ऑगस्ट ३१ २०१०

२७. स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी

ह्यासोबत

स्वधर्म म्हणजे आता, या क्षणी तुम्हाला वाटणारी ऊर्मी, तुमचा अस्तित्वाशी होणारा संवाद, तुमचा अस्तित्वाशी असणारा संपर्क!


मला सुरुवातीला या गोष्टीचं फार कुतूहल वाटायचं की माणूस सोडून सगळी सजीव सृष्टी क्षणोक्षणी आपली जगण्याची दिशा कशी ठरवत असेल? या अनंत आकाशात झाडावरचा पक्षी कुठे जायचं हे कसं ठरवत असेल? आकाशात स्वैर विहार केल्यावर त्याला पुन्हा त्याचं घर कसं सापडत असेल? मग माझ्या लक्षात आलं की पक्ष्याला दिसतं! त्याला विचार करावा लागत नाही. ज्या क्षणी त्याला दिसतं त्या क्षणी तो त्या दिशेला निघतो, मन नसल्यामुळे इकडे का तिकडे, मग इकडेच का? कुठेच नाही गेलं तर काय होईल? असा संभ्रम त्याच्या मनात होत नाही, इकहार्ट म्हणतो जरा जरी संभ्रम झाला तरी पक्षी साधा एका फांदी वरून दुसऱ्या फांदीवर झेप घेऊ शकणार नाही! तुम्ही जेव्हा  संपूर्णपणे वर्तमानात असाल, वेळेचं कोणतंही ओझं मनावर नाही  असे एकदम निश्चिंत असाल की तुम्हाला देखील काय करावं हे उमजू लागेल, सरळसरळ समोर दिसू लागेल.

ही अंतःप्रेरणा (इंट्यूशन) प्रत्येकाला, प्रत्येक क्षणी उपलब्ध आहे आणि या अंतःप्ररणेनी जगणं म्हणजे स्वधर्म! मानवी जीवनात तणाव असण्याचं मूळ कारण ही अंतःप्रेरणा हरवणं आहे. आपण विचारांनी निर्णय घेतो म्हणून हा अंतःप्रेरणेचा धागा; या वैश्विक ज्ञानाशी आपला असलेला संपर्क तुटला आहे. सगळं जगायला आणि उपभोगायला असून माणसाला इथे पोरकं वाटतंय.

एकदा अंतःप्रेरणेनं जगायला लागलं की तुम्ही वेळ आणि पैसा या दोन्ही विवंचनांतून मुक्त होता कारण या दोन्हीही मानव निर्मीत कल्पना आहेत आणि एकटा माणूस सदोदित या दोन गोष्टींनी हैराण आहे! अंतःप्रेरणेनं जगून बघा तुम्हाला विनासायास जगण्याची दिशा मिळेल.


अंतःप्ररणेनी जगणं म्हणजे निश्चित काय करायचं? वर्तमानात निश्चिंत होऊन कसं जगायचं? विचारांपासून मुक्त होऊन अंतःप्ररणेनी कसं जगता येईल? तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे: समोर बघा! तुम्ही प्रयोग करून बघितल्या शिवाय कळणार नाही. अगदी साध्यातला साधा निर्णय घेताना देखील समोर बघा, तुम्हाला सुचायला लागेल! सध्या आपली स्थिती बघतो पण दिसत नाही अशी आहे, मनाचा चित्रपट इतका निरंतर चालू असतो की त्यातून थोडीशी उसंत मिळाली तरच समोरचं दिसतं आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं!


माणसानं एखाद्या मुलावर प्रयोग करून पाहण्या सारखा आहे, मुलाला काहीही शिकवायचं नाही, त्याच्या मेंदूवर काहीही लिहिलं जायला नको, ते मूल नुसतं बघून आणि ऐकून शिकू लागेल, त्याच्या संवेदना अतिशय तीव्र होतील आणि मानवाला त्या प्रयोगातून एका मानवी देहातून निसर्गाला काय म्हणायचंय ते कळू शकेल! शब्द आणि चित्र यांच्या समन्वयानं परिस्थितीचा अंदाज घेण्याच्या पद्धतीमुळे माणसाला अंतःप्रेरणेनं होणारं ज्ञान होऊ शकत नाही. सर्व आध्यात्मिक साधनेचा उद्देश हे ‘सदैव मनानं होणारं आकलन थांबवणं’ आहे, ते थांबल्यावर जे समोरासमोर ज्ञान होतं त्याला ‘दर्शन’ म्हटलं आहे.


