फेब्रुवारी ११ २०१०

सप्त-व्याहृती...६.

ह्यासोबत
सप्त व्याहृती: ६
महः      ही चौथी व्याहृती. ‘महत्’ या पदाने उच्चता, विशालता आदींचा बोध होतो. या पदाच्या इतर अर्थांमध्ये अर्पण, यज्ञ, प्रकाश, तेज, ज्योती, वैदिक किंवा स्तुतीपर मंत्र, आनंद, सुख, प्रसन्नता, शक्ती, सामर्थ्य, बहुलता, जल, उदक असेही अर्थ असल्याचे सांगून पंडितजी स्पष्ट करतात की, या पदाचे मुख्य अर्थ महत्व, सामर्थ्य, मोठेपण, विशालता हेच असून इतर जे अर्थ आहेत ते मुख्य अर्थाचे म्हणजेच अस्तित्व, ज्ञान व शुभ कर्म यांचे सहायक असून महः या पदाचे अर्थ संकोचाच्या विरुद्ध आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे महत् या पदातून उच्च स्थानात्मक किंवा आकारात्मक तसेच गुणात्मक वर्णन केलेले असते.
 उपनिषदांतील वचनांतून महः या पदाचा वापर करताना ‘महर्’ किंवा ‘महस्’ असे संधी-रूपांतर केलेले दिसते, जसे, नाभी देशे महर्जगत् (नाभीजवळच्या स्थानाला महर म्हणतात) किंवा समहर्लोके जयति (तो महर्लोक जिंकतो) आणि ब्रम्हणे त्वा महसे (ब्रह्मच महः आहे). यावरून असे दिसते की, महर् पद स्थानविशेषात्मक आहे तर महस् हे गुणात्मक वर्णन करणारे आहे. ऋग्वेदातील एक मंत्र पाहा:
                                      अ-ज्येष्ठासो अ-कनिष्ठासो एतेऽमध्यमासो महसाविवावृधुः ।
                                     सुजातासो जनुषा पृश्निमातरो दिवोमर्षा आनोअच्छा जिगातना ॥ (ऋ. ५. ५. ९. ६)
            - हे वीर आहेत, यांत कोणी श्रेष्ठ, कोणी मध्यम, कोणी कनिष्ठ असा नाही. सर्व वीर समान आहेत. हे आपले महत्त्व वाढवितात, त्याच्या जोडीने त्याच्या वीर वाढतात. ते जन्माने कुलीन आहेत, भूमीला माता मानणारे हे दिव्य वीर येऊन आमच्याबरोबर येऊन राहोत.
 या ऋचेचा अर्थ लक्षात घेता वीरांच्या ठिकाणी जे गुण हवेत, त्याचा बोध होतो. गुणांनी सर्व समान असणे, उच्च-नीच भाव नसणे, मातृभूमीला माता मानून तिच्या उन्नतीकरता प्राणार्पण करण्यास सिद्ध असणे हे गुण ज्या वीरांमध्ये असतात, त्यांना महत्त्व प्राप्त होत असते. अन्य एका मंत्रात म्हटले आहे की, सत्रा महांसी चक्रिरे तनूषू (त्या वीरांनी एकाच वेळी आपल्या देहातून आपले सामर्थ्य प्रकट केले) किंवा प्रबुध्न्या व ईरते महांसी (आपले सामर्थ्य चारी बाजूस पसरले आहे) किंवा महो देवस्य पूर्व्यस्य धाम (महः हे पूर्वदेवाचे-पुराणपुरुषाचे-सूर्याचे स्थान आहे) किंवा अयक्ष्मतातिं मह इह धत्तम (यक्ष्मादी रोग-रहित म्हणजे क्षयासारख्या रोगांनी ग्रस्त नसलेले, निरोगी महासामर्थ्य येथे धारण करून ठेवा). पंडितजी अथर्ववेदातील एक ऋचा उद्धृत करतात -
                                         तपसा ये अनाधृष्यास्तपसा ये स्वर्ययुः ।
                                         तपो ये चक्रिरे महः ॥(१८. २. १६)
             - तप करून ते स्वर्गाला जातात, तपापासून जे कधी परावृत्त होत नाहीत ते तपाने महासामर्थ्य मिळवितात.
 पंडितजी हे सर्व अर्थ देऊन पुष्टी करतात की, वेदांतील मंत्रातून बहुधा अनेक ठिकाणी महः या पदातून आत्मसामर्थ्याचा भाव प्रकट केलेला दिसतो आणि मानवाने अस्तित्व-ज्ञानपूर्वक कर्म-आत्मप्रकाशानंतर (भूः भुवः स्वः नंतर) महत्ता प्राप्त केली पाहिजे.
          
