'मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या' आंदोलन

पुण्यात उद्या, म्हणजे ४ सप्टेंबर २०१० रोजी, शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने ''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन!
सध्या महाराष्ट्र शासन मराठी शाळांना मान्यता देण्याऐवजी मराठी माध्यमाच्या ज्या शाळांना अद्याप मान्यता मिळालेली नाही त्या शाळाच बंद करत आहे.
केंद्र सरकारच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या कायद्यामुळे मराठी माध्यमाच्या व शासनाची मान्यता नसलेल्या सर्व शाळांपुढे अस्तित्त्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे ह्यासाठी सकारात्मक पावले टाकण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने १९ जून रोजी परिपत्रक काढले व त्या अन्वये सर्व मराठी मान्यताप्राप्त नसलेल्या शाळा बंद करण्याची सुरुवात झाली आहे.
मातृभाषेतून व राज्यभाषेतून शिक्षण घेता येणे हा आपला हक्कच आहे. तो नाकारणे घटनाबाह्य आहे. मराठी शाळांना मान्यता न देता त्या बंद पाडून ह्या मूलभूत हक्कावरच गदा येत आहे. केंद्र सरकारने नव्या कायद्यात ३ वर्षांचा कालावधी शाळांनी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची पूर्ती करण्यासाठी दिला असताना महाराष्ट्र शासनाला शाळा बंद करायची घाई का हेही विचारणे अनिवार्य झाले आहे.
एकीकडे प्रचंड मोठी फी आकारणार्‍या उच्चभ्रूंच्या, खाजगी कंपन्यांच्या शाळांना शासन पायघड्या घालत आहे व दुसरीकडे वंचित मुलांपर्यंत पोचणार्‍या, मातृभाषेतून शिक्षण देणार्‍या शाळांना तेच शासन बंद पाडत आहे हे निषेधार्ह आहे.
परंतु शासन जर ह्या सर्व प्रश्नाची दखलच घ्यायला तयार नसेल तर मग शासनाने दखल घेण्यासाठी आंदोलन करण्यावाचून पर्याय नाही. मराठी शाळांच्या मान्यतेच्या मुद्याच्या निमित्ताने मातृभाषेतून शिक्षणाचा हक्क व एकूणच शिक्षणावर मूलभूत विचारमंथन होणे गरजेचे आहे.
शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या व रस असलेल्या प्रत्येकानेच ह्याची गंभीर दखल घेऊन त्यात आपले योगदान देणे आवश्यक आहे. ही लढाई रचनात्मक व संघर्षात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर लढावी लागेल.
ह्या लढ्यात खालील मुद्द्यांवर भर द्यावा लागेल :
१. मराठी शाळांना ताबडतोब मान्यता द्या व ती देताना नैसर्गिक वाढीच्या धोरणावर १०वी पर्यंत मान्यता देण्याचे धोरण राबवा.
२. मराठीतून शिक्षण देणार्‍या शाळांना अर्थसहाय्य द्या.
३. १९ जूनचा जी. आर. मागे घ्या.
४. राज्याची नियमावली बनवण्यासाठी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे समिती गठित करा व त्यात सुचवलेल्या प्रक्रियेनुसार धोरण व नियमावली करून मगच अंमलबजावणी करा.
४ सप्टेंबर (शिक्षक दिन पूर्वसंध्या) रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत मराठी शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, समाजातील मराठीप्रेमी व शिक्षणाविषयी विचार व कार्य करणार्‍या व्यक्ती एकत्र येऊन निदर्शनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतील.
मराठीविषयी आस्था व वरील मुद्द्यांवर सहमती असणार्‍या सर्वांनाच ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हे आंदोलन शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने होईल.
अलका टॉकीज चौक ते कर्वे रोड चौक पुणे ह्या दरम्यान लकडी पुलाच्या दुतर्फा हा कार्यक्रम होईल.
त्यात मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या असे आवाहन करणारी पोस्टर्स, बॅनर्स, पत्रकेही असतील.
सहभागी शाळांचे विद्यार्थी, पालक व शिक्षक घोषणांची बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी बनवून आणतील.
ह्या कार्यक्रमाचे कार्यालय ग. रा. पालकर शाळेतूनच चालेल. सर्व माहिती, पत्रके इ. तिथे उपलब्ध होईल.
आपल्या मागण्यांचे निवेदन करून त्यावर उपस्थित, रस्त्यातील नागरिक व कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांच्या सह्या घेतल्या जातील.
शिक्षणमंत्र्यांना व स्थानिक शिक्षणाधिकार्‍यांनाही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून वरील मुद्द्यांना व प्रश्नांना उत्तरे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी फोन :
रमेश पानसे : ९८८१२३०८६९, सुधा भागवत : ९८२२७६९५३५.
सलील कुलकर्णी : ९८५०९८५९५७, सुहास कोल्हेकर : ९४२२९८६७७१, सुप्रिया पालकर : ९९२१७१०५८८.
ईमेलः andolan.napm@gmail.com
(आधार : शिक्षण हक्क समन्वय समितीने जारी केलेले पत्रक)