फारसा वाटेत नाही आमचा वाडा
पण तरी रुंदीकरण करताय तर पाडा
माल यालाही नकोसा आणि त्यालाही
जीवनाचा न्यायचा आता कुठे गाडा?
गप्प बसण्याने कुणाला कीव येते का?
ओरडा, भोकाड पसरा, पायही झाडा
पादचारी मार्ग नाही या मनामध्ये
फेरिवाल्यांनो इथे घालू नका राडा
घेतली तालीम ज्याची ते कुठे घडते?
पोचतो जेथे तिथे भलताच आखाडा
काय जाणे त्या जुन्या वस्तू कुठे गेल्या?
राहिला नाही अता भिंतीस कोनाडा
रक्तदाबाची जराशी चाचणी घेऊ
एकदा माझ्यासमोरी घाल अंबाडा
काव्य साकारेल माझा धूर वा माती
मारुनी जाळा मला किंवा मला गाडा
ठेवली असती तुझी जागा मनामध्ये
जन्मभर झाला तुझा प्रेमातला खाडा
'बेफिकिर' मागून घे आधार गझलेचा
आपला बदलायला आलाय सांगाडा
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वाह
प्रे. चक्रधर१ (बुध., ०३/०२/२०१० - १२:०२).
पण तरी रुंदीकरण करताय तर पाडा
प्रे. प्रणव सदाशिव काळे (बुध., ०३/०२/२०१० - १५:५७).
रक्तदाबाची जराशी..
प्रे. सतीश वाघमारे (बुध., ०३/०२/२०१० - १८:१४).
सुंदर
प्रे. आनंद राजगोळे (गुरु., ०४/०२/२०१० - ०३:४८).
मस्तच
प्रे. गंगाधर मुटे (बुध., १०/०२/२०१० - १६:२६).
व्वा !
प्रे. कोहं (शुक्र., १२/०२/२०१० - ११:३६).