काळ्यांचे गोरेपण

काळा आणि गोरा. दोन विरुद्ध अर्थाचे शब्द. काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहिले जाते. काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा रंग उठून दिसतो. तसेच पांढऱ्या पडद्यावर काळा रंग उठून दिसतो. दोन्ही ही रंग एकमेकांना पूरक आहेत. काळा फळा नसेल तर पांढऱ्या खडूने लिहिणार कशावर ? काळाकुट्ट अंधार असतो. नंतर सूर्यप्रकाश पडतो. तसेच मनुष्याचे आहे. काळा माणूस आणि गोरा माणूस. गोऱ्या कातडीचे लोक आकर्षित होतात. काळ्या रंगाचा माणूस अप्रिय वाटतो. असा सर्वसामान्य माणसाचा अभिप्राय असतो. निसर्गात सर्व तऱ्हेचे रंग आढळतात. गाढवाचा रंग पांढरा असतो. काळ्या रंगाचेही गाढव असते. काळे आडनावाचे लोक गोरे असतात आणि गोरे आडनावाचे लोक वर्णाने काळे असतात असे दिसून येते.

माझ्या एका मित्राच्या हुशार मुलीचे केवळ ती काळी आहे या एकाच गोष्टीमुळे अनेक दिवस लग्न जमत नव्हते. खरच असं काय असतं काळ्या रंगात की लोकांनी नाकं मुरडावीत ? विचार करायला लागल्यावर मला तर त्या काळ्या रंगात चांगलेपणा दिसायला लागला. वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देणारे सुस्वर काळ्या कोकीळ पक्षाच्या कंठातूनच उमटतात. पावसाळ्यापूर्वी आकाशातील काळ्या मेघांची दाटी बघूनच मोर आनंदाचे आपला पिसारा फुलवून नाचू लागतात. धरतीला नवजीवन देणारा पाऊस पडतो तो काळ्या ढगातूनच आणि या पावसामुळे पीक येतं ते सुद्धा काळ्या मातीतूनच. संगमरवराचा पांढरा दगड मंदिर बांधायला उपयोगी पडत असेल पण पूजेचा मान असतो तो मात्र शाळीग्रामाच्या काळ्याभोर दगडाला. विठ्ठल, कृष्ण, शिवलिंग ही काळीच असतात. स्त्रीच सौभाग्यचिन्ह असलेली पोत काळ्या रंगाच्या मण्याचीच असते. लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून लावण्यात येणारी तीट काळीच असते. इतकेच काय मृतात्म्याला मुक्ती मिळावी म्हणून करण्यात येणाऱ्या पिंडदानाच्या वेळी मान मिळतो तो काळ्या कावळ्यालाच. पांढऱ्या बगळ्याला, बदकाला किंवा राजहंसाला नाही. विचार करता करता काळ्या रंगाच हे गोरेपण अधिकाधिक जाणवायला लागतं आणि संत चोखामेळ्याच्या "काय भुललासी वरलिया रंगा" या उक्तीची प्रचीति आल्यावाचून राहत नाही.

_नारायण भु. भालेराव