मे ३१ २०१०

१९. सजगता

ह्यासोबत

सजगता किंवा अवेअरनेस बद्दल अध्यात्मात बरीच चर्चा आहे. कृष्णमूर्तींच्या अध्यात्मिक शिकवणीचा केंद्रबिंदूच 'चॉईसलेस अवेअरनेस' आहे. सत्य समजण्यासाठी कोणत्याही साधनेची किंवा गुरुची गरज नाही असे सांगणारे कृष्णमूर्ती जेंव्हा सजगता हा आकलनाचा आधार आहे असं म्हणतात तेंव्हा सजगता म्हणजे काय आणि त्याचा सत्य समजायला कसा उपयोग होतो हे पाहणं कुतुहलाचं ठरतं. वास्तविक 'सजगता' हा एकच शब्द पुरेसा होता पण 'निर्विकल्प सजगता' (चॉईसलेस अवेअरनेस) असं म्हंटल्यामुळे आणखी स्पष्टीकरण आणि जितकं अधिक स्पष्टीकरण तेव्हढे अधिक प्रश्न अशी परिस्थिती निर्माण झाली.

मूळात सजगता या शब्दाचाच लोकांनी इतका धसका घेतला की हातातून चुकून जरी वस्तू पडली किंवा बोलताना साधी जरी चूक झाली तरी 'ओ आय वॉज नॉट अवेअर' असं व्हायला लागलं. वास्तविक वस्तू हातातून पडणे किंवा शब्द चुकणे याचा अवेअरनेसशी सरळ संबंध नाही पण सजगता म्हणजे एकदम बिनचूकपणा असा लोकांनी समज करून घेतल्यामुळे नविनच तणाव निर्माण झाला आणि जिथे स्वास्थ्य मिळायला हवे तिथे नेमकी विरूद्ध परिस्थिती निर्माण झाली.

माझा एक मित्र एकदा मला म्हणाला की 'सजगता म्हणजे काय?' जरी सजगता हा कृष्णमूर्तींचा जिव्हाळ्याचा विषय होता हे मला माहित असले तरी मी  कृष्णमूर्ती वाचलेले नाहीत. मी म्हणालो की 'सजगता म्हणजे कल्पना आणि वास्तव यात तारतम्य करण्याची क्षमता!' त्याला ते काही समजले नाही तो म्हणाला 'म्हणजे नक्की काय?' तर त्याच असं आहेः

आपण बरेचसे कल्पनेच्या विश्वात जगतो आणि त्यामुळे आपली वास्तवाशी सारखी फारकत असते आणि म्हणून अस्वस्थता येते. उदाहराणार्थ वेळ ही कल्पना आहे पण आपण वेळ ही वास्तविकताच मानतो त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. इथे आपण वेळ या कल्पनेच्या उपयोगा विषयी चर्चा करत नाही, ती कल्पना रोजच्या जगण्यात निर्विवादपणे उपयोगी आहे पण वेळ ही कल्पना नसून वास्तविकताच आहे या गैरसमजाचं निराकरण म्हणजे सजगता. तुम्ही जर आपण सरळ पृथ्वीपासून वर गेलोत अशी कल्पना केली तर तुमच्या असं लक्षात येईल की सूर्य सदैव प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे रात्र आणि दिवस असा भास होतो आहे आता हा बोध तुम्ही सर्वस्वी आणि संपूर्णपणे मान्य केलात तर तुम्ही वेळ या कल्पनेतून मुक्त व्हाल. आता तुम्हाला वेळेचं ओझं वाटणार नाही. याचा अर्थ तुम्ही वेळेच्या बाबतीत बेफिकीर व्हाल असा नाही पण वेळ चुकली, मी वक्तशीर नसतो, वेळ वाया गेला (किंवा आयुष्य वाया गेलं) वगैरे सगळ्या व्यर्थ मानसिकतेतून तुम्ही एका क्षणात मोकळे व्हाल. तुम्ही कोणत्याही प्रसंगात (किंबहुना रोजच्या आयुष्यात) जास्त स्वस्थ व्हाल, वेळेचं दडपण गेल्यामुळे तुमची प्रसंग हाताळण्याची क्षमता वाढेल आणि तुम्हाला जिथे आता अवघड आहे असं वाटत होतं तिथे अनेक पर्याय दिसू लागतील, हे आकलन म्हणजे सजगता!

