घन वरसे, मराठी कविता आणि लोकप्रियता

कविवर्य बा भ बोरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यांत ‘घन वरसे रे’ हा एक कार्यक्रम झाला. कविता तशी कोणी समजावल्याशिवाय नाहींतर पांचदहा वेळां वाचल्याशिवाय चटकन माझ्या डोक्यांत शिरत नाहीं. पुल आणि सुनीताबाईंनीं वाचलेल्या बोरकरांच्या कांहीं कविता आवडल्या होत्या. बोरकरांच्या कवितांबद्दल रसिकच काय, मान्यवर साहित्यिक,   पाडगांवकरादी कवी देखील बऱ्याच आदरानें बोलतांना आढळतात. त्यांच्या कवितेंत असें काय आहे ज्याचा गंधही आपल्याला अजून नाहीं असें बरेचसें कुतूहल आणि हें कळत नसल्याचा बराचसा न्यूनगंड घेऊन कार्यक्रमाला गेलों. सायंकाळीं सहाचा कार्यक्रम असून चांगली जागा पटकावावी म्हणून साडेपांचलाच पोहोंचलो. जेमतेम शेवटच्या रांगेत बसायला मिळालें. दहापंधरा मिनिटांत एकही जागा शिल्लक राहिली नाहीं आणि रसिकांनीं खालीं जाजमावरच भारतीय बैठक मारायला सुरवात केली. रसिकांचा उदंड प्रतिसाद पाहून भारावून गेलों. डॉ. घनश्याम बोरकर आणि डॉ माधवी पंडित यांनीं प्रास्ताविक करून काव्यवाचनाला प्रारंभ केला. एरवीं साध्या दिसणाऱ्या बांगड्यांचा कांचानीं शोभादर्शकांत - कॅलिडोस्कोपमध्यें - जातांच मनोहर रंग आणि आकार धारण करावे तसे आपले मराठी शब्द बोरकरांच्या कवितेंत गेल्यावर एकदम रेखीव, नादमय, बनले. मराठी शब्दकोषांतल्या हिरेमाणकांनीं बोरकरांच्या कवितेचें आजीव सदस्यत्त्वच घेतलें. रूपगर्वितेनें तोऱ्यांत पावलें टाकावींत तशा छंदतालबद्ध काव्यपंक्ती नृत्य करीत एकामागून एक कानांवर पडूं लागल्या. असामान्य प्रतिभेच्या त्या अविष्कारानें स्तिमित झालों. कवींचे कवी असा त्यांचा उल्लेख एका मान्यवर कवींनीं केला होता तो अगदीं समर्पक वाटला. या आनंदसोहळ्यातील निवडक आनंदक्षणांचें रसग्रहण एखाद्या जाणकार मनोगतीनें मनोगतावर सादर केले तर बरें होईल.

कार्यक्रम विनामूल्य असल्यामुळें असावें पण वातानुकूलन सुरुवातीपासूनच बंद होतें. तासाभरानें प्रचंड उकडूं लागलें. बहुसंख्य रसिकवर्ग पन्नाशीच्या आंतबाहेरचा होता. शेंदीडशें तरी गुदमरल्यासारखें वाटल्यामुळें बाहेर निघून गेले. पण कवितेची ताकद अशी कीं तरीही सभागृह पूर्ण भरलेलेंच होतें.

आतां ध्वनिसंयोजनाबद्दल. चांगलें ध्वनिसंयोजन नक्कीच कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करेल. इथें मात्र अत्यंत मोठ्या आवाजांतलें ध्वनिसंयोजन होतें. काव्यवाचनासाठीं अगदीं योग्य. पण गायनासाठीं व्यावसायिक ध्वनिसंयोजनाची उणीव जाणवली. कांहीं कवितांचें गायन डॉ. राजा काळे आणि पंडिता आशा खाडिलकर यांनीं केलें. दोहोंच्याही गायनकौशल्यावर टीका करण्याची माझी मुळींच पात्रता नाहीं. पण बोरकरांची कविता त्या संगीतकल्लोळातून माझ्यापर्यंत तरी पोहोंचली नाहीं. शोभा गुर्टूंच्या शब्दप्रधान गायकीला साथ करतांना नारायणराव इंदोरकरांचा तबला मृदुमुलायम वाजे आणि गीतातील शब्दांना अजिबात अटकाव न करतां नाजुक तरुणीच्या पदन्यासासारखा हळुवार भासे. किंबहुना कांहीं शब्दांच्या अर्थाची एखादी मनोहर छटा तालाच्या वजनानें अधोरेखित होत असे. डग्गा जणुं मखमलीचा बनवला आहे आणि तबल्याऐवजीं कांकणेंपैंजणेंच वाजताहेत असें वाटावें. पण इथें मात्र ध्वनीयंत्रणेतून ऐकूं येणाऱ्या आक्रमक डग्ग्याच्या धडधडाटाच्या आणि तबल्याच्या टणटणाटाच्या ध्वनिकल्लोळांतली भक्तिगीतें बहुसंख्य रसिकांना जरी आवडलीं तरी ‘कशी तुज समजावूं सांग’ सारख्या गीतातल्या शब्दांची जादू माझ्यापर्यंत तरी पोहोंचली नाहीं.

