होमिंग पिजन - कुशल वाटाड्या कबुतर

कबुतराच्या अचूकतेने घरी परतण्याच्या कुशलतेची माहिती मानवाला खूप आधी पासून होती असे दिसते. ह्या कुशलतेचा वापर मानवाने लगेचच केला. ज्यांना हे कळले की, कबूतरांमध्येच असे काहीतरी विशेष आहे त्यांची स्तुती केलीच पाहिजे. इजिप्त्शियन संस्कृतीत कबुतरांचा वापर झाल्याचे दाखले आहेत. भारतीय पुराणात काही दाखले आहेत की नाही माहीत नाही.
दुसऱ्या विश्वव्यापक युद्धात जर्मनीने कबुतरांचा वापर निरोप्या म्हणून तर केलाच पण त्यांच्या मानेखाली बटू-क्यामेरे लावून चित्रफीत मिळवली व युद्धात ह्या माहितीचा वापर केला. भारतात ओरिसातील पोलिस खाते कबुतरांचा वापर दुर्गम भागातील ख्याली-खुशाली कळवण्यासाठी अगदी अलीकडे पर्यंत करत होते पण आंतर्जालाच्या माध्यमाने ती गरज आता उरली नाही. 
ह्या कबुतरांबद्दल माझे कुतूहल परवा चाळवले गेले ते गूगलच्या सर्च इंजिनबद्दल आमची चर्चा सुरू होती तेव्हा. एकाने माहिती पुरवली की, गूगलच्या ऑफिसमध्ये काही कबुतरे मुद्दाम "पाळली" आहेत व त्यांच्या ह्या घर शोधण्याच्या कुशलतेने प्रोत्साहन मिळावे अशी त्यांची धारणा आहे. मला कौतुक तर वाटलेच, पण ते कबुतर पाळण्याचे आणि त्यामागची भूमिका ऐकून नव्हे तर, कबुतरांची घाण कोण साफ करत असेल आणि एअर कुलिंग सिस्टीममधून त्याचा वास सर्वत्र पसरू नये म्हणून घेतलेली असावी त्या काळजीचे. 
कबुतरं अर्थातच आपल्याला हव्या त्या व त्यांच्या दृष्टीने नव्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत- त्यांना घरी परतायची कला येते. काही ठिकाणी कबुतरांच्या शर्यतीही लावल्या जातात व १८०० किमी पेक्षा जास्त अंतर त्यांना पार करून अचूकतेने व वेगाने परतायचे असते. मालकाला भरघोस बक्षीस मिळते. अर्थातच हे खूपच अचंबित करणारे आहे कारण, त्यांची जी काही विदा साठवण्याची पद्धत आहे त्याच्या वापराने ते १८०० किमी पर्यंतचा विदा ते लक्षात ठेवू शकतात व विदा परत मिळवून त्याचा वापर करू शकतात. 
मानवाला त्यांच्या ह्या कुशलतेचे नेहमीच कुतूहल वाटत आले आहे व अनेकांनी त्यांच्या ह्या वाटाडेगिरीचा छडा लावण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत. काही प्रयोगांमध्ये त्यांना भूलीचे औषध देऊन, तर काही वेळा दोन्ही- भूल व झाकून नेऊन त्यांच्या घरापासून लांब नेले तरी ते अचूकतेने घरी परतले. असा एक समज आहे की ते त्यांच्या घराचे ठिकाण कोऑर्डीनेट (अक्षांश-रेखांश) लक्षात ठेवतात व त्यासाठी ते सूर्याच्या फिरण्याच्या कक्षाच्या/ स्थितीचा अथवा त्याबरोबरच पृथ्वीच्या चूंबकीय शक्तीचा वापर करतात. 
प्रवास करताना ते खूपसे सरळ रेषेत उडतात, जणू काही त्यांना त्यांच्या घराच्या ठिकाणाबद्दल आत्मविश्वास असतो. त्यांचा मागोवा विमानाने केला गेला आहे व त्यातून असे निष्कर्ष काढले गेले आहेत. घरी परतताना ते दिवसाच उडण्याचे पसंत करतात (शिकवले तर रात्रीही उडतात), जोराचा पाऊस असेल तर विश्रांती घेतात व वाऱ्याची दिशा कशीही असली तरी ते उडू शकतात असे दिसून आले आहे.
एकावेळेस एकापेक्षा जास्त कबुतरे त्यांच्या घरापासून दूर नेऊन जर एकाच वेळेस सोडली तर सगळी कबुतरे घरी परततात पण थोड्या विखुरलेल्या वेगळ्या वाटा प्रत्येक कबुतर निवडते. (ते रांगेने एकामागोमाग उडत नाहीत). 
अनेकांचा कबुतरांच्या ह्या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न आजही चालू आहे पण अजून खात्रीने कोणीच काही सांगू शकलेले नाही. मला वाटते की, कबुतराला बोलता आले तरच त्या रहस्याचा उलगडा होईल.