परछाईयां

वो जो हममें तुममें करार था...
रे सा ध प म ध प म सा रे सा
गझल आवडीचीच. गायकही पुरेसा रंगलेला आहे.
वो जो हममें तुममें कराऽऽऽऽऽऽर था, तुम्हे याद हो कि ना याऽऽऽऽऽऽऽऽद हो...
म ध रे सा नी ध प ध  नी ध प म प म ग रे सा सा रे सा...
वोही यानी वादा निबाह का, तुम्हे याद हो कि ना हो...
आलापी सुरू राहते... विचारांच्या आंदोलनात घेऊन जाण्यास पुरेशी.
ईज इट द बिगिनिंग ऑफ द एण्ड? कदाचित. मला नक्की नाही सांगता येणार. काही तरी गडबड आहे हे नक्की.
"प्लीज. मला काही दिवस एकटेपणा हवा आहे," हे तुझं वाक्य... त्या दिवशीचं.
***
थंडीची करामत कशी असते पहा. खरं तर या थंडीत मी इथं असण्याचं काहीही कारण नव्हतं. पण आलोय. आलोय म्हणजे अगदी ठरवून आलोय. इथं पहिल्यांदा आलो होतो त्याला आता आठेक वर्षं झाली. त्यानंतर दर काही काळानं येत गेलो. प्रत्येक येणं वेगळं आहे. आलोय एकटाच. आठवणींची साथ घेऊन. इथून निघालो प्रत्येकवेळी तेही आठवणींची साथ घेऊनच. प्रत्येक आठवण वेगळी. म्हणूनच, इथलं प्रत्येक येणं वेगळं.
गेल्या खेपी इथंच. दारातून मी बाहेर आलो. समोर पाणी पसरलेलं...
हे ठिकाण माझ्या आवडीचं. अतिशय आवडीचं. या तळ्याभोवती वर्तुळाकार फेर धरून उभा असलेला डोंगर. जणू त्यानं या तळ्याला कवेत घेतलेलं. डोंगर हिरवे. झाडोऱ्यात कसंही लपता येतं. मध्यभागी पाणी. चहूबाजूनं चढत गेलेल्या डोंगरावर घरकुलं. मोजकी. वीसेक असावीत.
आपण या किनाऱ्यावर असतो, त्या किनाऱ्यावर रात्री हमखास हालचाल होते. पाणी पिण्यासाठीची. एक छोटी धावपळ. थोडी खसखस झाडोऱ्याची. एकूण सौम्य हालचाल. ती हालचाल केवळ जाणवून घेत इकडं बसून रहायचं.
त्या दिवशी संध्याकाळी पावसाची एक सर कोसळून गेली होती. झाडोरा टवटवला होता. पश्चिमेकडून चुकार किरणं झाडोऱ्यातून पाण्यावर चमकत होती.
असंच बसून रहायचं होतं त्या दिवशी. तो आल्हाद अंगांगात साठवून घेत. तुझ्याशी बोलत. ते झालं नाही. समहाऊ, आय डोण्ट नो, सडनली इट हॅपन्ड. यू सेड, यू वॉण्टेड टू बी अलोन फॉर सम टाईम. कारण ठाऊक नाही. सांगितलंही नाहीस. मीही विचारलं नाही. इतर काही सांगितलंस. पण त्याला कारण म्हणता येणार नाही.
मी तेव्हाच मनाशी म्हणालो होतो, इज इट द बिगिनिंग ऑफ द एंड?
... तर ही थंडी. या थंडीत मी पुन्हा इथं आलोय ते, तेच दिवस जगण्यासाठी. थंडीतले. ही थंडी असली की, इथं वातावरण वेगळंच असतं. ते मला आत खोलवर घेऊन जातं. हे सारं खरं तर ठाऊक आहे. तरीही मी वेड्यासारखा इथं त्या दिवसांचं जगणं पुन्हा जगण्यासाठी आलोय. इथलं वातावरण आत घेऊन जाणारं आहे हेच खरं, इतकंच आता इथं आल्यावर कळतंय. कारण? कारण हेच. आता इथं मी आलोय ते तुझ्या त्या विधानाच्या आधीचे दिवस जगायचे होते यासाठी, आणि अडकून पडलो आहे ते त्या विधानापाशीच. कारण आत खोलवर गेल्यानंतर मनाच्या तळाशी फक्त तेच दिसतं. तेच डोक्यात बसतं, मनाचा कब्जा करतं.
