कोळंबी रस्सा

  • कोळंबी - अर्धा किलो
  • कांदे (मध्यम आकाराचे) - चार
  • आमसुले - पंधरा
  • आले-लसूण पेस्ट - एक मोठा चमचा
  • नारळाचे घट्ट दूध - तीन वाट्या
  • हळद, तिखट, मीठ
  • तेल - एक डाव
४५ मिनिटे
दोन जणांना पोटभर

कोळंबी स्वच्छ धुऊन घ्यावी.
कांदा मिक्सरमधून काढून घ्यावा.
आमसुले वाटीभर पाण्यात पंधरा मिनिटे भिजवावीत. मग आमसुले पिळून वेगळी करावीत.
तेल तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करावी आणि हलक्या हाताने कांद्याची पेस्ट घालून हलवावी.
त्यात हळद, तिखट आणि आले-लसूण पेस्ट घालावी. ज्योत मोठी करावी.
कांदा गुलाबी/लाल झाल्यावर त्यात आमसुलाचे पाणी घालून सारखे करावे आणि नारळाचे दूध घालावे. एक उकळी आणावी.
त्यात कोलंबी घालून सारखे करावे. चवीपुरते मीठ घालावे. ज्योत बारीक करावी.
पाच ते सात मिनिटे झाल्यावर कोळंबी शिजल्याची खात्री करावी आणि ज्योत बंद करावी.
कोळंबी चटकन शिजते. आणि जास्त शिजवल्यास चामट होते.

(१) सोबत आजऱ्याचा जिरग्या तांदळाचा भात किंवा ताजी तांदळाची भाकरी असल्यास परमानंद.
(२) कोळंबीला स्वतःची अशी एक चव असते. या रश्श्यात ती चव आल्या-लसणाने अधोरेखित होते. कोळंबीची अंगभूत चव झाकणारे कुठलेही घटक यात नसल्याने एरवी मसाल्यात बुडवलेली कोळंबी खाण्याची सवय लागलेल्या लोकांना हा रस्सा विचित्र वाटेल. त्यांनी या वाटेला जाऊ नये हेच बरे आणि खरे.

स्वप्रयोग