कारवारी मसाल्यातील तोंडली

  • कारवारी मसाल्यासाठी : अधपाव किलो धणे, १ वाटी किसलेले सुके खोबरे, १५ ते २० लाल मिरच्या, मीठ
  • तोंडली पाव किलो
  • फोडणीचे साहित्य : तेल, मोहरी, हळद
  • १ चिंचेचा कोळ
  • चवीप्रमाणे मीठ, वरून घालायला ओले खोबरे (आवडत असल्यास)
३० मिनिटे
२ लोकांसाठी

प्रथम कारवारी मसाला बनवून घ्यावा. धणे, लाल मिरच्या व सुके खोबरे वेगवेगळे तेलावर खरपूस परतून घ्यावेत. त्यांना मिक्सरमधून, मीठ घालून बारीक करून घ्यावे. हा झाला मसाला तयार. हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास व्यवस्थित टिकतो. फ्रीज मध्येही ठेवू शकता.
आता तोंडली बारीक उभी चिरून वाफवून घ्यावीत.
(मूळ रेसिपीत ती तळून घेतात. पण आपण तेलाचा वापर कमी करण्यासाठी वाफवून घेऊ.)
वाफवलेली तोंडली फोडणीस घालून चांगली परतून घ्यावीत. त्यात आता हा मसाला अंदाजाने घालावा (साधारण २ ते ३ चमचे). शिजवावा. चिंचेचा कोळ घालावा. मीठ वरून कमीच घालावे, कारण मसाल्यात अगोदरच मीठ असते. वाफ येउ द्यावी. वरून ओले खोबरे आवडत असल्यास घालावे. अतिशय चमचमीत अशी ही भाजी पोळी, भाकरी, भात, ब्रेड याबरोबर छान लागते व नुसती सुद्धा मस्त लागते.

हीच कृती वापरून, भेंडी, पडवळ, फ्लॉवर ची भाजीही बनविता येते. भेंडी वाफवून न घेता फोडणीत परतावी व त्यात मसाला घालावा. माझ्या मते पनीर, मश्रूम्स, सोया ग्रॅन्यूल्स वापरून देखील ही भाजी करून बघायला हरकत नाही. कांदा तळून/ खरपूस तांबूस परतून ह्या भाज्यांत घातल्यास अजून वेगळी चव येईल. मसाला एकच.... पण रेसिपीज अनेक!!

आई