एक "राज'कीय खेळी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या सबुरीने निषेध नोंदवत आपल्या राजकीय मुरब्बीपणाचे (आणि मुत्सद्दीपणाचे) चांगलेच दर्शन घडविले. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या जाहीर सभेची सर्वांनाच मोठी उत्सुकता होती; आणि तशी उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी सुरवातीपासूनच राज ठाकरेंनी अगदी पद्धतशीरपणे प्रयत्न केला. आजच्या माध्यमकाळात असा प्रयत्न यशस्वी झाला नसला तरच नवल. प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी ज्या संख्येने लोक उपस्थित होते, त्यावरून याची प्रचिती यावी.

औरंगाबाद येथील राज यांचे भाषण आगामी "राज'कारणाचा वेध घेणारे होते. सुरवातीलाच त्यांनी आमदार हर्षवर्धन जाधवांचा दोष असेल आपण त्यांचे समर्थन करणार नाही, अशी थोडीशी पडती वाटणारी भूमिका घेतली. त्यातून त्यांची आपल्या पक्षातील (आणि स्वत:च्या नेतृत्वातीलही) शिस्त मोठ्या खुबीने दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी अपेक्षेप्रमाणे संबंधित पोलिसांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. या मागणीमुळे मनसेच्या सर्वच कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांनाही आनंद वाटणे स्वाभाविक होते. त्यांना तसे वाटू देणे किंवा आपण तुमच्या पाठीशी आहोत ही भावना निर्माण करण्यात राज यशस्वी झाले. त्यातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील स्वतःच्या कुशल नेतृत्वाची प्रतिमा सहजपणे भक्कम केली. खरे तर पोलिसांच्या विरुद्ध धागा पकडून पुढे बोलता आले असते. पण नेमक्या याच ठिकाणी त्यांनी मुत्सद्दीपणा दाखवत, अशा घटनेत पोलिसांचा कसा वापर होतो, पोलिसांना आमचे नेहमीच कसे सहकार्य असते, या अर्थाचे बोलणे केले. त्याद्वारे पोलिसांचे मत आपल्याविषयी आणि मनसेविषयीही अनुकूल करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न त्यांनी केला.

 त्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. विशेषतः गृहमंत्री आर. आर. पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी आगपाखड केली. खरे तर तर राज्य सरकार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांच्या आघाडीचे. तेव्हा राज यांना आघाडी सरकारवरच थेट टीका करता आली असती. पण यातही त्यांनी राजकीय खेळी साधत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना लक्ष्य केले. त्यामुळे झाले असे, की संपूर्ण सरकारवर टीकेची झोड उठविली, असा त्याचा अर्थ न होता तो केवळ काही मंत्र्यांपुरताच मर्यादित राहिला. या सगळ्यांमधून पोलिस आणि कॉंग्रेसचे एकप्रकारे लांगूलचालनच त्यांनी केले. (भविष्यात आघाडीत फूट पाडता येते का, याचाही राज यांचा छुपा मानस असू शकतो. त्यातून होणारा राजकीय फायदा अर्थातच मोठा असेल. )

सर्वसामान्य जनता, मनसेचे कार्यकर्ते, पोलिस आणि कॉंग्रेसवाले अशा सर्वांनाच आपल्या बाजूला ओढण्याची अप्रत्यक्ष कसरत आणि खेळी करण्यात राज काही प्रमाणात यशस्वी झाले, असे समजायला बराच वाव आहे. या सगळ्या प्रकाराचे भविष्यात वेगळे परिणाम होतील. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे भविष्यात कदाचित बदलू शकतात. सध्या तरी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून असेच जाणवते आहे. ज्यांना राज यांच्या ठाकरी शैलीतील भाषणांची आवड आहे, त्यांच्यासाठी मध्ये-मध्ये तशा शैलीचा आधारही त्यांनी घेतला. जसे की, मुख्यमंत्र्यांना जुन्या काळातील खलनायकासारखे दिसतात असे म्हणणे. असे काही तोंडी लावण्यापुरते एक दोन प्रसंग सोडले, तर एकूणच संपूर्ण भाषण अतिशय संयमाने आणि भविष्यसूचक राजकीय चालींनीच भरलेले होते. थोडक्यात काय तर औरंगाबादच्या भाषणावर असलेल्या सरकारी मर्यादेच्या चौकटीतूनच राजकीय खेळीचा बाण सोडण्यात राज ठाकरेंना बऱ्यापैकी यश आले, असेच म्हणावे लागेल.