अशा अंतःप्ररणेनं जगतांना एका क्षणी तुम्हाला ज्यात आकार प्रकट होतायत आणि विलीन होतायत तो सदैव समोर असलेला, प्रत्यक्ष असलेला, साक्षात असलेला, निराकार दिसेल, या घटनेला ‘साक्षात्कार’ असं म्हटलं आहे.

ही घटना वैश्विक शांतता ऐकू येणं अशी ही घडू शकते त्याला ‘एक्स्प्लोजन ऑफ सायलेंन्स’ असं म्हटलं आहे, मग ती शांतता सगळ्या आयुष्यावर पसरते म्हणून सर्व धार्मिक उद्घोष ‘ॐ शांती, शांती: शांती:’ नि संपन्न होतात.


साक्षात्काराचा दैनंदिन जीवनात उपयोग म्हणजे प्रत्येक आकार हा मुळात निराकार आहे हा बोध होतो! त्यामुळे जीवनात कमालीची मजा येते, जीवन एकदम हलकं होतं. शरीर अक्षरशः तरंगायला लागतं, शब्द आकाशी होतात, त्यांचे स्वर होतात! डोळे गूढ होतात, नशीले होतात. मृत्यू आणि लोकलज्जा या दोन्ही भयात सापडलेला माणूस मुक्त आणि स्वच्छंद होतो! आपण जीवन किती ही सुरक्षित आणि संपन्न केलं आणि साक्षात्कार झाला नाही तर आपण नामशेष होऊ ही सदैव वाटणारी भीती जीवनात स्वास्थ्य लाभू देत नाही; ती भीती संपते!

हा विषय चर्चेसाठी ठेवला होता तेव्हा पातंजलिंनी समाधीचं वर्णन : द्रष्टा, दृष्य आणि दृष्टी यांचा लोप असं केलं आहे असा प्रतिसाद होता. ते खरं आहे, अगदी उघड आहे, आणि अनेक पद्धतीनी मांडता येईल: सर्व प्रकट जग त्रिमिती आहे आणि निराकार ही या प्रकटीकरणाची चवथी मिती आहे, याला तुरीया वगैरे अनाकलनीय नांव दिली गेली असली तरी ते उघड आहे.

समजा आपण संगीत हे परिमाण घेतलं तर स्वर, ताल आणि लय ही तीन परिमाणं झाली आणि नेहमी दुर्लक्षीलं जाणारं 'शांतता' हे चवथं परिमाण झालं. या चवथ्या परिमाणाचा बोध म्हणजे साक्षात्कार!

समजा आपण स्वाद हे परिमाण घेतलं तर चव, स्पर्श आणि गंध ही त्याची तीन परिमाणं झाली आणि तृप्ती हे चवथं, या तृप्त अवस्थेचं नांव साक्षात्कार!

पातंजलिंचं म्हणणं घेतलं तर एखादं दृष्य बघतांना बघणारा, दृष्य आणि या दोन्हीतला संबंध बघणं ही तीन परिमाणं झाली, आणि ज्यात ही घटना घडते आहे पण चटकन लक्षात येत नाही ती 'स्पेस' हे चवथं परिमाण झालं, या चवथ्या परिमाणाचा बोध म्हणजे साक्षात्कार!


अशी निराकाराच्या बोधाची स्थिर अवस्था, रात्रंदिवस असलेली स्थिती म्हणजे समाधी! सदैव उन्मुख असलेली जाणीव परत स्वतःप्रत आलेली असते. या घटनेतून गेलेल्या व्यक्तीला ‘द्विज’ म्हटलं आहे, शरीराचा जन्म झाला तो प्रथम आणि तुम्ही स्वतःला दिलेला हा दुसरा जन्म! ज्ञानेश्वर महाराजांनी या घटनेचं कसं योग्य वर्णन केलं आहे ते या काव्यात कळतं:

अरे अरे ज्ञाना झालासी पावन,

तुझे तुजं ध्यान कळो आले,

तुझा तुची देव, तुझा-तुची भाव,

फिटला संदेह, अन्यासक्ती!

संजय


Post to Feedअप्रतिम ...
सौरभ, प्रयोग करून बघितलास, धन्यवाद!
सौरभ एक मुद्दा ..
नाही कळालं
सौरभ, उन्मेश `समोर बघणं म्हणजे समोर बघणं' दॅटस ऑल!
प्राणी आणि आपण
कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है
अब जिंदगी का रंग कुछ और गया!

Typing help hide