मारवा

संध्याकाळी भरून येते अंबरात काहीबाही
सीमारेषा पुसून घेते नभ धरणीला हृदयाशी
दिवसाच्या ढळल्या वस्त्रांची वाटेवरती रास पडे
दूर निघाल्या दिवसामागे सांज धावते जिवानिशी

हवेहवेसे काही तिचिया हातामधुनी सुटू बघे
धीर करोनी  पकडावे तर हात रिते अन् थरथरते
जन्मापलिकडल्या दुःखाची डोळ्यांमधुनी जाग दिसे 
उगा कुणाची चाहुल येता काळिज होई हुरहुरते

विरहिणी होई व्याकुळ तिजला विरह चिरंतन भासतसे
दूर राहिल्या आठवणींचे मृगजळ तिजला खुणावते
शेव सावरीत पदराचा ती रात पुढे येऊ लागे
आर्त विराणी कोणी गाते, विकल वेदना दुणावते

माथ्यावरचा चंद्र कुठे अन् पायाखाली कुठे धरा?
एक पोकळी उठते आणि गिळू पाहते तिला पुरी
बांध फुटोनी, डोळ्यांमधुनी उधाण-भरती होत सुरू
विद्ध मारवा गात राहते सांज उरी घेऊन सुरी

--अदिती 
(२६.११.२०१०
कार्तिक कृ.५, शके १९३२)