चला आपण सगळे एक होऊ या

१) मनोगत हे बहुदा आपापल्या क्षेत्रात माहीर असणाऱ्या आणि सर्व दूर पसरलेल्या मराठी लोकांचे संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ  आपल्याला जीवनात रंग भरणारं आणि त्याच्या नवनवीन पैलूंची ओळख करून देणारं व्हावं असं प्रत्येकाला वाटतंय आणि ते तसं होईल सुद्धा जर आपण एक गोष्टं लक्षात घेतली तर:

प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कितीही नाही म्हटले तरी व्यक्तीगत असतो त्यामुळे मतभेद होतात पण हेतू जर योग्य असेल तर ही शक्यता शून्य होते.

योग्य हेतू फक्त दोनच मनोदशेतून येतोः एक, आनंदाची अभिव्यक्ती किंवा तो वाटण्याची इच्छा आणि दोन, माहितीची देवाण-घेवाण.

जर हेतू योग्य असेल तर सगळं विधायक होतं कारण भाषा हेतूची दासी आहे आणि मग गैरसमज आणि कलह होण्याची शक्यता राहत नाही आणि समजा जरी काही परिस्थिती आली तरी ती केवळ प्रामाणिक स्पष्टीकरणानी दूर होते.

२) दुसरं असं की मनोगतकडे  संकेतस्थळ म्हणून बघण्या एवजी आपण ते आपल्या सर्वांचा 'एकत्रित ब्लॉग' म्हणून बघीतलं तर  सगळ्या अभिव्यक्तीत आणि चर्चासत्रात आपसूक आपलेपणा आणि एकसंधता येईल.

ब्लॉग लोकप्रिय करण्यासाठी ट्रॅफिक इथे विनासायास उपलब्ध आहे आणि तुम्ही एकसंध आणि कसदार लिहीत गेलात तर तुम्हाला तुमच्या साहित्यातून पुढे ते प्रकाशनाचा आणि लोकप्रियतेचा मार्ग ही खुला होतो.

३) मला मनोगतच्या विश्वस्त आणि प्रशासकां विषयी अपरंपार स्नेह आहे, अशा प्रकारे कोणताही व्यवसायिक हेतू न ठेवता एखादा उपक्रम चालवणं फार दुर्मिळ आहे.

आपण यातलं प्रत्येक दालन: कथा, कविता, चर्चा, पाककृती, कार्यक्रम; आनंदाचं, बुद्धीमत्तेचं आणि रमण्याचं स्थळ करावं असं मला वाटतं आणि तुम्हाला ही तसंच वाटत असणार.

चर्चेचा कोणताही प्रस्ताव ठेवताना किंवा प्रतिसाद देताना जर आपण केवळ माहितीची देवाण-घेवाण किंवा आनंदाची लयलूट असा दृष्टीकोन ठेवला तर मनोगतवर एक पारस्पारिक विश्वास आणि अनुबंध निर्माण होईल आणि सगळ्यांसाठी हे केवळ एक संकेतस्थळ न राहता रमण्याची जागा आणि जीवन समृद्ध करणारा मस्त पास टाईम होईल. आपण विश्वस्त आणि प्रशासकांसाठी तेवढे तरी नक्की करू म्हणजे त्यानाही हे संकेतस्थळ चालवायला मजा येईल!

संजय