तौलनिक विचार करतां जगजीत सिंग, गुलाम अली, मेहदी हसन, गजाननराव वाटवे, शोभा गुर्टू, भीमराव पांचाळे यांच्या कार्यक्रमांतल्या वा ध्वनिफितीतल्या ध्वनीसंयोजनातून ऐकूं येणारी शब्दप्रधान गायकी माझ्यापर्यंत पोहोंचत असे. त्यांच्या कार्यक्रमांतून रसिकांची दाद मिळते ती मुख्यत्त्वेंकरून कवीलाच. अडीचशें तीनशें वर्षापूर्वींची गजल अजूनही लोकप्रिय आहे याचें श्रेय या गायकांना जातेंच. माझ्यासारख्या मराठी माणसाला हिंदी, उर्दू कविता समजत नाहीं. पण हे गायक आपल्या जादुई आवाजाची आणि गायकीची कवितेला अशी कांहीं जोड देतात कीं ती कविता शब्दांपलीकडे जाऊन थेट मनाला भिडते. जगजित सिंग काय, गुलाम अली काय वा भीमराव काय, त्यांची थोरवी अशी कीं जरूर तिथें निरूपण करून वर श्रवणीयतेची जोड देऊन ते ती कविता सामान्य हिंदी माणसांपर्यंत पोहोंचवतात आणि लोकप्रिय करतात. मराठी कवितेबद्दल बोलायचें झालें तर वाटव्यांनंतर पु. ल. देशपांडे पतिपत्नी, सुरेश भट आणि आतां भीमराव पांचाळे आणि सलील कुलकर्णी यांनीं हें काम चालू ठेवलें आहे. पण त्याला अद्याप उर्दू कविते एवढें व्यापक स्वरूप अद्याप आलेलें नाहीं.

पूर्वीं पाडगांवकर, वसंत बापट आणि विंदा या त्रिकूटांचीं काव्यवाचनें होत. ते आनंदसोहळे, आनंदपर्वण्याच असत. अशीच घन वरसे हीही एक आनंदपर्वणी होती. परंतु ते कवी आपापल्या स्वतःच्याच कविता सादर करीत. हळुवार शब्दप्रधान गायकीतून कुसुमाग्रजांची, पाडगांवकरांची, बापटांची, विंदांची आणि इतर दिग्गज कवींची आपली मराठी कविता अशाच आनंदसोहळ्यातून ताकदीच्या शब्दप्रधान गायकीतून आपल्यापर्यंत पोहोंचली तर किती चांगलें होईल? आपल्या नव्या दमाच्या गायकांनी, संगीतकारांनींही आपल्या मराठी कवितेसाठीं कांहींतरी करायला पाहिजे असें वाटून गेलें. इंग्लंड अमेरिकेंत नाटकें कायम चालू असतात व त्यांचें आरक्षण तीनतीन महिने अगोदर होतें. पर्यटक खास नाटकें पाहायला येतात. भारतांत येणारे पर्यटक जगजित सिंग वा गुलाम अलीची उर्दू गजल असली तर आवर्जून ऐकतात. पर्यटक लोक असे खास मराठी कविता ऐकायला आले तर ती नक्कीच अभिमानाची गोष्ट होईल. पण सादरीकरण आणि आयोजन उत्कृष्ट दर्जाचें हवे. तो सुदिन लवकर पाहायला मिळो हीच इच्छा.