काही जुन्या चारोळ्या

काही जुन्या चारोळ्या

सुंदर मुली असतात गुलाबासारख्या
त्यांचे बाप आणि बंधू असतात काटे
काटे बोचणार हे माहिती असलं
तरी गुलाब हवाऱ्हवासा वाटे

काळामुळे मी लहानाचा मोठा होतोय
आकाशात उडायचा प्रयत्न करतोय
तू जवळ असलीस की वाटतं उडतोय
नाहीतर वाटतं, मी उगीच धड-पडतोय

जिवनाची भातुकली, मी
चार खोलीत सावरणारा
फार बोलावंसं वाटलं तरी, मी
चार ओळीत आवरणारा

तोंडात आणि डोळ्यात मला
फारच विरोधाभास जाणवतो
तोंड कर्तव्य म्हणून बडबडतं
शांत डोळ्यात शब्दांचा निवास जाणवतो

कुणीतरी लागतं आपल्याला
फटके मारून सुधारणारं
मग परत तोच हात
मायेने डोक्यावरून फिरवणारं

मी काही केलं की
वाटतं त्यावर माझं नाव लिहावं
मग वाटतं, कामच असं करावं
की नाव आपोआप कळावं

मला जसं आपल्याविशयी वाटतं
तसं तुला कधी वाटेल का?
आणि आपलं प्रेमात पडणं
तुझ्या बापाला कधी पटेल का?
वाटतं मी या पृथ्वीसारखा
स्वत:भोवतीच गोल फिरतोय
तुझ्यापासून सुरू होऊन
तुझ्यावरच येऊन संपतोय

तुझ्या प्रेमाच्या सागरात
मी भिजून चिंब झालोय
मी, ‘मी’ राहिलो नाही
तुझंच प्रतिबिंब झालोय

काल आपल्याला वेडं ठरवणारे
आज आपल्याला शहाणं म्हणतात
प्रश्न असा पडतो की
लोकं आपल्याला किती जाणतात

कविता ज्यावर छापतात त्याला
पुस्तक किंवा मासिक म्हणतात
आमचंतर अस्तित्त्वच कवितेतलं
आम्हाला रसिक म्हणतात

माणसांची असंख्य पापे
नदीत खरंच धुतली जातात का?
ईतक्या माणसांची पापे धुऊन
नद्या खरंच पवित्र राहतात का?

देव जणू आहे छोटं बाळ
ज्याला आलाय कंटाळा
आपल्याला पाहिजेतसं हलवतो
आपण जणू त्याचा खुळखुळा

कविता माझा व्यवसाय नाही
कविता माझी अवस्था आहे
जे बोलायचं नसतं ते लिहितो
अशी ही अबोल व्यवस्था आहे

– मयुरेश कुलकर्णी