परका

टेक्सास मधल्या माझ्या घराजवळ सकाळी फेरफटका मारत असताना

एक
'व्हाइट' समोरून येतो.

स्थूल, सुखवस्तु, नक्कीच श्रीमंत, बाहेरचं जग
पाहण्याची गरज न भासलेला, कसल्यातरी स्वामित्वाचा हक्क नकळत तोंडावर
बाळगणारा

मी किंचित परकेपणाच्या जाणिवेने दबलेला, म्हणूनच ती जाणीव
दिसू नये याची काळजी घेण्यासाठी

त्याला 'Good Morning' म्हणतो.

त्याचं कदाचित
लक्ष नाही, कदाचित ते असून नसल्यासारखं, कदाचित ते मुद्दाम नसल्यासारखं

कुणास
ठाऊक

तो तसाच पुढे निघून जातो.

मी चालत राहतो, आणखी तीव्र
झालेली परकेपणाची भावना अंगावर वागवत, दुखावलेला अहंकार कुरवाळत

काही
अंतरावरून येणारा एक 'मेक्सिकन'

बुटावर रंगाचे डाग पडलेले, कपडे
यथातथाच, बहुतेक 'ब्लू कॉलर'

त्याच्याही चेहर्यावर तसेच परकेपणाचे
भाव

त्यालाही कदाचित  ''Good Morning' म्हणायचे असावे

मी
आपल्या अहंकाराच्या कोषात स्वतःला गुरफटून घेऊन

त्याच्याकडे न बघता
पुढे जातो.

इतिहासाने लादलेले पूर्वग्रह भिरकावून देण्याची आणखी एक
संधी मी गमावलेली असते.