संजय क्षीरसागर यांच्या लेखमालेतून झालेले विचारमंथन

श्री. संजय क्षीरसागर यांची एक सुरेख लेखमाला मनोगतावर वाचायला मिळत आहे. निराकाराचा बोध, जाणीवेने जाणीवेला जाणणे यावरचे त्यांचे भाष्य परत परत वाचण्यासारखे आहे. या लेखमालेच्या विचारमंथनातून मला सुचलेले विचार येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

जीवनाचे गणित उत्तम तऱ्हेने सोड्वून, सुखी जीवन जगण्यासाठी जाणीवेने जाणीवेला जाणणे ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. " तू मन मी ची करी, माझिये भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते " असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. हे मन मी ची करी म्हणजे जाणीवेने जाणीवेला जाणणे आणि सर्वत्र आपणच भरून राहीलो आहोत हे उमजणे. परंतु ही गोष्ट बाजारात जावून भाजी आणण्याइतकी सोपी नाही. हा एक मोठा आणि महत्वाचा अभ्यास आहे.

स्वतःच्या विसरात जाणीव आपल्याच ठायी आनंद आहे हे विसरली आणि बहिर्मुख होऊन आनंदाच्या शोधार्थ भरकटू लागली. हातचा एक धरायला विसरले की संपुर्ण गणित चुकते तसे जाणीव जाणीवेला विसरली आणि संपूर्ण जीवनाचे गणित चुकले. सुख कणभर आणि दुःख मणभर अशी ज्याची त्याची अवस्था झाली.

एक राजा होता, त्याला भ्रम झाला आणि तो भ्रमात स्वतःला भिकारी समजू लागला, जोपर्यंत राजाला आपण भिकारी आहोत असा भ्रम आहे तोपर्यंत त्याला राजेपणाचे सुख नाही आणि भिकारीपणाचा भोग, दैन्य आणि दुःख आहे. राजाला त्याचे राजेपण परत लाभण्यासाठी नुसते त्याला तू राजा आहेस भिकारी नाहीस असे सांगून चालणार नाही तर त्यावर योग्य ते औषधोपचार झाले पाहिजेत निष्णात मानसोपचारतज्ञाकडून.

आपणही शरीर ही उपाधी धारण करण्याच्या प्रक्रियेत स्वतःच्या मुळ स्वरुपाला पूर्णपणे विसरलो, भ्रमिष्ट झालो व शरीर म्हणजे मी असे समजु लागलो. जन्मल्यापासून मी अमुक या हाकेने बहिर्मुख झाल्यापासून अनेक विचार आणि संस्कारांचे थप्पेच्या थप्पे जाणिवेवर थापले गेले आणि स्वतःसाठी आणि इतरांसाठी अनेक प्रश्न निर्माण करत आणि त्याच्या जाळ्यात स्वतःला गुरफटवत मनात रुपांतरित झालेल्या जाणीवेने स्वतःसाठी आणि इतरांसाठी दुःख निर्माण केले. आज मोठ्याप्रमाणात असलेले विचार प्रदुषण हे या अशुद्ध जाणीवेचेच साम्राज्य आहे. ही अशुद्ध जाणीव शुद्ध झाल्याशिवाय आणि जाणिवेने स्वतःला जाणीवपुर्वक जाणल्याशिवाय जगातल्या कुठल्याही समस्या सुटणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. माणसामाणसातील विषमतेचे विष, सहजीवनाचा वाजलेला बोऱ्या, भांडण, मारामाऱ्या, दंगेधोपे, लढाया, आतंकवाद या सर्वामागचे एक आणि एकमेव कारण स्वतःच्या विसरात जाणीवेचे भरकटणे. भ्रमिष्ट राजासारखेच आपले झाले.

आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी आपली उपचारांची दिशा आहे. मग यावर खरा उपाय कोणता? ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात यावर उत्तर देतात, " संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे " संतांकडून, शाब्दे परेच निष्णात सदगुरू कडून जाणीवेला हाताळायचे कसे हे शिकणे. मी सत चित आनंद स्वरूप असून जगात जे जे काही आहे ते माझ्यातून निर्माण होते आणि माझ्यात लय पावते. याचे ज्ञान होणे गरजेचे आहे. हे ज्ञान देतात तेच खरे सदगुरु. " गुरू तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान " हे सदगुरू असतात कसे ? तेही ज्ञानेश्वर महाराजानी सांगीतले आहे, " ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूसपण भांब लौकिक भागु "

अश्या सदगुरुंकडून ज्ञान संपादन करून घेणे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येकाचा तो स्वधर्म आहे. सत चित आनंद पदवी घेण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " मनुष्यदेहाचिनी अंगे सत चित आनंद पदवी घेणे "

मग याची सुरवात कशी करायची ? तुकाराम महाराज म्हणतात, " बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त , तया सुखा अंत पार नाही "

शुद्ध करी चित्त म्हणजे अखंड शुभ विचाराने जाणीवेचे शुद्धीकरण करणे आणि उत्तम मार्गदर्शकाला चित्तात घट्ट धरून सत चित आनंद पदवी प्राप्त करून घेणे.

सर्वाना सत चित आनंद पदवी या जन्मात प्राप्त होवो या सदिच्छेने हा लेख समाप्त करते.

माझे सदगुरू श्री. वामनराव पै यांच्या प्रबोधनातून मला जो बोध झाला त्यावर आधारित हा लेख आहे.