चिमणी गाते कारण...

चिमणी गाते कारण...

चिमणी गाते कारण
तिच्यात गाणं असतं
तिचं गाणं गाण्यातच
तिचं जगणं असतं

मोराचं अंग नाही
त्याच्या पिसांचा रंग नाही
कोकीळेचं गाणं जसं गोड
तसा या गाण्याचा ढंग नाही

चिमणी गाते कारण
तिच्यात देवाचं गाणं असतं
पिसांचा पसारा आणि कोकीलेचा गोडवा
नसला, तरी काहीतरी सांगणं असतं

सूर्यावर प्रेम नाही
तिचा तारकांवर राग नाही
महिन्यातून दोन वेळा पूर्ण होणाऱ्या
चंद्रासारखा तिच्यात डाग नाही

चिमणी गाते कारण
ते तिचं गाणं असतं
ते गाणं जगाला देण्यात
तिचं जगणं असतं

कोणी ऐकायला नाही
आणि बघायला नाही
कोणी स्तुतितर नाहीच
पण टिका करायलाही नाही

चिमणी गाते कारण
ते तिच्या मनाचं गाणं असतं
ते रोज मनाने गाऊन
तिचं देवा जवळ जाणं असतं

चिमणी गाते कारण
ते गाणं फक्त गाणं नसतं
जिवनाला सर्वस्व देऊन
त्यातून आनंद घेणं असतं

-- मयुरेश कुलकर्णी