त्यावेळी खरं तर मी तुला विचारायला हवं होतं, का? पण त्या विधानानं एकूणच अंतर्मुख झाल्याचा फटका असा होता की ते विचारू शकलो नाही.
हे खरंच, की मी त्यामुळं आणखीनच अंतर्मुख झालो आहे. कारण न विचारल्याची ती शिक्षा असावी, तू तसं का म्हणालीस याच्या कारणांचा शोध घेताना तो माझ्यापुरता तरी मलाच काही प्रश्न करत निघाला आहे. आपलं काही चुकलं, आपण कशाचा पाठपुरावा अतिरिक्त केला, आपण एकूणच तुझ्या जगण्यात हस्तक्षेप केला का, असे प्रश्न. छळतात हे प्रश्न. एखाद्या क्षणात या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी येतात. मग एखाद्यावेळचं बोलणं आठवतं आणि त्यातलं एखादं वाक्य झटकन डोळ्यांसमोर येतं ते या प्रश्नाचं उत्तर सकारार्थी देणारं. मग पुन्हा वावटळ मनात. हे आंदोलन सुरूच राहतं.
तुला तसं वाटण्याचं कारण आता कळून घेण्यात अर्थ राहिलेला आहे का?  वेल, खर सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकतेस. मी आशावादी बनून ‘हो, अर्थ आहे’ असं म्हणू शकतो. पण सारं आहे ते तुझ्या हातात. आणि म्हणजेच मी असहाय्य!!!
***
अपनी आंखोंमें अभी कौंध गई बिजलीसी
हम ना समझे कि ये आना है कि जाना तेरा...
दिवस आठवत नाही. काय घडलं ते उमजत नाही.
अचानकच आपली भेट. न ठरवता झालेली. गाण्याचा कार्यक्रम संपल्यानंतरची. खरं तर मी सहसा तिथं होणाऱ्या गाण्याच्या कार्यक्रमाला जात नाही. त्या दिवशी अपघातानेच गेलो होतो. एरवी त्या गायकाच्या इतर गझला मी ऐकत नाही. पण त्यादिवशी गेलो, कारण माझ्या आवडीच्या चारही गझला त्या दिवशी तो हमखास गाणार होता, ही खबर. बहुदा तुझी भेट होण्याचा तो संकेत असावा. आत्ता असं म्हणतानाही माझं मलाच हसू येतंय. संकेत वगैरे शब्द माझ्या तोंडी म्हणजे जरा अतीच. खरंच आहे. तर, मध्यंतरात आपल्या ओळखी झाल्या. आपण खूप बोललो बहुदा त्यावेळी. इतरांना जमेस न धरताच. तुझी चित्रं हाच विषय होता. माझा चित्रांशी पाहण्याखेरीज संबंध नसतानाही.
कार्यक्रम संपल्यावर आपण पुन्हा एकत्र आलो सारे. जेवायला गेलो.
मी हीच गझल गुणगुणत होतो. "ले चला जान मेरी रुठके जाना तेरा, ऐसे आनेसे तो बेहतर था न आना तेरा..." मध्ये खंड फक्त बोलण्याचा. मोजकाच. इतर कोणी बोलत असतील तेव्हा माझं हे गुणगुणणं सुरूच होतं. जेवण संपत आलं तेव्हा अचानक तू माझ्याकडं रोखून पहात प्रथमच मला उद्देशून बोललीस. विचारलंस,
"परछाईयां अजून पाठलाग करताहेत का?" गझलांच्या कार्यक्रमाचं नाव होतं परछाईयां! माझ्या सततच्या गुणगुणण्यावरचा तो राग असावा.
"कसल्या?" मी प्रतिप्रश्न केला आणि अडकलो.
अचानक आलेला हा प्रश्न, एरवीही अनपेक्षित. म्हटलं तर वरवरचा. त्या कार्यक्रमापुरता आणि गप्पांच्या त्या वातावरणात माझ्या परिघावर राहण्यावरून केलेला. पण तो कुठं तरी खोलवर गेला होताच. कारण या गझलेचं वातावरणही तसंच. मी तसा त्या गझलेतून येणाऱ्या वातावरणात होतो बहुदा. त्यातून मी प्रतिप्रश्न केला, "कसल्या?"
