माझं मी पण

असं माझं 'मी' पण
नकोच आहे मला
ज्याच्या अस्तित्वाच्या खुणा
कुणाला बोचत राहतील
माझ्या नजरेत
'अहंकार ' नकोच आहे मला
कुणाला तरी जो सतत
अपमानित करेल
'माझं' कर्तृत्व 'माझं' नेतृत्व
सारं फक्त 'माझं' कधी असू नये
कुणाच्या मनावर त्याचं
ओझं कधी असू नये
मला नम्र होता यावं
थकल्या भागल्या चरणांपाशी
लीन होता यावं
परमेशाच्या कृपेपाशी
माझं 'मी' पण सरून जावं
आसमंती भरून जावं