केवळ कवितेसाठी

केव्हा, कुठे, कधीही
कवी कविता का करतो?
काळजातल्या कल्पना
कवितेत कैद करतो………… || 1||

कवी कल्पनेचा काटा
कमाल किमान करतो
कुणास का कळेना
कवी कल्पना कशी करतो? …. || 2 ||

कधी कधी कविता
कवीस कासावीस करते
कवीच्या काळोखी काळजात
काजव्याला कंदील करते……. || 3 ||

कवितेमधुनी कवी
काट्यास कापूस करतो
कोऱ्या कागदावर कवी
कविता कुणासाठी करतो? …. || 4 ||

किरणांची किमया
कळ्यास कुसुम करते
कोकिळेचा कंठ
कुहूकुहू कविता करते……….. || 5 ||

कादंबरीतील कथा
कुणासही कळेल
काट्यांच्या कविता
कमळासही कळेल…………. || 6 ||

काव्यवेडा कवी
कशावरही कविता करतो?
केवळ कवितेसाठी
‘क’ ची कविता करतो…….. || 7 ||