"अच्छा, म्हणजे कसल्या तरी आहेत..." तू. अर्ध्यावर, अर्ध्यावर नव्हेच तर मोजक्या शब्दांवर, सूचकपणे बरंच काही सोडून देणारं अपुरं वाक्य.
"छे, छे..." पण पुढं माझ्या या बोलण्याला फारसा अर्थ राहिला नव्हता. जे व्हायचं होतं ते झालं होतं. न सांगता सारं काही बाहेर आलं असं झालं. पुढं मग माझ्या प्रत्येक गुणगुणण्याचा संदर्भ बदलत गेला असावा. मी किती आणि काय गुणगुणत होतो, ठाऊक नाही. पण एकूण बोलणं इकडच्या-तिकडच्या विषयांचंच होतं. मी कमीच बोलत होतो. ते अगदी स्वभावाला धरून. माझ्या त्या अंतर्मुखतेवर टोलेबाजी वगैरे झाली हे आठवतं. मध्येच एकदा तुझ्या चेहऱ्यावर कायम भास देणाऱ्या वेदनांचा विषय निघाला. तेव्हा मी बोलू लागलो आणि सारे गप्प झाले होते... माझं बोलणं ऐकण्यासाठी...
‘परछाईयां’पासून सुरू झालेला तो प्रवास... प्रवासाच्या मध्यावर ‘परछाईयां’च. आपण निरोप घेत होतो तेव्हा "फासले ऐसेभी होंगे" या गझलेपाशी मी होतो. तू, मी, निशा, सौरभ, सुदेश... सारेच होतो.
एकूण त्या गप्पांमध्येच मैत्रीची बिजं रुजली असावीत. नंतर आपण बोलत गेलो.
***
गारठा वाढलाय. संधीप्रकाश आहे. थोड्या वेळात अंधार. किती वेळ बसलोय इथं? मोबाईल वापरू लागल्यापासून घड्याळ बंद. इथं वेळेची चिंता नाहीच तशी. कारण काही कामही नाही. कुठली जबाबदारीही नाही. पण असं बसून चालणार नाही. उठावंच लागेल.
***
हमसे न पूछो हिझ्र के किस्से,
अपनी कहो, अब तुम कैसे हो...
पाऊस होता त्या दिवशी. दुपारीच संध्याकाळ व्हावी, असं आभाळ आधी भरून आलं, मग पाहता-पाहता सरींनी कब्जा केला. उभ्या गावाचाच. जानेवारीची अखेर. दिवसभरात संध्याकाळच्या सुमारासच वातावरण थोडं उबदार होतं. त्याचवेळी आलेल्या या सरींनी पुन्हा गारवा आणला होता. साडेपाचच्या सुमारास मी लॉगीन केलं. कादंबरीचा पहिला मसुदा पूर्ण झाला होताच. तुला फोन.
"येतेस?" तू अद्याप दौऱ्यातच. शेवटची भेट होऊन दीडेक महिना झाला असावा ना त्यावेळी?
"काय विशेष?"
"सहजच."
"अर्ध्या तासात."
तुला कादंबरीचं बाकी कथानक ठाऊक होतंच. शेवट काय करतोय इतकाच भाग मी तुला सांगितलेला नव्हता. खरं तर, मलाही तो ठाऊक नव्हता. तेवढीच शेवटाची दहाएक पानं तू वाचलीस.
"बरंच काही सांगायचं राहिलं का रे?"
तुझा पहिलाच प्रश्न. मी केवळ प्रश्नार्थक नजरेनंच पाहिलं स्क्रीनकडं आणि प्रश्नचिन्हं तिथं उमटवली.
"नक्कीच." सूर ठाम असावा.
"मला नाही वाटत..."
"तुला काय वाटतं याला महत्त्व नाही. तुला काय सांगायचं आहे याला महत्त्व, नाही का?"
"?"
"तू बोलत जा... न बोलण्यानं काही साध्य होत नाही. तुला बोलायचं आहे खूप काही..."
"मला जे सांगायचं होतं ते इथं..."
परत मला अर्ध्यावर रोखत, "वा! कथा अर्ध्यावर राहतेय. उपसंहार लिहून गुंडाळता येईल असं वाटतं तुला? नाही. त्यातून सारेच प्रश्न नव्या संदर्भात खुले होतात. ती असं का वागली? तिचं चुकलं? मनापासून रंगवलेल्या या नायिकेवर अन्याय का?" तुझे शब्द स्क्रीनवर उमटू लागले.
"रंगवलेली नाहीये ती..."
