ही कविता, माझ्या आईसाठी

ही कविता, माझ्या आईसाठी

आज तुझी आठवण येते आई
कारण आज मी हरलोय
म्हणून परत तुझ्या जिवनाची
स्वत:ला आठवण करून देतोय

कसं सहन केलं असशील
मला नऊ महिने घेऊन जगणं?
तुला रात्रभर झोपू न देता
माझं तुझ्या मांडीवर रडणं?

एका हाताने मारलंस मला
दुसऱ्याने पाठ थोपटलीस
स्वत:ची स्वप्ने हसत त्यागून
माझी स्वप्ने घडवलीस

माझ्याकडे आज जे काही आहे
ते सगळं तुझं आहे
आत्मा आणि ईश्वर म्हणजे आई
हे म्हणतात ते खरं आहे

तुझी गाथा लिहायला
शब्द नेहमीच कमी पडतात
आणि तुझ्या संघर्षासमोर
माझे प्रश्न मला छोटे वाटतात

माला अजूनही आठवतय
तू वीराची गोष्ट सांगायचीस
आता वाटतं खरतर
तूच तो वीर असायचीस

तू माझी काळजी करू नकोस आई
आज पडलोय, उद्या उठणार आहे
तुझ्या गोष्टीतल्या त्या वीराचा
परत मुखवटा घालणार आहे
उद्या परत जिंकण्यासाठी
तू शिकवल्यासारखा लढणार आहे

अभिमानाने सांग ध्येयाला तू,
तो पळू शकेल, लपू शकणार नाही
तू घडवलेला हा तुझा वीर
तुझी शिकवण वाया जाऊ देणार नाही

-- मयुरेश कुलकर्णी