तू माने या ना माने दिलदारा

गेले दोन दिवस मला सूफी गाण्यांनी घेरलंय! असाच कधी अवचित येतो मूड आणि सुरू होते एक अद्भुत स्वरमयी भक्तीयात्रा!
ही गाणी अवीट गोडीची, गूढ अर्थांची, आत्मा - परमात्म्याशी संवाद साधणारी तर आहेतच; शिवाय कधी मनुष्याच्या मूर्खतेला शाब्दिक चपराक देणारी तर कधी लडिवाळपणे प्रियतमाचे आर्जव करणारी आहेत.
सशक्त, समर्पक शब्दरचना आणि अपार भक्तिभावाने अर्थगर्भ करणारे मधुर, हृदयाला हात घालणारे संगीत....
... त्या जोडीला तेवढाच कसदार गायकी गळा त्या संगीतरचनेला लाभला तर मग सोने पे सुहागा!!
सध्या माझ्या मनात अहोरात्र पिंगा घालणारे गाणे म्हणजे वडाळी बंधूंनी गायलेली बाबा बुल्लेशाह यांची अपरिमित माधुर्य व उत्कट प्रेमभावाने ओतप्रोत रचना ''तू माने या ना माने दिलदारा असां ते तैनू रब मनिया''.....
बाबा बुल्लेशाह या सूफी पंजाबी संत कवींच्या अनेक रचना श्री गुरू ग्रंथ साहिबचाच एक भाग आहेत. त्यातीलच ही एक रचना....
साधे, थेट हृदयाला भिडणारे पारदर्शी शब्द आणि त्यातून परमात्म्याला घातलेले साकडे, केलेले आर्जव नकळत मन हेलावून टाकते. 
प्रेमाच्या सर्वात उत्कट भावाला ही रचना शब्दबद्ध करते.
यू ट्यूबवर हे गाणे अवश्य ऐका : दुवा क्र. १ 
वडाळी बंधूंची सूफी गायकी जगद्विख्यात आहे. पंडीत दुर्गादास आणि उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्याकडे संगीताचे धडे घेतलेले, अतिशय साध्या जीवनशैलीने जगणारे हे दमदार, कमावलेल्या आवाजाचे गायक आपल्या लवचिक अदाकारीतून सूफी रचनांच्या शब्दांमध्ये विलक्षण रसपूर्णता आणतात. त्यांची बरसणारी, भक्तीवर्षावात चिंब करणारी गायकी आणि बुल्लेशाह यांचे मार्मिक शब्द...... भक्तीच्या डोहात डुंबायला अजून काय पाहिजे? 
गाण्याचे शब्द व त्यांचा स्वैर अनुवाद :
तू माने या ना माने दिलदारा असां ते तैनु रब मनिया
प्रियतमा, तुला आवडो अगर न आवडो, मी तुला माझा ईश्वर म्हणून आपलंसं केलंय....
दस होर केडा रब दा दवारा असां ते तेनु रब मनिया
आता तूच मला सांग की मी अजून कोणता दरवाजा ठोठावू... तूच आता माझा ईश्वर आहेस!
कोई काशी कोई मक्के जांदा कोई कुंभ विच दा धक्के खांदा 
कोणी आपल्या पापांचे परिमार्जन करायला काशीला जातात, तर कोणी मक्केला जातात. तर कोणी कुंभमेळ्यात जाऊन आपली पापे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. 
पाया जग मै तुझ विच सारा असां ते तैनु रब मनिया
पण मला तर तुझ्या चरणांशीच सारे विश्व गवसले आहे, तूच आता माझा ईश्वर आहेस!
अपने तनकी खाक उडायी तब ये ईश्क की मंजिल पायी
ह्या शरीरातील विकार जेव्हा भस्मसात झाले तेव्हा तुझ्या दिव्य प्रेमाचा साक्षात्कार झाला...
मेरी सांसोका बोले इकतारा असां ते तैनु रब मनिया
 
माझ्या श्वासांची एकतारी तेच गीत तर प्रत्येक श्वासागणिक गात आहे....
तुझ बिन जीना भी क्या जीना तेरी चौखट मेरा मदीना
तुझ्याशिवाय ह्या माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? तुझ्या दारात मला माझे तीर्थ गवसले आहे
कहीं और ना सझदा गंवारा असां ते तैनु रब मनिया
आता हे मस्तक अन्यत्र कोठे झुकवणे मला सहन होत नाही कारण तूच तर माझा ईश्वर आहेस!
हंसते हंसते हर गम सहना राजी तेरी रजा में रहना
आता हसत हसत मी अडचणी व संकटांचा सामना करेन. तुझी सावली हेच माझं घर. 
तूने मुझको सिखाया है यारा असां ते तैनु रब मनिया
तूच तर शिकवलंस हे सारं मला......
अप्रतिम शब्दांना आत्म्याला साद घालणाऱ्या समृद्ध गायकीचं कोंदण लाभल्यावर कधी ऐकणारा रसिक भक्त बनतो, डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळतात, कंठ रुद्ध होतो आणि मन त्या भक्तीलहरींत डुंबू लागते हेच कळत नाही. चक्षूंसमोर उभा राहतो एक फकीर. अल्लाला, परमात्म्याला जीवाच्या आर्ततेने साद घालणारा, त्याच्या प्रेमात वेडावलेला, दिवाणा झालेला, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याच परमात्म्याला पाहणारा.... गाणे संपते तेव्हा आपणही दिवाने झालेलो असतो. त्या खुळेपणाला, त्या वेडाला माझा सलाम! 
(माझ्या अतिशय अल्प हिंदी/पंजाबी ज्ञानाच्या आधारावर हा अनुवाद व गाण्याचे शब्द मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी चु. भू. दे. घे. फेरफार/ सुधारणा असल्यास अवश्य कळवणे.)
-- अरुंधती