"नक्की? ती तशीच आहे ना? मग उत्तरं पूर्ण होत नाहीत. यू आर नॉट क्लोजिंग ऑल द पॉईंट्स... तुझ्यातला तो अबोल माणूस इथं लेखकावर स्वार होतोय."
"मी अबोल?..."
"आय नो, यू वोण्ट अग्री विथ धिस. बट देन द फॅक्ट डझन्ट चेंज. एनीवे, कमिंग बॅक टू द नॉव्हेल, मला अजून वाटतं की तू मध्येच थांबतो आहेस. उपसंहार केला की मधले सारे अध्याहृत होते. नायिकेनं एक प्रश्न केला, माझं अस्तित्त्व काय या जगण्यात? ज्या जगण्यात, तिला तिचं अस्तित्त्व गवसत नाहीये. तिचं काही चुकत नाही. तू हे म्हणत येतोस. मग मध्येच थांबतोस... उपसंहारानंतर काय होतं? तिच्या त्या निर्णयामुळंच सारं काही विस्कटून गेलं असंच चित्र निर्माण होतं. असो. मी तिच्या बाजूची नाही, ना त्याच्या. तुझ्या आहे हे नक्की..."
ही बाजू केव्हा आली होती कुणास ठाऊक! इतकं खरं की, कादंबरीचा शेवट बदलला.
***
जान-पेहचानसेभी क्या होगा,
फिरभी ए दोस्त गौर कर, शायद...
दौरा सुरू होण्याआधीचा हा काळ. आठवडा असावा दौरा सुरू होण्यास. आपण भेटलो होतो. दुपारची वेळ होती. जेवण केलं आपण तुझ्या आवडत्या हॉटेलात. तीनच्या सुमारास मी निघालो.
"थांब ना थोडा वेळ अजून..." सूर आर्जवी होता. पण माझ्यासमोर पर्याय नव्हता. मला निघणं भाग होतंच.
"आणखी चार दिवसांनी माझा दौरा सुरू होतोय..." आता ओलावा थोडा वाढला होता सुरांत.
"हो. पण आपण आहोतच ना. मी कुठं चाललोय? मी इथंच आहे."
"..."
तू एकदम मौनात. फक्त आर्जवी नजरच बोलत असेल तर. तुझं असायचंच नाही तरी नेहमी, "दृष्टीही बोलतेच. ती समोरच्याचं बोलणं ऐकूही शकते..." चित्रकाराचं बोलणं. मला काही ते झेपायचं नाही.
"हे बघ..." माझा सूर समजूत काढण्याचा.
काही क्षणांच्या विरामानंतर तुझा होकार.
"खरं सांगू, मला एकदम ओकं-ओकं वाटतंय आता..."
मग तू बोलत गेलीस. मी ऐकत होतो. नवं काही नव्हतं. नव्या असतील तर त्या आपल्या एकमेकांच्या ओळखीच्या नव्या भावना. थोडी खोलवर गेलेली ओळख. आधी या गोष्टी होत्याच, पण त्या कशा एखाद्या चित्राच्या आऊटलाईनसारख्या. आता तसं नव्हतं. आता त्याच्या आकारासहीत, आतल्या रंगांसहीत, छटांसहीत चित्र समोर येत होतं. तुझं बोलणं संपलं तेव्हा अर्धा तास झाला होता. मग गाडं माझ्यावर आलं. मी बोलत नाही याविषयीच. मी नेहमीच्या पलीकडे काही बोललो नाही हे नक्की ना?
निघताना परत म्हणालीस, "मला एकदम एकाकी वाटू लागलंय..."
स्वाभाविक असावंही थोडं. तीन-साडेतीन महिन्यांचा दौरा. तू निरोप दिलास. मला त्यावेळी कळलं नाही. आत्ता शंका येतीये... आपल्यातल्या या आजच्या अंतराची बिजे त्याचवेळी रुजली होती का?
***
पहाट. साडेपाच. या वेळेला हमखास समोरून आवाज आलेच पाहिजेत. चिमण्यांचे, कोकीळही. एकूण चिवचिवाट. थोडं अंतर डोंगर चढून दक्षिणेला सरकलो तर पोपट. तिथल्या झाडांमध्ये त्यांच्या ढोली आहेत बऱ्याच मोठ्या संख्येत. त्या आवाजानं जाग येतेच. कितीही वाजता रात्री झोपलो असलो तरी.
