टिकतील याचा संस्था भरवसा देऊ शकत नाही किंवा फरक टिकले नाहीत तर पैसे परत मिळत नाहीत.
३. माणूस मुळात जो काही असतो तो असतोच! म्हणजे, संस्कार, अनुभव, सभोवतालची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती व सुरक्षा-पातळी यातून सर्व माणसे घडतात. साधारणपणे माणसाचा स्वभाव त्याच्या पहिल्या पंधरा वर्षात (भारतीय समाजात ) घडतो. तेव्हा, पुढील आयुष्यात त्याच्या 'प्रतिक्रिया' आमुलाग्र बदलणे बरेचसे असंभव असते. अशा प्रशिक्षणांमुळे जरी दृष्टीकोन बदलला व तो काही काळ टिकला तरीही वेळ येताच मूळ स्वभाव त्यावर मात करणारच. हे अगदी प्रशिक्षकाच्या बाबतीतही होत असेल.
४. असे काही प्रशिक्षण खरोखरच समाजाच्या बऱ्यासाठी आहे की नाही याची शासनाने शहानिशा केलेली नसताना एवढे प्रचंड मूल्य घेतले जात आहे.
५. समाजात मानसशास्त्रीय वैद्य असतात, शिक्षक असतात, कर्तृत्ववान माणसे असतात, यातून काही प्रमाणात तरी समाज घडतच असतो. हा नवीन मार्ग का असावा?

आता मित्राने सांगीतलेला एक किस्सा -

एक अभिनेत्रीही आमच्यावेळेस प्रशिक्षणाला आलेली होती. ती घटस्फोटिता होती कारण तिच्यावर बलात्कार झालेला होता. तिला त्यांनी खूपच प्रशिक्षण दिले. (अर्थातच, हे तिनेही सगळे जाहीररीत्या स्वीकारलेले दिसते. ) तिच्यात इतका बदल झाला की तिसऱ्या व शेवटच्या दिवशीच्या शेवटच्या प्रशिक्षण वर्गाला ती चक्क आपल्या नवऱ्याला घेऊन आली. ती त्याच्याशी ज्या पद्धतीने वागली त्यामुळे तोही प्रभावित होऊन सगळ्यांना भेटायला आला म्हणे! यावर अर्थातच माझ्या मनात 'हा संस्थेचाच बनाव दिसतोय' असा विचार आला.

या प्रशिक्षणांना समाजातील उद्योगपती, मोठे वैद्य असे बरेच नामांकित लोक जात आहेत.

माझ्यामते हा सगळा अमेरिकेचा 'भारतीयांना बनवा व पैसे लाटा' या उपक्रमाचा भाग असावा.

८००० रुपये देऊन स्वतःला बदलता येत असते तर काय हो? :-))