कोण म्हणतो...

कोण म्हणतो मद्यपी शुद्धीत नाही ?
लोकहो, ही बोलण्याची रीत नाही

हाच केवळ भेद आहे आपल्यातिल
पाप करतो मी उघड, रात्रीत नाही

राहिलो मी नेहमी मागे जगाच्या
छोड दो*, मीही तसा घाईत नाही

तोल गेला हे कुठे नाकारले मी
(तोल जाण्याची मजा शिस्तीत नाही)

पत्र देवाने मला लिहिले कितीदा
स्पॅम समजून मीच पण वाचीत नाही

पाहुण्याच्या देव असण्याचा पुरावा ?
सोमप्याल्यावीण काही पीत नाही !

सांग, कोहम्, सांग भारतमाय हल्ली
बोस, गांधी अन् भगत का वीत नाही

* - ज्यांना दोन परभाषिक शब्द वाचूनही अंगावर झुरळ पडल्यासारखे वाटत असेल त्यांनी ही ओळ

'जाउ द्या, मीही तसा घाईत नाही'

अशी वाचावी व झुरळ झटकून टाकावे ही विनंती.