बाहेर आल्यावर मी नेहमीप्रमाणेच तळ्याकडं पाहतो. तिथं या अंधारात काहीही दिसत नाही. फक्त पाणी आहे एवढं कळतं. पण हीच वेळ असते की, हे तळं जागं होताना पाहण्याची. इथून पुढं अर्ध्या एक तासात प्रकाश पसरू लागला की, हे तळं जागं होत जातं. अंधारात तळ्याच्या पाण्याचा स्तर फक्त कळतो. उजेड येत जातो तसे त्याचे तरंग कळू लागतात. तळं किती खोल असावं याचा एक अंदाज पाण्याच्या त्या तरंगांवरून येऊ लागतो. किनाऱ्यापाशी तरंग विरळ होत जातात. आतमध्ये तसे नसतात. गडद. पाण्यात काहीही टाकावं लागत नाही. हवेचा एक बारकासा झोत पुरेसा असतो.
उजेड पसरत जातो तसं तळ्याच्या उत्तरेच्या किनाऱ्यावर माणसांची हालचाल दिसते. पाणी भरायला बायका येऊ लागतात. बाप्येही येतात. पोरं असतातच. कोणी सकाळच्या गडबडीत बुडी मारून आंघोळ उरकत असतो. हळुहळू तळंही जागं होतं, गावही जागं होतं. जाग येते एकूणच जीवनाला...
***
आधी आलापी... म प नि ध नि सा सा रे प ग रे नि म प नि ध नि सा...
"इसका जो गंधार है... मियांकी मल्हार में, ये ना तीवर है, ना कोमल है; आंदोलन है... " गायक सांगतो...
एक बस तू ही नही, मुझसे खफा हो बैठा
मैंने जो संग तराशा, वो खुदा हो बैठा...
***
तुझे डोळे खरंच बोलतात. तुझी चित्रं बोलतात ती डोळ्यांची भाषा. हे डोळे माझ्याशी काही बोलायचे, पण ते एकूणच माझ्यासाठी दुर्बोध.
"मित्रांमध्ये डोळेही बोलतात. बोलले पाहिजेत. बोलण्यापेक्षा ते कळलेही पाहिजेत." तू नेहमी म्हणायचीस.
आपण मित्र की नाही, असं म्हणत बोलणं सुरू करायची हीही एक सवयच. मला एकूणच या अशा शिस्ती जमायच्या नाहीत. त्यामुळंच कदाचित आपल्या प्रत्यक्ष भेटीही संख्येनं फारशा झाल्या नाहीत. इंटरनेटच्या बोलण्यात या शिस्ती पाळणं तर अधिकच मुश्कील. त्यामुळं एक-दोनदा आपण भांडलो होतो. आपली भांडणंही मजेशीरच असायची हे नंतर कळायचं. भांडायचो तसे तावातावानेच. पण मग पुन्हा हे भांडण मुळातच चुकीचं कसं आहे याकडं यायचो. पुन्हा मूळच्या गप्पा सुरू. मग ते भांडण काही केलं तरी मनात घर करायचंच नाही. अगदी खुमारी म्हणून साठवायचं ठरवलं तरी. कारण नंतर बरंच पाणी वाहून जायचं.
अवघ्या सहाएक महिन्यातील ही मैत्री.
एकदा गप्पांमध्ये मी राजकारणाच्या संदर्भात काही बोललो. तुझा नावडता विषय. कळवलास कसा मला? "यॉsssक्क" एवढ्या एका शब्दांतून. तिथून तुझं एक व्यक्तिमत्त्व माझ्यासमोर उभं रहात गेलं. एरवी प्रत्यक्ष बोलण्यात जाणवलेल्या गांभीर्याला, परिपक्वतेला असणारी एक खेळकर छटा. आधीच्या औपचारिक बोलण्यात जिव्हाळा येण्याची, त्या बोलण्याची एक सवय लागण्याची वेळ तीच असावी.
आपण एकमेकांची वैयक्तिक चौकशी कधी केलीच नाही. हा प्रश्न स्वाभाविक येतोच अनेकदा – आपल्यासमोर हिचं जे व्यक्तिमत्त्व उभं आहे, त्यापलीकडं काही असेल का? त्याचं उत्तर हो किंवा नाही असं येत नाही. येतं ते इतकंच, असेलही; तुला त्याच्याशी काय करायचं आहे? मनच म्हणतं, तुझ्याबरोबरच्या मैत्रीत अडसर होत नसेल तर असूदे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा कॅन्व्हास अजून मोठा, तुला न दिसणारा.
