मिश्र कडधान्य सलाड

  • पाव कप चवळी, पाव कप राजमा व पाव कप हिरवे मूग
  • एक कांदा उभा चिरून
  • अधपाव किलो श्रावण घेवडा
  • दोन हिरव्या मिरच्या
  • तीन टेबलस्पून लिंबाचा रस
  • पुदिना पाने पाव ते अर्धा कप
  • कोथिंबीर पाने पाव कप
  • चाट मसाला, मीठ चवीनुसार
३० मिनिटे
तीन माणसांसाठी

राजमा व चवळी आदल्या रात्री वेगवेगळे भिजत घालावेत.  हिरवे मूग धुवून किमान तीन ते चार तास अगोदर भिजवावेत.
मीठाच्या पाण्यात तिन्ही कडधान्ये वेगवेगळी व्यवस्थित शिजवून घ्यावीत.  
श्रावण घेवड्याच्या शिरा काढून प्रत्येक शेंगेचे साधारण चार तुकडे करावेत. त्यांनाही मीठाच्या पाण्यात व्यवस्थित शिजवावे. शिजल्यावर जास्तीचे पाणी काढावे व शिजलेल्या घेवड्याला थंड पाण्याखाली धरावे. नंतर पाणी काढून बाजूला ठेवावे.
कांदा उभा चिरून घ्यावा.
कोथिंबीर, पुदिना पाने धुवून चिरून घ्यावीत. हिरव्या मिरच्याही धुवून, कोरड्या करून बारीक चिराव्यात.
लिंबाच्या रसात तितकेच पाणी मिसळावे. त्यात कोथिंबीर, पुदिन्याची पाने, चिरलेल्या मिरच्या व चाट मसाला घालून नीट मिसळावे व हे सलाडचे ड्रेसिंग फ्रीजमध्ये किमान तासभर तरी गार होण्यास ठेवावे.

वाढायच्या अगोदर सर्व शिजवलेली कडधान्ये, घेवडा, कांदा व सलाड ड्रेसिंग एकत्र मिसळावे.

आवडत असल्यास ह्या सलाडात इतर भाज्या देखील वापरू शकता. दुपारच्या जेवणात, नाश्त्याच्या वेळेस उपयुक्त. तसेच जेवणाऐवजीही खाऊ शकता. कांदा वगळल्यास डब्यात न्यायलाही चांगले.