ही लपवाछपवी कशासाठी?

टोपणाचं काम फक्त बूचासारखं, बाटलीबंद करून आतल्या द्रावाची ओळख लपविण्यापुरतं!
मी म्हणतो हे झाकण आपल्या ओळखीला तुम्ही लावताच का म्हणून? अरे आपण सिँहाचे छावे आहोत, समोरासमोर गर्जना करायची आपण! आपण सगळे मराठमोळे मावळे आहोत, खऱ्या समशेरी घेऊन हल्ला करायचा आपण! आपल्या आवाजात आसमंत दणाणून टाकणारी जरब असावी, वाघाची ती डरकाळी व्हावी, मांजराची मँव मँव नको!
मग कशाला हे वाघाचं बेगडी कातडं पांघरता? ही लपवाछपवी कशासाठी? अरे स्वतःची ओळख ठासून सांगा.. अशी पुळचट अन हास्यास्पद नावे धारण करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व दुभंगू देऊ नका. जे बोलायचंय ते स्वतःच्या खऱ्या ओळखिनिशी बोला. उद्या कुणी विचारले तुम्ही कोण तर आंतरजालावर लिहिणारा मी 'बुळचट ससा' आहे अशी ओळख सांगावी लागू नये म्हणजे मिळवली!
नावसाठी ही 'गोषा'पद्धत कशासाठी? प्रत्येकाकडे स्वतःची उत्तम प्रतिभा आहे, ती अशा 'ढक्कणा'खाली झाकून ठेऊ नका. कोंडलेली वाफ स्वतःच्या ओळखीने प्रकट करा... वाघनख्या धारण करून गुदगुल्या करू नका म्हणजे झालं..!
टोपण नावांचे फायदे तोटे यावर सन्माननीय नेटकरांनी स्वओळखीने चर्चा करावी...
                                                                                    डॉ. श्रीराम दिवटे.