पत्र

तुम्हाला पत्र लिहायला आवडते का? मला तर खूप आवडते! पत्र लिहिताना मला जास्तीत जास्त सुवाच्य अक्षर काढायला आवडते. अगदी सुरवातीला लहान असताना मी पत्र लिहिले ते पोस्टकार्डावर. मला आठवत आहे त्यावर आधी मी पट्टीने रेघा मारून घेतल्या होत्या व पत्र लिहिले होते. त्या छोट्या पत्रात मी एक वेगळा परिच्छेद पण केला होता. पोस्टकार्ड व इनलँड मध्ये मला पोस्टकार्ड जास्त आवडते. थोडक्यात काही सांगायचे असेल, खुशाली कळवायची असेल आणि वरचेवर पत्र पाठवायची असतील तर पोस्टकार्ड उत्तम!

आमच्या घरात सगळ्यांनाच पत्र लिहायची आवड आहे. पूर्वी आईबाबा त्यांच्या भावंडांना व भाचवंडांना पत्रे लिहीत असत. आम्हा दोघी बहिणींना कळायला लागल्यापासून आम्हालाही पत्र लिहायची उत्सुकता वाटू लागली. आईला सांगायचो आम्हाला पण पत्र लिहायचे आहे. आई तशी सविस्तर पत्रे लिहायची त्यामुळे तिला नेहमी इनलँड पत्रे लागत. निळ्या रंगाची होती ही पत्रं. त्यात आई आम्हाला दोघींना चार ओळी लिहिण्यासाठी जागा सोडायची. मग आम्ही दोघी बहिणी आईला विचारायचो काय लिहू गं पत्रात? आई म्हणायची काहीही लिहा, तुम्हाला जे वाटेल ते, मनात येईल ते. मग आम्ही दोघी बहिणी मिळून ठरवायचो काय काय लिहायचे ते. आधी आईचे पत्र वाचायचो तिने कसे लिहिले आहे ते बघायचो. आईची पत्राची सुरवात नेहमी पत्र लिहिण्यास कारण की ------- जे निमित्त असेल त्याने सुरवात करायची. आम्ही लिहायचो पत्र लिहिण्यास कारण की "असच" किंवा पत्र लिहिण्यास कारण की "उगीचच" आता खूप हसू येते. नंतर कळायला लागले की पत्राची सुरवात अगदी याच वाक्याने झाली पाहिजे असे नाही.

पत्राच्या शेवटी ताजाकलम पण क्वचित लिहावा लागतो. पत्र लिहून झाले आणि काही सांगायचे राहून गेले असेल तर पत्राच्या खाली ता. क. यामध्ये जे राहून गेले असेल ते लिहायचे. या ताज्या कलमाने आम्ही सगळ्या भावंडांनी खूप धमाल केली होती एका पत्रात. सर्वात मोठ्या मामेबहिणीचे लग्न ठरले तिला अभिनंदनाचे पत्र लिहिले आम्ही सर्वांनी मिळून. त्यात बरेच ताजाकलम लिहिले गेले. ते अनुक्रमे असे होते. ता. क. "एं कसा गं दिसतो तुझा 'न' (नवरा), ता. क. "भुरकून पी", ता. क. "दिल्या घरी तू सुखी राहा" (नवऱ्याचे नाव दिलीप), ता. क. " हा ताजा कलम पत्रातच दडला आहे शोधून काढ" हे ताजेकलम इतके लिहिले ना आम्ही नुसती धमाल. शेवटी अगदी छोटी रिकामी जागा दिसली तरी गिचमिडीत नवीन सुचलेले ताजाकलम घुसवायचो.