तुलाही असंच वाटतं का?
आज वाटतं की, ती चौकशी करायला हवी होती तेव्हाच. कारण, तुझ्या "प्लीज. मला काही दिवस एकटेपणा हवा आहे," या वाक्याची मुळं कुठं तरी तिथं लपलेली असावीत. ‘एकाकी वाटतंय’ ते ‘एकटेपणा हवा’ असा हा प्रवास केलास खरा, पण आपलं आजवरचं बोलणं एक प्रकारे निरर्थक ठरवत? काहीही कारण न सांगताच!
गायकानं त्या दिवशी न गायलेला एक शेर त्या गझलेतलाच आठवलाय आणि मनातील आंदोलनं वाढली आहेत –
कोई बात ऐसी अगर हुई जो तुम्हारे जी को बुरी लगी
तो बयान से पहले ही रूठना तुम्हें याद हो कि न याद हो।
***
तळ्यावर छानसं कवडसं पसरलं आहे. पश्चिमेकडून आलेलं. सूर्य उतरणीला लागला आहे. त्यामुळं किरणं आता सोनेरी झाली आहेत. मघा एक सर कोसळली होती. त्या पार्श्वभूमीवर, ही सोनेरी किरणं केवळ मोहक आहेत. ही किरणं, तळ्यावरचे तरंग, ढोलीकडं परतणारे पोपट आणि एकूणच पाखरांचा चिवचिवाट... संध्याकाळ पुन्हा ताजीतवानी करून टाकते इथं.
लॉगीन करायचं की नाही? लॅपटॉपकडे पहात, मी विचारात पडलो आहे. आठवडाभर केलं नाहीये. केलं की, प्रश्न उभे राहतात, म्हणून ते टाळलं आहे. पण आज करावंही लागेल. मेल तर पहाव्याच लागतील...
***
"प्रिय...
दोन महिने झाले की आपलं बोलणं बंद होऊन.
बोलायचं आहे तुझ्याशी. आधी प्रत्यक्ष बोलावं याच विचारात होते. आठवडा झाला, तू दिसतच नाहीस. मग चौकशी केल्यावर कळलं, तू नाहीयेस दहा दिवस तरी. म्हणून ही मेल. जाण्याआधी अशी मला एक मेल टाकून गेला असतास तर...? पण नाही.
काही दिवस मला एकटेपणा हवा, असं मी म्हटलं होतं. काही दिवस म्हणजे किती? माझ्यासमोरही ते स्पष्ट नव्हतं. प्रश्न होता, उत्तर हवं होतं. उत्तराचा शोध सोपा नव्हता. म्हणून एकटेपणा हवा होता. तुला मुद्दाम हे सांगितलं नव्हतं. कारण तो शोध एकटीनंच करायचा होता.
आपलं मैत्र! प्रश्न तिथूनच सुरू झाला. मोजक्या दोन-तीन भेटींत आपण इतकं कसं बोलू लागलो? प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा, आधी तुझ्याशी संवाद सुरू असतानाही प्रयत्न केला होता. जमलं नाही. उत्तराचा शोध तुझ्याबरोबरच्या बोलण्याकडं घेऊन जायचा. म्हणून एकटेपणा. गेल्या दोन महिन्यात मग या प्रश्नाचं उत्तर समोर येत गेलं. आपण बोलू लागलो, कारण दोघांनाही बोलायचं होतं. गप्पा होत गेल्या. मग जे विषय येत गेले, ते तसेच जगण्याचा भाग बनून राहिले. कादंबरी असो, चित्रं असोत... जगण्याचाच भाग ना तो. न बोललो ते फक्त वैयक्तिक. मी कोण, काय वगैरे; तू कोण, काय वगैरे. त्याची गरजच आपल्या या बोलण्यातून संपत गेली. हे सारं स्फटिकासारखं समोर येत गेलं तसा हा प्रश्न निकालात निघाला. मग बाकीच्या गरजाही संपत गेल्या.