असे सजगतेचे अनेक पैलू आहेत पण मूळ म्हणजे तुमची वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची क्षमता म्हणजे सजगता. अशी तुमची सजगता जेव्हढी अधिक तेव्हढे तुम्ही वास्तवाशी जास्त संलग्न आणि तेव्हढी तुमची संवेदनक्षमता अधिक; म्हणजे भूक लागली की नाही हे तुम्ही आता घड्याळाकडे न बघता जाणिवेनी ठरवू लागाल. जेव्हढा कल्पनेचा प्रभाव कमी तेव्हढी जाणिवेची क्षमता जास्त!

आता आणखी एक उदाहरण बघू. पैसा ही मानव निर्मीत कल्पना आहे, पैसा ही वास्तविकता नाही पण रोजच्या जीवनात पैसा ही इतकी केंद्रस्थानी असलेली कल्पना आहे की जणू ती वास्तविकताच झाली आहे आणि पैसा नसेल तर मृत्यू अशी दहशत निर्माण झाली आहे. आता पैसा या संकल्पनेनी माणसाचं आयुष्य सोयीच झालं आहे पण ती वास्तविकता मानली गेल्यानी पैश्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. पैसा ही इतकी जीवनाच्या केंद्रस्थानी गेलेली कल्पना आहे की पैश्यालाच आपण 'अर्थ' असं नांव दिलंय! म्हणजे पैसा नसेल तर जीवनात काहीही अर्थ नाही अशी पराकोटीची कल्पना माणसानी निर्माण करून घेतली आहे. त्यातच अर्थ हा पुन्हा पुरुषार्थ मानला गेला आहे त्यामुळे गरज असो वा नसो सर्व आगदी झटून त्या कल्पनेचा पाठपुरावा करताहेत.

इथे थोडा विस्तार आवश्यक आहे. विनीमयाच्या जगात पैसा ही सर्वमान्य कल्पना असल्यामुळे वस्तू किंवा सेवा मिळवण्यासाठी रोजच्या जीवनात पैसा लागणार पण प्रत्येक वेळी पैसा हीच दिशा घेऊन जगणे आणि पैसा नसेल तर काहीही होऊ शकणार नाही असा समज करून घेणे म्हणजे सजगता नसणे आहे. आता याचा रोजच्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो ते पाहा. समजा रविवारची संध्याकळ आहे आणि तुम्हाला मित्राचा अचानक फोन येतो की रात्रीच्या नाटकाची तिकीटं आहेत येणार का? त्यावेळी तुम्ही आता किती वाजले, उद्या सकाळी कामावर नाही गेलो तर काय गहजब होईल वगैरे विचार न करता नाटकाला गेलो तर काय मजा येईल, अशी संधी नेहेमी येत नाही असा विचार करू शकता आणि निर्णय घेऊ शकता.

सजगता तुमच्या जीवनात स्वास्थ आणते. तुमच्या सर्व कल्पनांचं निराकारण तुम्हाला सत्याचा बोध घडवतं कारण तुम्ही स्वतःला समजत असलेली व्यक्ती आणि तुमचं स्वरूप यात फक्त तुम्ही निर्माण केलेल्या कल्पनेचं अंतर आहे.

संजय  

Post to Feedकल्पना आणि वास्तव...
कल्पना खरी वाटते तेंव्हा स्वतःचं विस्मरण होतं
क्रिएशन
कल्पकता वेगळी आणि कल्पनेला (कन्सेप्ट) यथार्थ मानणे वेगळे

Typing help hide