मे १८ २०१०

१७. प्रेम

ह्यासोबत

मी ज्यावेळी द्वैतावर लेख लिहीत होतो तेव्हा प्रेमासाठी द्वैत हवे असा विचार मांडला गेला होता, मी तिथे लगेच प्रतिसाद देखील दिला पण प्रेम ह्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर सविस्तर लिहिणे गरजेचे आहे

आपण सदैव द्वैतात जगत असल्यामुळे आपल्याला प्रेम हा दोन व्यक्तीतला संबंध आहे असं युगानुयुगे वाटत आलं आहे. आता इथे थोडं सविस्तर लिहायला हवं:

एकतर मानवी मूल सक्षम होण्यासाठी इतर जीवसृष्टीपेक्षा सर्वात अधिक वेळ लागतो त्यामुळे कुटुंबाची गरज असते. हे कौटुंबिक संबंध व्यक्तीगत असल्यामुळे आपण त्या संबंधांना प्रेम समजतो. या संबंधातून भावनिकता निर्माण व्हावी आणि कुटुंब व्यवस्था अबाधित राहावी म्हणून देखील कौटुंबिक संबंधांना प्रेम म्हटले गेले आहे.

दुसऱ्या प्रकारचे वैयक्तिक संबंध हे तारुण्यात नैसर्गिक आकर्षणातून निर्माण होतात आणि जवळजवळ प्रत्येकाची असे प्रेम मिळावे ही इच्छा असते (म्हणजे आपल्या मनातली व्यक्ती आयुष्यभर लाभावी). याचं कारण म्हणजे प्रेयसी किंवा प्रियकर ही तुमची निवड असते ती तुम्हाला कुटुंबासारखी जन्मजात लाभलेली नसते. सगळी शायरी, काव्य, साहित्य, सिनेमे जवळजवळ याच आकर्षणावर निर्मीत असल्यामुळे प्रेम म्हणजे बहुदा हेच असावे असा सर्वमान्य समज आहे.

या दोन प्रेमाच्या कल्पनांमुळे मानवी प्रेमाच्या बाबतीत कमालीचं वैविध्य आहे; म्हणजे कौटुंबिक प्रेम, वैवाहिक प्रेम, हुकलेले प्रेम, मैत्रीतले प्रेम, झालेच तर देव-भक्त प्रेम गुरु-शिष्य प्रेम वगैरे. पण सगळ्या प्रेमात एक गोष्ट निर्विवाद आहे आणि ती म्हणजे प्रेम हा दोन व्यक्तीतला संबंध आहे ही सगळ्यांची अत्यंत ठाम समजूत!

या कल्पनेमुळे मानवी संबंध फार गुंतागुंतीचे झाले आहेत कारण सगळ्या त्रासाचं मूळ कारण आपण स्वतःला व्यक्ती समजतो हे आहे. त्यात परत ही नवीन संबंधांची भर म्हणजे प्रत्येकाला आपल्याला एकतर प्रेम करायला जमले नाही किंवा कुणी आपल्यावर प्रेम केले नाही असं वाटत राहतं. पुन्हा हे प्रेम पूर्णपणे मानसिकतेवर आधारीत असल्यामुळे दोन्ही व्यक्तींना सारखं लक्षात ठेवून एकमेकाशी फार जपून वागावं लागतं. त्यात आपली मनोदशा नेहमी सारखी नसल्यामुळे प्रेम आहे, प्रेम आहे असं सारखं स्वतःला बजावावं लागतं आणि त्यामुळे संबंधातली पारदर्शकता नाहिशी होते.

यातलं आध्यात्मिक परिमाण फार महत्त्वाचं आहे. प्रेम शोधण्याच्या, मिळवण्याच्या आणि टिकवण्याच्या भानगडीत माणूस स्वतःचं व्यक्तिमत्त्व टिकवत राहतो आणि इतरांचं व्यक्तिमत्त्व टिकवायला त्यांना भाग पाडतो. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचं निरसन होणं अवघड होऊन बसतं आणि माणूस खऱ्या प्रेमापासून वंचित राहतो. 