लग्नानंतर मी दर महिन्यात आईबाबा व सासूसासरे यांना पोस्टकार्ड टाकत असे. एकदा माझा मामेभाऊ म्हणाला "काय गं तू पत्र लिहितेस की रेसिपीज! प्रत्येक पत्रात जो पदार्थ करून पाहिला त्याची रेसिपी. जरा दुसरे पण लिही की काहीतरी" जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा विनायकचा मित्र म्हणाला की वसतिगृहाच्या खोल्या दिल्या गेल्या की लगेच पत्राने कळवतो तुला मग या तुम्ही इथे. लवकरच मिळाल्या. त्याचे पत्र आले आणि आम्ही लगेच निघण्याच्या तयारीला लागतो. आता मजा वाटते. आजच्या काळात टकाटका मोबाईल वाजले असते ना! पत्राची भानगडच नाही.

लग्नानंतर आयायटीत राहायला गेलो आणि आईबाबांना व सासूसासऱ्यांना मी पत्रातून आमच्या लग्नानंतरच्या दिवसांची पत्रे लिहू लागले. आईबाबांची पण सविस्तर पत्रे मला येत असत. आयायटी वसतिगृहात सर्वात खालच्या मजल्यावर एक बोर्ड होता नोटीसबोर्डसारखा. त्यामध्ये खोल्या क्रमांक लिहिले होते त्या कप्यात पोस्टमन पत्रे टाकून जात. माझ्या सारख्या चकरा खाली पत्र आले का ते पाहायला. आता रोज कसे काय पत्र येईल ना! पण जेव्हा आमच्या खोल्या क्रमांकाच्या कप्यात पत्र दिसे तेव्हा मला खूप आनंद होई. आईबाबांच्या पत्राचे तर मी पारायण करायचे.

अमेरिकेत आल्यावर सुरवातीला वेळ जाता जात नव्हता. असाच एक दिवस खूप कंटाळा आला. मनात खूप साठले होते. कुणालातरी सांगावेसे वाटत होते. तो दिवस आठवत आहे मला अजूनही. त्यादिवशी आभाळ भरून आले होते. कंठ दाटून आला होता. थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरवात झाली आणि एकदम मूड आला. आईला पत्र लिहायला घेतले आणि मनातले सर्व उतरवले गेले कागदावर. त्या पत्राचेही असेच पारायण केले. खूप आनंद झाला होता मला. आईने माझे पत्र वाचले की तिलाही किती आनंद होईल या विचाराने खूप सुखावले. पत्राची सुरवात केली. आत्ता या ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाकडे बघतच तुला पत्र लिहीत आहे........

आयायटीतली माझी मैत्रीण जेव्हा अमेरिकेला गेली तेव्हा तिचे मला पत्र आले होते. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी पण तिला तिच्या पत्त्यावर सविस्तर पत्र लिहिले. पत्ता पण दोन तीन वेळा चेक केला बरोबर लिहिला आहे ना! तेव्हा किती वेगळेपणा वाटला होता या अमेरिकेच्या पत्राबाबत. अशी ४-५ पत्रे आम्ही एकेमेकींना पाठवली होती. आत्ताचा काळ असता तर ती अमेरिकेत पोहोचण्या आही मीच तिला ईपत्र पाठवले असते पोहोचली का व्यवस्थित?

पूर्वीचा पत्र लिहिण्याचा काळ खूप छान होता. पत्रामध्ये आपण बरेच काही लिहू शकतो. पत्र वाचले की तो किंवा ती एकमेकांना भेटल्यासारखे वाटतात. आपलेपणा वाटतो. हे सर्व ज्यांनी पत्रलेखन केले असेल त्यांनाच कळेल. मी अगदी आत्ता आत्तापर्यंत पत्र पाठवत होते. अमेरिकेतल्या सुरवातीच्या काळात काही पत्रे मलाही आलेली आहेत. काळ इतका काही बदलला आहे की पत्राचा जमाना मागे पडला आहे म्हणण्यापेक्षा पूर्णपणे बंद झाला आहे. पत्राची जागा ईपत्राने घेतली आहे असे जरी म्हणले तरी कोण कुणाला ईपत्रातून सविस्तर लिहीत असेल? कोणीच नाही. लिहिले तरी जरूरीपेक्षा जास्त शब्द नसतीलच.

परत पत्रलेखनाला सुरवात करावी की काय? असा विचार चालू आहे. हाहाहा! किती हास्यास्पद विधान आहे ना!