कविता जमली पाहिजे

कविता जमली पाहिजे

कविता बर्फाच्या गोळ्यासारखी जमली पाहिजे
मधाच्या नादात, माशीसारखी रमली पाहिजे

तिला कवितेवर फारच राग, म्हणे
"कविता मी आल्यावर थांबली पाहिजे"

कविता अशी देवाच्या स्वर्गात सुरू, आणि
तिच्या कपाळावरच्या टिकलीवर संपली पाहिजे

त्यांना कविता काय माहित जे म्हणतात
ती सुर-तालात नीट बसली पाहिजे

कविता माझ्यासारखी संतापून मग
तिच्यासारखी हळूच लाजली पाहिजे

मेंदू कडे विचारांचा धक्का पोचवून मग
कविता हृदयाला पण लागली पाहिजे

समाजावर रडली नाही तर निदान
कविता कविच्या लाचारीवर हसली पाहिजे

ती रुसली की, तिला मनवण्यासाठी
एखादीतरी कविता पटकन सुचली पाहिजे

-- मयुरेश कुलकर्णी