जनः              ही पांचवी व्याहृती. अस्तित्व, ज्ञानार्जन, स्वतःची विशिष्ट ओळख तयार करणे, समाजात स्वकर्तृत्वाने महत्ता प्राप्त करून  घेणे आणि अशी पात्रता लाभल्यानंतर जनः व्याहृती संकेत देते, तो दोन अर्थांचा, एक संतती आणि दुसरा लोकसंग्रह. ’स जनलोकं जयति।’ किंवा ’जनश्च नारायणः’ किंवा ’जनोलोकस्तु हृद्देशे’ या वचनांतून हे अर्थ दाखविले जातात. जनलोक जिंकणे यात आपण राहातो त्या वास्तव्याचे ठिकाणी जे राहातात, त्यांना जिंकणे हे जसे अभिप्रेत आहे तसेच सर्वदूर पसरलेल्या जनांना जिंकणे, त्यांच्यावर छाप पाडणे, हेही अभिप्रेत आहे. असे जन जिंकणे हे तेव्हाच शक्य असते, जेव्हा एखाद्याच्या अंगी लोकोत्तर गुण असतील तसेच सामर्थ्यही असेल. (ब्रह्मचर्याश्रमात राहून ही पात्रता कमावली जात होती. ) दुसऱ्या वचनात जनः पदाबरोबर नारायण पदाची योजना केली आहे. त्यातून दिसणारा अर्थ हेच दाखवितो की, नारायण हा यच्चयावत् जीवमात्रांचा पोशिंदा आहे, पालनकर्ता आहे. म्हणून इतरांचे पालन करण्याची क्षमता माणसाच्या ठिकाणी यावयास हवी. हे साध्य झाले की, स्वाभाविकतःच लोकांच्या प्रेमास, आदरास अशी समर्थ व्यक्ती पात्र होते. ती त्यांच्या हृदयात वास करू लागते. जनोलोकस्तु हृद्देशे या वचनातून हे प्रेमादराचे स्थान प्राप्त करून घ्यावे, असे सुचविले आहे. संतती ही वैयक्तिक जीवनात समाजवृद्धीसाठी आवश्यक असते. ही संतती निर्माण करण्यासाठी स्त्री-पुरुष सुस्थीर, सुसंस्कारित, समर्थ असतील तर, सर्वोत्कृष्ट संतती लाभून राष्ट्राचा कायापालट होत असतो. श्रेष्ठ प्रजा निर्माण करणे हेच मनुष्याचे कर्तव्य आहे.
 प्रजननाने आपल्यासारख्या जातीची उत्पत्ती होते. मनुष्यापासून मनुष्य, कुत्र्यापासून कुत्रे, घोड्यापासून घोडा वगैरे. हे प्रजनन स्वाभाविक आहे. जनः या संकेतपदाने येथे प्रजनन केव्हा करावे, हे सूचित केले आहे. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी ही शुद्ध, बलवान् करावीत; ती संयमशील, समर्थ, प्रगतीशील, श्रेष्ठ, प्रभावी करावीत. मनुष्याची निसर्गप्रवृत्ती याप्रमाणे परिशुद्ध करून तिच्याकडून सर्वोत्कृष्ट कार्य करून घेण्याचा हा विधी आहे. यामुळे मानवसमाज उन्नतावस्थेला पोहोचत असतो, तो कधीही पतित होत नाही. या उन्नतावस्थेला पोहोचण्याचा हा सांकेतिक साधनमार्ग या व्याहृती निर्देशित करतात.

Post to Feed
Typing help hide