तो आणि ती

तो आणि ती


तो थकून घरी येतो
ती थकून घरी येते
तो कॉफी करतो
ती गाणी लावते
दोघे शांत बसून कॉफी पितात...
मौनाच्या भाषेतून हृदयांशी बेलायचं
हेच तर प्रेम असतं


तो तिच्याकडे बघतो
ती त्याच्याकडे बघते
तिचं हास्य प्रश्न विचारतं
त्याचे डोळे उत्तरं देतात...
त्या हास्यातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं
हेच तर प्रेम असतं


तो एकटा चालतो
ती एकटी चालते
मग दोघे भेटतात
हातात हात घेऊन चालतात...
काही पावलं एकटं चालून पून्हा एकत्र येणं
हेच तर खरं प्रेम असतं


तो पंखा बंद करतो
ती पंखा सुरू करते
तो परत पंखा बंद करतो
ती, तो झोपल्यावर, पंखा परत सुरू करते...
कधी त्याचं खरं तर कधी तिचं खरं
हेच तर प्रेम असतं


तो कॉफी हवी आहे का विचारतो
ती गोड हसून नको म्हणते
त्याने कॉफी केल्यावर, ती त्यच्या कपातून पिते
त्यालाही हा प्रकार कळलेला असतो,
म्हणून त्याने आधीच जास्त कॉफी केली असते...
पण
कॉफी त्याच्या कपातून गोड लागते
म्हणून न मागता पिणं
हेच तर प्रेम असतं


ती ऑफिसातून घरी उशीरा येते
तो स्वयंपाक करून ठेवतो
तो जेवण कसं झालय विचारतो
ती छान झालय म्हणते...
त्याच्या खारट भाजीतही त्याचा गोडवा शोधणं
हेच तर प्रेम असतं


तो श्रीमंत नाही
ती पण श्रीमंत नाही
दोघे कट्ट्यावर बसतात, कॉफी मागवतात
भरपूर गप्पा मारतात...
बाहेरच्या थंडीत
गप्पांच्या गर्मित
दोन कप कॉफी
दोन तास टिकवणं
हेच तर प्रेम असतं


तो अग्नि झाला की
ती पाणी होते
ती आरडा-ओरडा करायला लागली
की तो समजून घेतो, समजूत घालतो...
कधी ताणून धरायचं आणि
कधी सोडून द्यायचं हे कळणं
हेच तर प्रेम असतं


मित्रात असताना
तो काहीतरी बोलतो
ती हळूच हसते
मग दोघे हसायला लागतात
मित्रांना काहीच कळत नाही...
हे वेड ज्यांना लागलं त्यांनाच हे कळतं
हेच तर प्रेम असतं

१०
ती त्याला भेटली नसते
तो तिला भेटला नसतो
ती त्याची स्वप्ने बघते
तो ही तिची स्वप्ने बघतो
कल्पनांतच खरी मजा असते
वास्तविकता नेहमिच निराश करते
हेच कदाचित प्रेम असतं

११
तिला रात्री सिनेमा बघायचा असतो
त्याला सकाळी लवकर जाग येत असते
तो रात्री जागून सिनेमा बघतो
सकाळी लवकर जाग येते
तो तिच्यासाठी नाश्ता बनवतो
"तिच्या हास्यापेक्षा झोप महत्त्वाची नसते"...
स्वत:ची थोडीशी गैरसोय करून
दुसऱ्याला खुश करायचं
हेच खरं प्रेम असतं

१२
तिला झोप येत असते
त्याची उद्या परिक्षा असते
ती रात्रभर त्याला सोबत म्हणून
कादंबऱ्या वाचत जागी राहाते...
ही अशी वेडं जे लावतं
तेच तर प्रेम असतं

१३
तो पुढे-पुढे
ती पाठी-पाठी
त्याच्या तोंडात कौळी (कवळी)
आणि तिच्या हातात काठी
हातात हात घेऊन आजी-आजोबा,
उसाचा रस प्यायला जातात
आपल्या म्हाताऱ्या पावलांनी,
तरूण प्रेमींनापण पाठी टाकतात...
प्रेमाच्या झाडाला वर्षांनूवर्ष पाणी घालायचं असतं
हेच तर प्रेम असतं

१४
तिला माणसांचं वेड
त्याला एकटं राहायचा छंद
ती सगळ्यांशी गप्पा मारते
त्याचं तोंड सदैव बंद
पण एकत्र ते दोघे मजेत असतात
तिथे ही दोन टोके बरोबर जुळतात
काय माहिती यांचं इतकं कसं जमतं
हेच कदाचित प्रेम असतं

१५
तो काही रांज्या नाही
आणि ती पण हीर नाही
ती कुठली राणी नाही
आणि तो शूर वीर नाही
पण ती त्याच्या जीवनाची नायिका आहे
आणि तो तिच्या जीवनाचा नायक...
आणि या दोघांची ही साधी सोपी कहाणी
हेच कदाचित प्रेम असतं

१६
तो प्रेमावर कविता करत नाही
तिलाही शायरी वगैरे जमत नाही
तो प्रेम करतो हे सांगावं लागत नाही
तिला प्रेम दर्शवायला शब्द लागत नाही...
दोघांच्या नजरा भेटल्या की
पापण्यातून जे डोकावतं
तेच कदाचित प्रेम असतं

१७
तो शस्त्र खाली ठेवतो
ती पण पराजय स्विकारते
तो तिला त्याचा अभिमान देतो
ती त्याला तिचा अहंकार देते...
जे नाही मिळालं तर मागावसं वाटतं
आणि जे न मागता सगळं मिळवतं...
ज्या लढाईत शरण गेल्यावर
विजय आपोआप मिळतो
तेच खरं प्रेम असतं

१८
तो सारखा तिच्या पुढे-मागे नाही
आणि ती सारखी त्याच्या सोबत नाही
तो त्याच्या वाटेवर तिच्यासाठी थांबतो
ती तिच्या रस्त्यावर त्याची वाट बघते...
जबर्दस्तीने बांधणं प्रेम नाही
जे बंधन स्वतंत्र करतं
तेच खरं प्रेम असतं

१९
तिला थंडी वाजते
त्याच्याकडे स्वेटर असतो
तो स्वेटर तिला देतो
आता तो कुडकुडत असतो
ती जाऊन त्याला मिठी मारते...
अशी उर्जा मिळणार असली
तर कुडकुडण्यात मजा येते
हेच तर प्रेम असतं

२०
माझ्याकडे शब्द आहेत, ओळी आहेत
तिच्याकडे तो आणि त्याच्याकडे ती आहे
त्यांना शब्दांची काय गरज
ज्यांचे डोळे बोलके आहेत
त्यांना प्रेक्षकांची काय आवशक्ता
ज्यांची जीवनं त्यांच्या स्वप्नांसारखी आहेत...
मी ज्या प्रेमाची व्याख्या शोधतो
हे दोघे ते प्रेम जगतात
माझे शब्द जिथे संपतात
यांची जिवने जिथे सुरू होतात
तेच खरं प्रेम असतं