वास्तविक प्रेम हा मुळात दोन व्यक्तीतला संबंध नाही तर ती अस्तित्वगत एकरूपतेची जाणीव झालेल्याची मनोदशा आहे.  आनंद हा अस्तित्वाचा स्वभाव मानला तर बोध झालेल्या व्यक्तीमार्फत सक्रिय झालेला आनंद म्हणजे प्रेम.

इथे मला एकहार्ट काय म्हणतो ते सांगावंस वाटतं, तो म्हणतो "स्वतःशी कोणताही संबंध नसणं म्हणजे प्रेम आणि ते जमलं की मग तुमचे सगळ्यांशी संबंध सुखाचे होतील'. (द पॉवर ऑफ नाऊ)

हे जरा तुम्हाला समजणं अवघड आहे पण एकदा समजल्यावर तुम्हाला प्रेमाची जादू काय आहे ते कळेल. ते असं आहे:

तुमची पत्नी ही तुमची कल्पना आहे कारण जीला तुम्ही पत्नी मानता तिलाच तुमची मुलं आई मानतात, तुमचे सासरे मुलगी मानतात आणि तुमचा मेव्हणा बहीण मानतो. म्हणजे एकाच व्यक्ती विषयी वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. आता मजा अशी आहे की तुम्ही तिला पत्नी मानता म्हणून स्वतःला पती मानता, तुम्ही कुणाला तरी आई मानता म्हणून स्वतःला मुलगा मानता, कुणाला तरी बहीण मानता म्हणून स्वतःला भाऊ मानता, कुणाला तरी मुलगी मानता म्हणून स्वतः वडील झाला आहात अशा प्रकारे तुम्ही स्वतः सुद्धा तुमची एक कल्पना आहात. ही कल्पना इतकी गुंतागुंतीची आहे की समोर आलेल्या व्यक्तीबरहुकूम ती बदलत राहते किंवा तुम्हाला ती बदलावी लागते. थोडक्यात तुम्ही स्वतःला तुमच्या कल्पनांचं प्रतिबिंब मानता. म्हणजे तुमची पत्नी ही तुमची मूळ कल्पना आणि तिचं प्रतिबिंब म्हणजे तुम्ही, तुमच्या कल्पनेतल्या पत्नीचे पती! अशा सर्व प्रतिबिंबाचं एकत्रीकरण म्हणजे तुम्ही स्वतःला मानत असलेली व्यक्ती! एकहार्ट म्हणतो या व्यक्तीशी कोणताही संबंध नसणं; प्रेम, तिरस्कार, अभिमान, न्यूनत्व, करुणा, जिव्हाळा,  किंवा काहीही म्हणजे तुम्ही स्वतःप्रत येणं आहे. कारण या संबंधांमुळेच तर तुमचं व्यक्तीमत्व तयार झालं आहे. या कल्पनेतल्या व्यक्तीशी संबंध संपणे म्हणजे स्वतःची स्वतःशी एकरूपता. ही अवस्था म्हणजे प्रेम!

आता हे प्रेम कुणावर अवलंबून नाही. ते संबंध नसल्यामुळे क्षणोक्षणी, व्यक्तीपरत्वे बदलणार नाही. तुम्ही कायम या अवस्थेत राहू शकाल. मग या तरलतेतून तुम्ही जे वागाल ते प्रेममय असेल, जे कराल ते प्रेममय होईल कारण प्रत्येक प्रसंगात आणि कुणाही व्यक्ती बरोबर तुम्ही एकसंध असाल, संपूर्ण पारदर्शक आणि प्रामाणिक असाल कारण संबंध बिघडतील ही भिती संपलेली असेल!

संजय   

Post to Feed
Typing help hide