तुटलेल्या जिवाचे तुकडे

तुटलेल्या जिवाचे तुकडे

आधी पोटात पाय घेऊन रडवले त्यांनी
मग आमच्यासारखे वीर घडवले त्यांनी

(वेडात आमच्या लोळलो आम्ही एवढे
की हुशारांच्या गावात नेऊन बसवले त्यांनी)

(ठेवली न उघडी कुणी, त्यांची दारे तिच्यासाठी, मग
तिच्या सय्यमाच्या घराचं बांधकाम थांबवले त्यांनी)

हल्ली वाटे आम्हास भिती माणसाची,
असे एकदाच प्रेमाने हृदय तुडवले त्यांनी

(तोटके पडले मरण आमचे अन्यायाविरूध्द लढताना
उदाहरण म्हणून न्यायालयात आमचे पुतळे मिरवले त्यांनी)

पाहूनी जखमा त्यांनी वेदनांचे अनुमान लावले,
न दिसणाऱ्या जखमा देऊन, दु:ख वाढवले त्यांनी

केली न देवापुढे तकरार मी कधीही, जेव्हा
तुटलेल्या जिवाचे तुकडे वेचाया लावले त्यांनी

उरलेल्या रक्ताने गाथा लिहिली आमची आम्ही
त्यात व्याकरणाच्या चूका काढून चिडवले त्यांनी

संपले रक्त आमचे, आमची लढाई लढताना
तत्वांबरोबर आम्हाला फाशीवर चढवले त्यांनी

तलवारीच्या धारेने ना रक्त आमचे सांडले
म्हणून परस्पर, 'दगड' आम्हास ठरवले त्यांनी

-- मयुरेश कुलकर्णी