कादंबरीच्या शेवटात मी तुझी बाजू घेतली. तू म्हणालास, ही बाजू कशी निर्माण झाली?  प्रश्न आला. गृहितकं वाढली की काय? मी तुझ्या बाजूची याचा अर्थ तू करशील ते मंजूर. त्यातलं तुझं स्वातंत्र्य मान्य. हा विचार आला तेव्हाच हे स्पष्ट झालं की ते तर गृहीत आहेच. मग बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. ती आणली की आणखी गृहितकांचा प्रदेश सुरू झाला. पण यालाच बोलणं म्हणतात ना रे? की तिथंही अर्थ, अर्थाची छटा तपासत बसायचं? गृहितकांचा प्रदेश विस्तारत न्यायचा? मग बोलणं होईल कसं?
लक्षात येत गेलं आणि सारं सोपं होत गेलं.
मेल संपल्याची खूण म्हणून माझं नाव लिहिलंच पाहिजे?
...
***
दाटून आलेली रात्र आहे आज. एरवी चंद्रप्रकाश असतो. आज तोही नाही. आकाशाकडं पाहिलं की केवळ घनगर्द. डोक्यात विचारांचं काहूरही तसंच. एखादं बोलणं थांबलं की असं होतं का?
एका भेटीत, मला आठवतं, माझ्या या ‘मित्रा’वर – या प्लेयरवर, त्यासोबतच्या हेडफोनवर, तू चिडली होतीस. कायम किमान एका कानाला तो चिकटलेला असतो म्हणून.
तसं इतरही काही विषय निघाले आपल्या बोलण्यात. अर्थात, अशी चर्चा गुणांपेक्षा दोषांचीच होत असते. तेही बरोबरच म्हणा. ज्यापासून लांब रहायचं असे ते दोषच. मग त्यांचीच चर्चा होणार ना! हा प्लेयर हा एक दोषच असावा. माझा.
एका भेटीत, "मी आहे ना इथं, बोलते आहे... तरी हा कानाशी?" तुझा राग. मी काय म्हणालो होतो त्यावेळी आठवत नाही. काही तरी सफाईच असणार ती. निदान त्यावेळच्या स्थितीत तरी. आपण बोलत होतो ना त्यावेळी म्हणून सफाई. आपलं बोलणं औपचारीकच राहिलं असतं तर मी फटकन सांगूनही टाकलं असतं, "तो बरा आहे. कायम साथीला असतो." पण असं नव्हतं झालं त्यादिवशी एवढं नक्की.
आज आत्ताही तोच आहे सोबत...
यूं तो हर लम्हा तेरी यादमें बोझल गुजरा
दिलको महसूस हुई तेरी कमी शाम के बाद...
दौऱ्यानंतर तू परतलीस. आपण भेटू शकलो नाही. प्रदर्शनं जोरदार झाल्याची पार्टी करायची होती आपल्याला. राहिलंच. थेट या एकटेपणात.
***
निरोप घेणं, एक उपचार म्हणून, टाळायचं म्हटलं तरीही टळत नसतंच. तो घ्यावाच लागतो. घेतला नाही तरी, तो घेतल्याच्या खुणा निर्माण होतात, मनात कायम घर करून राहतात. ही मेल असो किंवा आज आत्ता त्या दिवशीच्या कार्यक्रमातील सुरावटींसह मी मनात साठवून घेत असलेल्या या ओळी...
ले चला जान मेरी रुठके जाना तेरा,
ऐसे आनेसे तो बेहतर था न आना तेरा...
हाही निरोपच की... कारण या ‘ले चला’चं सादरीकरण अनेकदा झालं असेल. पण त्या कार्यक्रमातील जागा घ्यायच्या ठरवल्या तर ते एकमेव. अनन्य. त्या अनन्यतेचंच हे वैशिष्ट्य - आपली ओळख त्या दिवशीची.
म्हणून त्या अनन्यतेसह ‘ले चला’ ऐकणं, आत्ता या क्षणी, तुझी ही मेल आल्यानंतर, हा निरोपच!!! ही खूण अशासाठी की, हे ‘ले चला’ तुझ्यासहच येईल.
हेही मला आत्ता कळू लागलंय हे ऐकताना. असं एखादं बोलणं थांबलं की जगण्यातील एक मौज हरपल्याची जाणीव माणसाला होते, असं खूप ऐकलं होतं याआधी. अनुभव पहिल्यांदाच आत्ता. या ‘ले चला’ची त्या कार्यक्रमाआधीची मौज गेली बहुदा...
डोळे धुवून निघाले की दृष्टी स्वच्छ होते. आत्ता सारं काही स्फटिकासारखं स्वच्छ दिसतंय...