मला माहित नाही

मला माहित नाही


माझ्या कवितेतून,
ती मला शोधत होती
आणि मी तिला
नक्की कोणाला सापडले कोण
मला माहित नाही


तिचा थरथरता हात तिने
माझ्या थरथरत्या हातात दिला
तेव्हा,
नक्की कोणाचा आधार मिळाला कोणाला
मला माहित नाही


कालच्या पावसात जे वाहून गेलं
ते घर माझं होतं,
जे वाहून गेलं ते माझं होतं
का जे उरलं आहे ते माझं आहे
मला माहित नाही


ती म्हणते मी चांगला दिसतो
आता मी खरंच दिसायला चांगला
का तिच्या डोळ्यातून चांगला दिसतो
मला माहित नाही


कालचा वेळ 'वाया' गेला
आज मी मोठा झालो
कालचा वेळ 'वाया' गेला का
ती आजची तयारी होती
मला माहित नाही


उत्तरांपुढे प्रश्नचिन्ह लागायला लागली
तेव्हा प्रश्न वाढले, उत्तरं संपली
पण खरंच उत्तरं संपली का
उत्तरांवरचा माझा विश्वास संपला
मला माहित नाही


आधी चाललो ज्या वाटेवर
नंतर मी ती वाट बदलली
पण मी नशिब बदलले का
वाट बदलणेच नशिबात होते
मला माहित नाही


आजच्या दिवसातून मी एक तास चोरला
एक तास चोरला मी
का बाकीचे हरवले मी
मला माहित नाही


चार लोक जोडले मी
शेवटच्या प्रवासासाठी
पण शेवटच्या प्रवासासाठी
चार लोक तरी आले का, ते
मला माहित नाही

१०
चार पुस्तकं शिकून मी
झालो हुशार थोडा
पण शहाणा झालो मी, का
वेडं बनायला घाबरलो मी
मला माहित नाही

११
कालच्या गोंधळात साऱ्या
अंधारी रात्र गेली
सकाळी अंधार गेला,
पण गोंधळ गेला का, ते
मला माहित नाही

१२
मी बंद केले डोळे
हे जग गायब झाले
फक्त मीच झोपलो, का
हे जग ही झोपले, ते
मला माहित नाही

१३
काल पोट उपाशी होतं
पण खायला अन्न नाही
आज अन्न आहे भरपूर
पण पोटात जागा नाही
यातलं कुठलं जास्त वाईट, ते
मला माहित नाही

१४
आज एकांतात अशा
हे सत्य डोकावले
पण साक्षीदार नसले तर
ते सत्य ठरतं का, हे
मला माहित नाही

१५
अज्ञानाच्या बुडबुड्याला
वास्तवाच्या टाचणीने फोडले
ज्ञान शिंपडल्यावर
सुख उरले का, ते
मला माहित नाही

१६
जे पांघरून जगलो ते
शहाणपण खोटे होते
शहाणपण गेले त्याबरोबर
आतला वेडेपणा पण गेला का, ते
मला माहित नाही

१७
आज सत्य गोरे आहे
काल सत्य काळे होते
जे मला दिसले ते
खरंच सत्य होते का
मला माहित नाही

१८
आजकाल शब्द रिकामे
वाहती भावनांचे ओझे
पण मुळात भावनाच रिकाम्या
का ते शब्द तोकडे पडले
मला माहित नाही

१९
सर्वात पहिल्यांदा
मिळवली नजरेला नजर तेव्हा
त्या क्षणा दोन क्षणात
नक्की काय घडलेले
मला माहित नाही

२०
आज अंगणात माझ्या
दोन चिमण्या आल्या आणि गेल्या
दाणे टिपून गेल्या
गाणं म्हणून गेल्या
त्यांना दाण्याची का मला गाण्याची
कोणाला कशाची गरज जास्त होती
मला माहित नाही

२१
जे जळवून राख झालं
ते काव्य माझे होते
जे पटवून उध्वस्त झाले
ते गाव माझे होते
आता नाव सुध्दा माझे
मला माहित नाही

२२
रात्री पाऊस रडून गेला
सकाळी दव रडून गेले
या दोन पाण्यातला
फरक गवताला कळेल का
मला माहित नाही

२३
या सुखांनो या
मला दु:ख देऊन जा
फुलं अशी काटेरी आणि
जखमा अशा गोड की
यांचे नेमके इरादे
मला माहित नाही

२४
माझे स्वप्न समोर
माझी वाट बघतय
पण पाऊल पुढे मी
टाकतो जपून
उद्याचे खड्डे आज
मला माहित नाही

२५
रडाया लागलो तेव्हा कळालं
रडण्यासारखं फारच होतं
मग रडायचं सोडून
लढाया लागलो तेव्हा कळालं
लढवण्यासारखं फारच आहे
पण नक्की लढलो का
आणि रडलो का नाही
मला माहित नाही

२६
कधी रांगले शब्द माझे
कधी पांगले शब्द माझे
मी गेल्यावर उरले फक्त
चार चांगले शब्द माझे
माझ्या थडग्याजवळच्या खांबावर
कोणी टांगले शब्द माझे
मला माहित नाही

२७
काही बनून वेडे
सतत प्रेम शोधतात
काही म्हणून शहाणे
प्रेमापासून दूर राहतात
काही घाबरट नुसते
प्रेम लोकांचं पाहतात
काहींना भेटलं चुकून तर
प्रेमाला नमस्कार करतात
यातला नक्की मी कोणता ते
मला माहित नाही

२८
मिरवल्या अभिमानाने मी
छातीवरच्या जखमा
दाखवल्या जगला प्रेमाच्या
पाठीवरच्या जखमा
कधी गायब झाल्या जखमा
कधी अजून खोल झाल्या जखमा
पण जखमा झाकायची कला
मला माहित नाही

-- मयुरेश कुलकर्णी