दाल तडका

  • तूर डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ प्रत्येकी एक-एक मूठ
  • लसूण ५ पाकळ्या
  • तिखट १ टीस्पून
  • तेल १ डाव
  • कोथिंबीर दोन टेबल स्पून
  • हळद अर्धा टी स्पून
  • मीठ चवीनुसार.
  • पांढरे जीरे दीड टी स्पून
  • मोहरी १ टी स्पून
३० मिनिटे
६-७ जणांसाठी

सर्व डाळी तासभर एकत्र भिजत ठेवा.

नंतर, त्यात हळद आणि मीठ घालून, प्रेशर कुकर मध्ये चार शिट्ट्यांवर मऊ शिजवून घ्या. शिजल्यावर जरा थंड होऊ द्या आणि नंतर, मिक्सरवर पूर्णपणे वाटून घ्या. आता एक तजेलदार पिवळ्याधमक, रंगाचा पदार्थ तयार झाला आहे.

ही 'दाल' पाणी घालून सारखी करून घ्या. जरा दाटसरच राहू द्या. टेबल वर घ्यायच्या बाऊल मध्ये काढून घ्या.

लसून पाकळ्या बारीक चॉप करून घ्या. लसूणाचा प्रत्येक बारीक तुकडा तुरीच्या डाळीपेक्षा मोठा नसावा.

एका कढल्यात तेल गरम करून घ्या. तेल चांगले तापले की त्यात मोहरी आणि पांढरे जिरे टाकवे. ते चांगले तडतडले आणि जिऱ्याचा सुगंध आला की लसूण टाकून चांगला लाल (काळपट लाल) होई पर्यंत तळावा. नंतर, गॅस बंद करून तिखट टाकावे. तिखट जसे रंग बदलून काळेपणाकडे झूकू लागेल तसे लगेच हा 'तडका' बाऊल मध्ये काढून ठेवलेल्या 'दाल' वर मध्यभागी ओतावा. (ढवळू नये). वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. ही 'दाल तडका' तशीच टेबलवर घ्यावी. आणि प्रत्यक्ष जेवताना सर्वांसमक्ष ढवळून भातावर वाढावी. 

शुभेच्छा....! 

हा पंजाबी पदार्थ आहे. यात हिंग, कढीलिंब, आमसूल, गूळ अशा गोष्टी घालत नाहीत. परंतु, आपल्या आवडीनुसार हिंग आणि कढीलिंब घालायला हरकत नाही. (आमसूल, गूळ घालू नये.) कांही जणं आल्याचे, काड्यापेटीतल्या काडीसारखे, ( याला 'ज्युलियन्स' म्हणतात) तुकडे घालतात. हे सर्व घालायचे झाल्यास फोडणीत जीरे-मोहरी नंतर आणि लसूणाच्या आधी घालावे.

आंबटपणा साठी चॉप केलेला टोमॅटो घालायला हरकत नाही. पण त्याने 'दाल' चा रंग पिवळाधम्मक न राहाता लालसर होतो आणि 'तडक्याचा' दृष्य परिणाम कमी होतो. पिवळ्या डाळीवर, लाल तडका आणि हिरवी कोथिंबीर उच्च दृष्य परिणाम साधते. मला तसे आवडते. आंबटपणासाठी ताटात लिंबाची फोड घेणे मी पसंद करतो.

गरम गरम भातावर हा 'दाल-तडका' आणि बरोबर तळलेला पापड आणि आवडत्या लोणच्याची फोड, आत्ताच नुसत्या आठवणीने जीभ जमीनीपर्यंत घरंगळते आहे.....

संशोधन.