माणसे दिसली मला

भूक पोटी जाळणारी माणसे दिसली मला
मूक टाहो फोडणारी माणसे दिसली मला

जेवणाला घास नाही बाळ रडते गोमटे
लेकरा ओवाळणारी माणसे दिसली मला

आर्त आली चीख कानी जाळिले कोणी तिला ?
मौन ओठी पाळणारी माणसे दिसली मला

श्वापदे कुजबूज करिती एक सांगे किळसुनी
आत्मजेला हुंगणारी माणसे दिसली मला

धूंद रात्रीला निघालो काल मी वेश्येकडे
नजर माझी टाळणारी माणसे दिसली मला

नाच गाण्यांचा तमाशा खूप गर्दी खेचतो
किर्तनाला पांगणारी माणसे दिसली मला

का अशी उडती गिधाडे प्रेत तेथे पाहुनी ?
भूक अपुली जाणणारी माणसे दिसली मला

पाठवी विषसर्प येथे पाक शेजारी कसा ?
दूध त्यांना पाजणारी माणसे दिसली मला

का वृथा "निशिकांत" तू बघतोस काळोखा कडे ?
ओज गर्भी उगवणारी माणसे दिसली मला

निशिकांत देशपांडे    मो. न.  ९८९०७ ९९०२३
E  Mail:-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा