पूल

"मी आजीला परत आणते." तिने बोटानेच इराला शांत बसण्याची खुण केली. इरा काही बोलली की गुरुजी तिच्याकडे कटाक्ष टाकत होते त्यामुळे तिला फार अवघडल्यासारखं होत होतं. पण तिची लुडबुड चालू होतीच.
"आई तू रडू नकोस. मी प्रार्थना करणार आहे. मग तुझी आई येईल परत. पण रडलीस तर नाही येणार ती."  इवल्याशा हातानी खांद्यावर रेलून इरा तिचे डोळे पुसत होती. ती तिथून उठलीच.
"चल, तू आजीला सांगितलं होतस ना शंकरपाळे करायला, तिने करुन ठेवले होते. देते चल." ती हळूच इराच्या कानात कुजबुजली. 
"आणि लाडू" 
"हो गं."
इराने शंकरपाळे तोंडात टाकले तसं आईने मुद्दाम केलेले शंकरपाळे आपणही खावेत अशी इच्छा झाली तिला. पण हातातले शंकरपाळे काही केल्या घशाखाली उतरेनात. निराशेचे ढग वेढून राहिले. अशी कशी गेली न सांगता? आजारपण नाही की काही नाही. थांबता नाही आलं थोडे दिवस? निदान सर्वांची भेट झाल्यावर जायचं. तिला आईवर खूप चिडावं, रागवावं असं वाटत होतं.  हातातले शंकरपाळे तिने पुन्हा डब्यात टाकले. हताश नजरेने ती इराकडे पहात राहिली. आईने अचानक या जगाचा निरोप घेतला हे पचवणं जड होतं. पंधरा दिवसाचा तर प्रश्न होता. येणारच होती ती भारतात. त्यानंतरचे बेत कितीतरी महिने आधीच नव्हते का झाले. तिने तीन चार महिने आधी तिकीट काढलं तेव्हापासून ती भारतात पोचली की काय करायचं, कुठे जायचं... खूप काही आई आणि बहीणींबरोबर ठरवून झालं होतं. 
एरवी चार आठवड्यांची सुट्टी पुरता पुरायची नाही आणि आता या तीस दिवसांचं काय करायचं ही चिंता. तेरावा दिवस झाला आणि घर एकदम रिकामं झालं. दोन मुलं, वडील आणि ती. उठल्यापासून काय करायचं हा मुलांपुढे प्रश्न उभा राहायचा. नीलने झोपा काढत रहायचा सोपा मार्ग शोधला. पुस्तकं वाचायची, खायचं, प्यायचं, झोपायचं, परत पुस्तक हातात. इराचंही बाहेर फीर, बागेतली फुलं काढ, चित्र काढ असं काहीतरी चालू होतं. काहीच नाही तर टी. व्ही. होताच. आत्ता दोघं भावंडं टी. व्ही. लावून बसले. वडील डोळ्यावर हात ठेवून विचारात गढलेले. तिची स्वयंपाकघरात खुडबुड चालू होती. सगळ्यांनीच पोटात काहीतरी ढकलायला हवं म्हणून तिने आमटी, भाताचा कुकर लावला. स्वंयपाकघरातलं काही आवरता येतं का तेही पहायचं होतं. वडिलांना एकट्याला नंतर काही सुचलं नसतं. डबे उघडले की तिच्या मुलांना आवडतात म्हणून मुद्दाम  केलेले शंकरपाळे, लाडू  काही ना काही दिसत होतं आणि मग त्या संबंधात आईशी फोनवर झालेलं संभाषण जसच्या तसं तिला आठवत होतं. तिने एकेक डबा काढून ठेवला. तिच्यासाठी म्हणून केलेल्या गोष्टी ती घेवून जाणार होती. असेल आई आजूबाजूला तर कळेल तिला सगळं नेलंय ते. 
जेवणं आटोपली आणि तासाभराने सगळं शांत झालं. पलंगावर पाठ टेकली की झोप लागेल इतकी दमली होती ती. पण अस्वस्थ मन दगा देत राहीलं. ती या कुशीवरुन त्या कुशीवर वळत राहिली.  त्यातूनच कधीतरी डोळा लागला पण अचानक  दचकून ती जागी झाली. गुप्प अंधार.  धडपडत उठून अंधारातच ती स्वयंपाकघरात गेली. यंत्रवत कपाट उघडलं आणि अगदी खालच्या रांगेतला उजवीकडचा निळ्या रंगाचा पत्र्याचा डबा तिने घाईघाईने उघडला. चाचपडल्यावर कसल्यातरी पाकीटाचा आवाज झाला, तशी ती भानावर आली. चकल्याचं मोठं पाकिट.  तिने  इकडे तिकडे पाहिलं. सारं शांत होतं. काय हा वेडेपणा, किती वाजले आहेत हे ही पाहिलं नव्हतं. येवून हाच डबा का उघडावासा वाटला तेही तिला उलगडेना. आणि डब्यात काय असावं तर तिच्या आवडत्या चकल्या. पाकीट हातात धरुन ती रडत राहिली. हुंदका दाबत, ओठ घट्ट आवळत. मुलांची, वडिलांची झोपमोड नको व्हायला. आईनेच उठवलं की काय? तीच आली होती का सांगायला? का उठावसं वाटलं असं अपरात्री? संध्याकाळी डबे पाहताना इतक्या जुन्या पत्र्याच्या डब्यात आई कशाला काय ठेवेल म्हणून नेमका तो डबा तिने पाहिला नव्हता ते डोक्यात होतं की खरच आईने येवून सांगितलं? असे अनुभव येत असतील का सर्वांनाच? रडता रडताच ती चकल्या  खात होती. आतून आतून आईही तिच्या शेजारी बसून चकल्या खातेय अगदी दुपारचं जेवण झाल्यावर त्या दोघी टी. व्ही. वरचे कार्यक्रम पहात पहात अशा गोष्टींचा फडशा पाडायच्या तसं, हे तिला मनोमन पटलं होतं. 
"आईने आणि मी फोनवर ठरवलेले बेत पार पाडायला हवेत. निदान जेवढे जमतील तेवढे."  आईही तिच्या बरोबर येणार असल्यासारख्या उत्साहात ती म्हणाली.  चार आठवड्याचं काय करायचं ही चिंता अचानक संपली होती. काल रात्रीच्या प्रसंगापासून आई कुठेही गेलेली नाही. सतत आपल्याबरोबर आहे असं वाटत होतं.
"मोसमला जावूया. तू जाणार होतीसच ना आजीबरोबर?" नीलने एकदम विचारलं तसं तिला आश्चर्य वाटलं. तिच्या चेहर्‍यावरचे आविर्भाव त्याने जोखले.
"त्यात काय विशेष? मला आवडतं जायला तिकडे म्हणून म्हटलं. आणि इराने तर पाहिलेलच नाही मोसम. तिला पण मजा येईल."
"चालेल, जाऊ मग उद्याच." मुलं तयार आहेत म्हटल्यावर प्रश्नच उरला नाही.
"मोसमला मी जातोच सारखा. तुम्ही जावून या. परत आलात की मग बाकी कुठे जायचं ठरवलं होतत तिकडे जाऊ." वडिलांच्या बोलण्याला तिने मुक संमती दिली. 
खारेपाटणच्या पुलावरुन गाडी आत वळली.  उजव्या हाताला  खालून वहाणारी नदी, मधूनच ठीपक्यासारखी नजरेत भरणारी कौलारु चिर्‍याची घरं आणि उंच उंच झाडं. मान तिरपी करत ती खिडकीतून मागे वळून वळून पहात राहिली.  सुखा नदीवरचा काळ्या दगडाचा पूल, दगडांना वेढलेल्या पांढर्‍या रेषा आणि पूलाखालून संथ लयीत झुळझुळणारं पाणी. अलगद निसटलेला भूतकाळ जवळ आल्यासारखा भासत होता, त्यात उडी मारावी, आठवणींच्या पावसात चिंब भिजून जावं असं वाटत होतं. त्यावेळेस खिजगणतीतही नसलेल्या पण वर्षानुवर्ष  नकळत साठत गेलेल्या आठवणी मनाच्या सांदीकोपर्‍यातून बाहेर पडू पहात होत्या. अगदी आत्ता आत्तापर्यंत तर पूल ओलांडला की बस थांबायची. उतरलं की डांबरी रस्त्याचं नामोनिषाण नष्ट व्हायचं. लाल मातीत पाऊल टाकायचं ते कधी रेंगाळत, उन्हातान्हातून घाम पुसत, काहीवेळेस आई वडील, भावंडांबरोबर उत्साहाने, कधीतरी एकटच आलेलं असलं की पायाने दगड उंच भिरकावत, कपड्यांवर उडालेली धूळ वारंवार झटकत तर कधी गडीमाणसाच्या खांद्यावर बसून दोन्ही बाजूला पाय टाकून मुक्कामाला पोचणं... कधी झालं हे सगळं भूतकाळात जमा?
अडीच मैलांचा रस्ता पाच मिनिटांत सुमोने कापला आणि गाडी आत वळली. गचक्यावर गचके बसत होते, पण रस्ता होता अगदी घरापर्यंत नेणारा, इतक्या आतपर्यंत बांधकाम झालं होतं की अगदी खालपर्यंत पोचायला होणार होतं. फक्त छोटा वहाळ ओलांडला की आलं घर. यात कसली आली आहे मजा? गाडीत बसलं की पोचलं. मध्ये काही नाहीच. जोरात धक्का बसला तशी ती सावरुन बसली. 
"आता गोठा आमचा" उत्साहाने तिने नीलकडे पाहिलं. केसांची झुलपं हलवित नीलने कॅमेरा रोखला. 
"गोठा म्हणजे?" तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहून त्याला हसायला आलं.
"मला माहित आहे गं गोठा म्हणजे काय ते. खेचत होतो तुझी.  माझंही मराठी आहे  बरं" तीही हसली.  लेक आता तिची ’खेचण्या’ एवढा मोठा झाला होता. 
"अरे ठेव तुझा कॅमेरा. गोठा नाही दिसत. पाडून टाकलेला दिसतोय." आवाज भरुन आला का?  तिने पाण्याची बाटली तोंडाला लावली. रिकाम्या सपाट टेकडीकडे निरर्थक नजरेने ती पहात राहिली. 
"ही अख्खी टेकडी आमची बरं का." तिने उसन्या कौतुकाने नीलला सांगितलं.
"पण त्या गोठ्याचं काय झालं?" नीलने हे विचारावं याचच तिला अप्रूप वाटलं.
"आता घरी पोचलो की काकांना विचारु. तेव्हा येता जाता डोकावायचो आम्ही या गोठ्यात. गवताच्या पेंडीच असायच्या. अजून अगदी घराजवळ आहे एक गोठा त्यात मात्र गुरं बांधलेली असायची सुरुवातीला, म्हणजे आम्ही अगदी चौथी, पाचवीत असू तेव्हा. नंतर मागच्या अंगणाला लागून केली होती गुरांसाठी जागा. काकूला दुध काढताना पाहिलय मी. मी पण प्रयत्न केला होता पण लाथ मारायची रंगू." 
"रंगू? गायीचं नाव रंगू?" तिलाही त्या नावाचं आत्ता हसू आलं. पांढर्‍या रंगाची, काळ्या ठिपक्यांची ती गाय. खोपीत बसलं की बाबूंच्या पट्ट्यामागे रवंथ करणारी गाय दिसायची. दुपारी पत्त्यांचा डाव तिथेच तर रंगायचा. मे महिन्याची सुट्टी म्हणजे ही धम्माल. सकाळ उजाडली की दंगा, आरडा ओरडा चालू. दिवसभराच्या उनाडक्या झाल्या की संध्याकाळ मात्र तिन्हीसांजच्या मिणमिणत्या दिव्यात वेगळीच भासायची. 
शुभंकरोती कल्याणम... सुट्टीत आलेली चुलत, आते सगळी भावंडं जोराजोरात झोका काढत तितक्याच जोरात परवचा म्हणत, मग मारुतीस्त्रोत्र... कुणाकुणाला काय काय येतं ते म्हणून व्हायचं. मध्येच धपकन एखाद्याने मारलेली उडी, हाताने झोका थांबवायचा केलेला आटोकाट प्रयत्न. स्वयंपाकघरात चुलीवर ढणाढणा शिजणारा भातही दिसायचा खिडकीतून.  त्या आंबेमोहर तांदूळाचा गंध शरीरभर उतरायचा लगेच. तिथेच उकीडवी बसलेली मोसमची आजी. पायरीवर तिच्याशी गप्पा मारत बसलेली आई. काकूची चाललेली लगबग. परवचा म्हणून संपली की मात्र गुप्प अंधार पडलेला असे. तरी जेवायला यायची वर्दी येईपर्यंत सगळी तिथेच बसून रहात. पायरीवर बसलं की गडग्याच्या पलिकडे उंच उंच झाडाचं जंगल. कुणीतरी भूताच्या गोष्टी ऐकायची टूम काढायचंच. भुतं, पिपंळावरचा मुंजा, महापुरुष, वास्तुपुरुष... ऐकता ऐकता भूतानी आपल्याला वेढलय या कल्पनेने अंगावर काटा उठायचा. घाबरलं की भुतं धरतात हे कुणीतरी सांगितलेलं लक्षात आलं की शूरपणाचा बहाणा, तितक्यात झाडांच्या फांद्या विचित्र आकार धारण करत, एकदम काहीतरी हलल्यासारखं वाटे, दूर झाडीतून आगीचा लोळ उठल्यासारखा दिसे आणि तो क्षणात नाहीसाही होई. जरा कुठे खुट झालं की अंगावर शिरशिरी. तिला कधी एकदा त्या घरी पोचतोय असं होवून गेलं. नीलला एकेका जागी नेत ती त्या आठवणी जागवणार होती.
"तुला ठाऊक आहे ना घरी आता फ्रीज, टी. व्ही. आहे आणि पाण्याचा पंप बसवलाय." तिच्या समाधीतून नीलने जागं केलं.
"हो, तुला कसं ठाऊक हे? मोसमची आजी गेल्यापासून मी गेलेच नाही मोसमला."
"पण मी गेलोय ना. म्हणूनच सांगतोय तुझ्या मनातल्या चित्राला धक्का बसेल त्याची  तयारी ठेव." तो हसून म्हणाला. 
"हं, खरं आहे तुझं. पण माझ्या मनातलं चित्र मी तुझ्यासमोर रेखाटेन. आत्तापर्यंत तू ऐकत आलायस त्या त्या जागा मी तुला दाखवीन. भले सगळं बदललं असलं तरी. पण तू कधी गेला होतास?"
झाली पाच सहा वर्ष, आजोबांबरोबर गेलो होतो मी. रेल्वेने. तू घरीच राहीलीस. आजी आणि तू."
"मोसमचे  आजी, आजोबा गेल्यावर वाटायचंच नाही यावसं इकडे."  
"म्हणजे दहा वर्षांनी येते आहेस तू." ती काहीच बोलली नाही. गाडी अरुंद रस्त्यावरुन संथपणे खाली उतरत होती. करवंदाची जाळी तिला लहान मुलीसारखी खुणावत होती. गाडी पुढे पाठवून चालत जावं असा विचार मनात डोकावून गेला तो तिने टाळला. काका येवून उभे राहिले असतील वहाळापलिकडे.
"ताई, पुढच्या वेळेला याल तेव्हा वहाळावर पूल बांधलेला असेल. गाडी तुमच्या अंगणापर्यंत." सुमोच्या ड्रायव्हने तिच्या माहितीत भर घातली.
’कशाला हवाय पुल. म्हणजे मातीला स्पर्शच करायचा नाही तर.’ मनातल्या विचारांना दाबत ती म्हणाली.
"अरे वा, तुम्हाला माहिती दिसते आहे इकडची."
"तुमच्या घरातल्या लोकांना मीच आणतो ना नेहमी. कितीतरी वर्ष तुमच्याकडच्या पाव्हण्यांना आणतोय मी. तुम्हाला पण आणलं आहे एक दोनदा" 
"हो का, पटकन ओळखलं नाही मी तुम्हाला." ओशाळल्या आवाजात तिने दिलगिरी व्यक्त केली. त्यानेही हसून चालायचंच अशा अर्थी मान डोलावली. नीलने तेवढ्यात ड्रायव्हरकाकांचा फोटो उतरल्यावर घ्यायचं ठरवून टाकलं. वहाळाच्या अलिकडे गाडी थांबली तसा नील खुष झाला. 
"संध्याकाळी पोहायला यायला हवं इथे."
"अरे वहाळाच्या पाण्यात कसला पोहतोस? तितकी खोल नसते पातळी." 
"तू तर, तुम्ही कसे पोहायला शिकलात या वहाळात ते सांगतेस की आम्हाला."
"शिकलो कसले. शिकायला म्हणून यायचो आणि पाण्यात डुंबत बसायचो. मे महिन्यात सगळं पात्र सुकलेलं. डबकाभर पाण्यात भिजायचा आनंद मिळायचा तेवढा"
"पण मी पोहून बघणार आहे." तिने  त्याला मोडता घातला नाही. नीलचा वेळ तिथे कसा जाईल ही शंका तिच्या मनात होती. तो स्वत:च पर्याय शोधत असेल तर मोडता कशाला घालायचा. इरा मात्र गप्प होती. तिला हे सगळं फार वेगळं, नवीन होतं त्यामुळे तोंडाचा पट्टा बंद होता. तिच्या स्वभावाप्रमाणे न बोलता ती निरीक्षण करत राहील, प्रश्न सुरु होतील ते परत घरी गेल्यावर, तेव्हा आजोबांवर उत्तरं द्यायचं काम सोपवलं की झालं. 
"आणि आपण त्या मंदीरात जावू. रस्ता नाहीच आहे जवळ जवळ त्या बाजूला. हायकिंग, ट्रेकींग केल्यासारखी मजा येते."  तिच्याही डोळ्यासमोर ते जुनं पुराणं देऊळ उभं राहिलं. मोसमला आलं की कधीतरी संध्याकाळी त्या देवळात जायचा कार्यक्रम असे. केव्हाकेव्हा तिथे पोचायच्या आत मध्येच डोंगरावरच्या शाळेत डोकावायचा बेत होई. तंगडतोड करुन पाय  दुखायला लागले की काकूने नुकत्याच काढलेल्या ताज्या दुधाचा चहा प्यायची सर्वांना घाई लागायची. चहाची मजा होती की तिथे गप्पा मारायला बसलेल्या आजी, काकू आजी, आई, बाबा, काका याच्यांत लुडबुड करायची? तिला नक्की आठवेना आणि ठरवताही येईना. विचाराचा धागा तुटला तो एवढा वेळ ड्रायव्हरचे फोटो घेण्यात मग्न असलेल्या नीलच्या आवाजाने.
"आई, काका आजोबा थांबले आहेत पलिकडे." तिने उत्सुकतेने पाहिलं. मळखाऊ बनियन, खाकी रंगाची हाफ पँट घातलेले काका पाहून तिला गंमत वाटली. त्याच्या पोषाखात यत्किंचितही बदल झालेला नव्हता. पूर्वी असायची तशी हातात काठी नव्हती एवढच. गुरं नसल्याने काठी सुटलेली दिसत होती. 
"जपून या. या बाजूने नका येवू. खोल आहे पाणी." सुचना करत त्यानी तिथे कपडे चुबकत बसलेल्या दोघींना हात धरायला पाठवलं. नकळत तिने तो आधार घेतला. नीलने एव्हांना तो वहाळ ओलांडलाही होता. पलिकडे उभा राहून तो तिला चिडवायला लागला.
"कमॉन आई, हात कसला धरतेयस. ये ना बिनधास्त." 
"नको रे, ड्रेस नको भिजायला माझा." 
"हो का? थांब, मीच पाणी उडवतो तुझ्यावर."
तिने रागाने त्याच्याकडे दृष्टीक्षेप टाकला पण एव्हाना ती अंगावर आलेल्या पाण्याच्या शिडाकाव्याने ओली झालीच. नीलच्या हसण्याकडे दुर्लक्ष करत ती पलिकडे पोचली. मातीत पाय घासत, या पायाने तो पाय स्वच्छ करत ती काकांकडे पाहून ओशाळवाणं हसली.
"मला वाटलं आमचा परदेशातून आलेला नातू स्वत:ला सांभाळून करेल सर्व, पण तूच पक्की परदेशी झाली आहेस." तिच्या उत्तराची वाट न पहाताच ते पाठमोरे होवून चालायला लागले. दगड, मातीतून रस्ता काढत ती त्यांच्या मागून जात होती. ताडताड टांगा टाकत नीलने लाकडी फाटकातून  उडी मारलीही. तिने चेहर्‍यावर उत्साह आणायचा प्रयत्न केला खरा पण आत मध्ये गुडघ्या एवढं वाढलेलं रान, खुंटलेलं अंगण, अंगणातून वरती जायची दगडी पायर्‍यांची बंद झालेली वाट आणि सुन्न करणारी शांतता... तिच्या आठवणीतलं काही उरलं आहे की नाही या शंकेने तिचा जीव घुसमटायला लागला. आठवणीतली माणसं गेली हे सत्य पचवलं होतं, निदान आठवणीतलं घर... ते बदललं असेल याची कल्पना असली तरी एवढ्या बदलाची मानसिक तयारीच नव्हती का? 
आत पाऊल टाकल्यावर चहा घेईपर्यंत ती कशीबशी बसली. कधी एकदा मोसमच्या आजोबांची खोली नजरेखालून घालू असं झालं होतं. त्यांचा तो भला मोठा पलंग, उंच कपाट, टेबल, खुर्ची आणि तिथे मुलांसाठी ठेवलेल्या श्रीखंडाच्या गोळ्या. सारखं सारखं गोळ्या मागायला गेलं की "दम धर हां!" म्हणत केलेली त्यांची दटावणी... खूप काही आसपास रेंगाळत होतं. ती  त्या अंधार्‍या खोलीत जावून उभी राहिली. काहीच नव्हतं. रिकामा पलंग उदासवाणी कळा आल्यागत पडलेला. तिने बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला. काका आजोंबाची खोली, ती वापरात असावी. घरघंटीचं सामान पडलेलं होतं. पायर्‍या चढून ती माजघरात आली. टी. व्ही. होता. फ्रिजही. पण बाकी काळ्या लाकडाची कपाटं, बाजलं, पितळेची भांडी बरचसं तिच्या स्मृतीतलं. खांद्यावर हात पडला तशी ती दचकली.
"चल चक्कर मारुन येवू या." नील बाजूला उभा होता.
"अरे, थोडावेळ काका, काकूंशी बोलू तरी दे."
"रात्री मारा नं गप्पा तुम्ही. काळोख पडला की फिरायला नाही बाहेर पडता येणार."
"आधी पडवीत जावू. तुला मागचा भाग दाखवते."
"बघितलाय मी. पण चल, तू यायचीस तेव्हा कसं होतं ते सांग."
तिला त्याच्या समजुतदारपणाचं कौतुक वाटलं.
"तुला कसं वाटतय रे इथे?"
"कंटाळवाणं, पण ठीक आहे, दोन दिवस तर रहायचं आहे. काका, काकू, त्यांचा मुलगा, तो छोट्या कशी राहतात कोण जाणे."
"हे त्याचं घर आहे. आपल्या घरात कुणाचा कसाही वेळ जातो." नीलने पटल्यासारखी मान डोलावली.
तिने पाहिलेला गोठा रिकामा होता. पाय मोट कधीच बंद झाली होती. 
"आता पाण्याला येत नाहीत हो बायका पूर्वीसारख्या." काकू स्वयंपाकघराच्या दारातून सांगत होती.
"तेवढीच जाग असायची नाही? येता जाता सगळ्यांशी गप्पाही व्हायच्या."
"हो ना. आता तसाही वेळ आहे कुणाला. फारसं कुणी उरलेलही नाही आजूबाजूच्या वाडीत. सगळी बाहेर पडली पोटापाण्यासाठी."
तिने मान डोलावली. डाव्या हाताच्या खोपीत दुपारी मांडायचो तसा पत्त्यांचा डाव आत्ता मांडावा अशी तीव्र इछा झाली तिला. पण होतं कोण पत्ते खेळायला. नीलने काहीतरी विचारलं तशी ती भानावर आली. तो नेहमीप्रमाणे फोटो काढत होता.
"किती फोटो काढतोयस. काय करणार आहेस?"
"प्रोजेक्ट, माझ्या आईचं आजोळ."
"तुझ्या आजोळाचे काढ फोटो असेच."
"हो काढणार आहे, किंवा तूच काढ. मी वरच्या गच्चीत जातो तेव्हाचे, नाहीतर आजी, आजोबांबरोबर आपण बाहेर पायर्‍यांवर गप्पा मारत बसतो तेव्हा."
"आता आजोबा रे फक्त. तुला आवडतं का रे यायला तुझ्या आजोळी?"
"खरं सांगू?"
एकदा नको म्हणावं असं वाटून गेलं तिला. पण त्याचं मनही कळायला हवं होतं.
"सांग ना, अगदी खरच सांग. उगाच आपलं वरवर कशाला काही बोलायचं."
"नाही आवडत. म्हणजे काहीच करायला नसतं ना. तसं घरही एका बाजूला आहे आजोबांचं. माझ्या वयाचं पण नाही कुणी. पण मला आजी, आजोबा आवडतात. आजी मुद्दाम माझ्यासाठी म्हणून वेगवेगळे पदार्थ करते ते आवडतं. आजोबांबरोबर फिरायला जायला आवडतं आणि माझा जन्म झालाय तिथे म्हणून ते गावही आवडतं."
तो अजूनही आजी असल्यासारखाच बोलत होता. यावेळेस तिने त्याची चुक सुधारली नाही. 
"मग आवडतं की. नाही काय म्हणतोस?"
"तसं नाही गं, जितक्या उत्साहाने तुझे बेत चालू होतात इकडे यायचे तसं नाही वाटत. माझं घर, मित्र-मैत्रीणी सोडून जावंस वाटत नाही. पार सातासमुद्रापलिकडेच येतो ना आपण."
"सहाजिक आहे. आम्ही तुझ्याएवढे होतो तेव्हा आम्हालाही नाही आवडायचं. पण गणपती, मे महिन्याची सुट्टी आली की जावं लागणार हे ठरलेलच. नाही म्हणून ऐकतय कोण. तेव्हा सक्ती वाटायची, प्रचंड राग यायचा आई, बाबांचा. काय काय कारणं शोधायचो न जाण्यासाठी. एकदा गेलो की रमायचो तो भाग वेगळा.  आता कळतय त्या आठवणी मनात किती खोलवर रुजल्या आहेत, बंध  अतूट आहेत. आजी, आजोबाही आमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असायचे. आई, वडीलांचं ॠणच म्हणायला हवं. नाहीतर माझी चुलतभावंडं फारशी फिरकलीच नाहीत आजोळी. त्यांनी काय गमावलं ते कधीच नाही कळणार त्यांना."
"कदाचित मी तुझ्याएवढा होईन तेव्हा मलाही जाणवेल हे सारं."
"हो पण आता वाटतं कधीतरी आजी, आजोबांना सांगायला हवं होतं की आवडतं इथे यायला, मजा येते...असं काहीतरी."
"पण आई त्यात काही अर्थ असता का? तेव्हां जबरदस्ती गेलेली असायचीस नं तू. आणि तू तिथे जायचीस हेच त्यांच्या दृष्टीने खूप असणार. मला नाही वाटत त्यांनी तुला आवडतय की नाही याचा विचार केला असेल. वेगळं सांगायची गरजच नव्हती. आजी आजोबांना भेटायला तुम्ही येणार हेच गृहीत धरलेलं असणार. तू तुझ्या भावंडांपासून फार लांब रहातेस ना म्हणून फार विचार करतेस."
"असेल तसही असेल. पण तू अगदी मोठ्या माणसासारखा बोलायला लागला आहेस." तिने मान वर करुन त्याच्याकडे पाहिलं.
"अगं, अठरा वर्षांचा आहे मी. मोठाच की. चल, आता राहिलच आपलं देवळापर्यंत जाणं. मी टी.व्ही. बघतो. तू मार गप्पा काकूआजीबरोबर."
ती आत पायर्‍यांवर येवून बसली. मनात थोडीशी धास्ती होती. जमिनीचे प्रश्न, वाद, उत्पन्नाची अपुरी साधनं, घराची दुरुस्ती बरच काही कानावर आलं होतं. त्या प्रश्नांमध्ये तिला पडायचं नव्हतं. जमेल तशी मदत करायची तयारी होती पण आपल्या कृतीने नको ते प्रश्न उद्भवू नयेत. काकूने चहाचा कप हातात देत म्हटलं.
"बरं झालं गं आलीस. येत जा. मला होईल तेवढं करेन. तुझी आई म्हणजे आधार होती गं आमचा. आमचा आधारच गेला."
ती आज म्हणूनच आली होती. आई जायच्या अगोदर तिच्याबरोबर केलेले बेत पूर्ण करायचे होते. त्यात सर्वांनी या घरी यायचा बेत होता. मोसमचे आजी, आजोबा नाहीत म्हणून यायचं टाळत गेलेली ती आईबरोबर केलेला बेत पार पाडायचा म्हणून आली होती. आई नाही पण मुलगा आणि लेक होती संगतीला. तिचे डोळे भरुन आले. चहाच्या कपात नजर गुंतवत तिने त्या घोटाबरोबर तेही पिऊन टाकले.
"तुझ्याकडची चॉकलेट्स यायची हो इकडे." काकू पदराने डोळे पुसत सांगत होती.
"हो तुझ्याबद्दल, या घराबद्दल फार प्रेम आईला. फार केलं तिने या घरासाठी. आम्ही हसायचो तिला, कधी काही वाद झाला घरात की म्हणायची मोसमलाच जाते आता. चिडवायचो आम्ही तिला बाकीच्या बायका माहेरी जाते म्हणतात आणि तू सासरी म्हणून. मला म्हणत होती घराच्या दुरुस्तीसाठी मदत करता येते का बघा."
काकू क्षणभर गप्प झाली.
"तुमची मदत कशी घ्यायची? दुस‍र्‍या घरी गेलेल्या मुली तुम्ही. आणि आभाळच फाटल्यासारखं झालय. ठिगळं तरी कुठे कुठे लावणार." 
"दुसर्‍या घरी गेलेलो असलो तरी हे घरही आमचं आहेच ना. करु जमेल तसं."
"आमची पोरं पण नाही म्हणतात इथे रहायला आता. बाह्यसुधारणा झाल्या आहेत. पाहिलस ना पार घरापर्यंत रस्ता होतोय. पण उदरनिर्वाहाच्या साधनाचं काय? ती नकोत का वाढायला? सगळं पूर्वीसारखच आहे, किंवा परिस्थिती अधिक वाईट म्हणेनास. आम्ही दोघं गेल्यावर काय होणार या घराचं हा प्रश्न आहे मोठा. वाळवी लागली आहे जिकडे तिकडे, परसात पाहिलस ना कसं तण वाढलंय. पोरं लक्ष घालत नाहीत, आम्हाला होत नाही, गडी माणसं मिळत नाहीत अशी त‍र्हा आहे."
"सगळी होती तेव्हा घर कसं भरल्यासारखं होतं नाही?" 
"खरं आहे तुझं. आता राहतो आम्ही भुतासारखी चार माणसं या भल्यामोठ्या घरात. पण माझा वेळ जातो गं कसाही. नातवंडात जीव रमतो आणि नाही म्हटलं तरी असतातच घरातली कामं."
कितीतरी वेळ त्या दोघी मग गेलेल्या माणसांच्या आठवणी जागवत राहिल्या. तिची आई तर नुकतीच गेली होती. तिच्याबद्दल बोलताना दोघी गहिवरत होत्या. एकाचवेळी तिच्याबद्दल खूप बोलावसं वाटत होतं आणि काहीच बोलू नये असही. बाहेरचा काळोख हळूहळू मनातही झिरपायला लागला. अचानक तिने बोलणं आटोपतं घेतलं. न बोलता ती माजघरात जाऊन पडून राहिली. डोळ्यावर हात ठेवून छताकडे नजर लावून इतराचं तिथलं अस्तित्वच नाकारलं तिने.
सकाळी जाग आली तेव्हा तिने एकदम परत जायचंच ठरवलं. 
"अगं असं काय झालं एकदम? मी काही बोलले का चुकून माकून? दुखावलं का मी तुला? काल अचानक उठून गेलीस. नंतर डोकावले मी तीन चार वेळा माजघरात, पण डोळा लागला होता बहुधा तुझा." काकूला ती जागीच होती हे पक्कं ठाऊक होतं पण तिने त्याचा उल्लेख केला नाही. काकू नाना त‍‍र्‍हेने तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला  घुसमटल्यासारखं वाटत होतं. सारं सोडून पळून जावंसं वाटत होतं. नको हे घर, नकोत ते बंध. त्रास होतो. सगळं काही  आपण फार पूर्वी इथून गेलो तसं असावं असं वाटतं. गेलेले दिवस परत आणावेसे वाटतात, रक्ताच्या नात्यातली माणसं पुन्हा परतावीत, रिकामं झालेलं घर गजबजून जावं, आधी होतं तसं. काळाची पावलं पुढे पडूच नयेत.  हे वाटणं जितकं खरं तितकच यातलं काहीही शक्य नाही, तिच्या हातात नाही हे का कळत नव्हतं तिला? रात्रभर डोळ्यावर हात ठेवून ती पडून राहिली, मुकपणे अश्रु जिरवत राहिली, त्यावेळेस मनात आलेले हे विचार, इच्छा किती पोकळ आहेत हे दिवसाच्या सुर्यप्रकाशात तिला प्रखरतेने जाणवलं आणि मग सा‍‍र्‍यापासून पळ काढावा हेच तिच्या मनाने घेतलं. तिच्यादृष्टीने सोप्यातला सोपा मार्ग होता हा. नीलला निदान देवळात जाऊन यायचं होतं. खूप मस्त वाटतं तिथे असं म्हणत होता. इराही रमली होती. पण ती त्यांच्या हट्टापुढेही नमली नाही. हिरमुसल्या मनानी काका, काकूंनी निरोप दिला. परत ये म्हणून हजारदा सांगितलं.
वहाळ ओलांडला आणि ती टेकडीचा चढ चढायला लागली. इराला आईच्या मन:स्थितीची फारशी कल्पना आली नाही. ती गप्प गप्प आहे म्हटल्यावर आपण तिला त्रास द्यायचा नाही एवढच तिला माहित होतं. पायवाटेवर दोन्ही बाजूला उगवलेली रानफुलं गोळा करत रमत गमत इरा चढाव चढत होती. गाडीच्या ड्रायव्हरला नीलनेच थोड्यावेळाने वर यायला सांगितलं आणि तो आईच्या बाजूने मुकाट चालत राहिला.  टेकडीवर पोचल्यावर ती खाली पहात राहिली. तिचं घर खूप लांब राहिलं होतं. दृष्टीपलिकडे. 
"मोसमची आजी नाही म्हणून या घरी यावसं वाटत नव्हतं, आता आई नाही म्हणून माझ्याच घरी जावसं वाटणार नाही असं तर होणार नाही ना रे?" ती टेकडीवरच्या दगडावर बसली. हमसून हमसून रडायला लागली.
आईची समजूत कशी घालावी तेच नीलला कळत नव्हतं. त्यालाही आजोळची ओढ वाटते अगदी तिच्याइतकीच हे सांगावं असं त्याला वाटलं. ऐकून मन शांत होईल तिचं.  
"आजोबा आहेत की. आणि मग आमचं काय? तू नाही गेलीस तर आमच्या आजोळच्या आठवणीचं काय? तू नेहमी म्हणतेस ना आम्हाला जशी ओढ आहे आजोळची तशी तुम्हाला वाटणार की नाही कुणास ठाऊक. तसं नाही होणार, तुझ्या आठवणीचे संदर्भ वेगळे असतील, आमच्या आठवणी वेगळ्या, माणसं वेगळी, जागा निराळी पण भावना त्याच." तिच्या खांद्याभोवती हात टाकून तो बसून राहिला. इराही तोपर्यंत वर पोचली. तिनेही आईच्या खांद्याभोवती हात वेढले.
"खरं आहे तुझं. आज काका, काकूंना दुखावलं मी. ठरल्याप्रमाणे रहायला हवं होतं. असं अचानक निघून नको होतं यायला. पळ काढला मी परिस्थितीपासून, मनाला आलेल्या असहाय्यपणाच्या जाणीवेतून, हतबलतेच्या भावनेने. चुकलच ते. काय काय दुरुस्ती आहे घराची आणि आपल्याला काय मदत करता येईल त्याचाही अंदाज घ्यायला हवा पुढच्यावेळेस. आता पुन्हा येवू तेव्हा राहू या निवांत..." विचार आणि भावनांचा निचरा होईपर्यंत ती बोलत राहिली. दोघा मुलांना कितपत समजत होतं कुणास ठाऊक, पण दोघंही शांत होती. त्यांचा तो आश्वासक स्पर्श तिला सुखावत होता, नवी उर्मी रुजवू पहात होता. लांबवर सुमोचा पांढरा ठिपका दिसायला लागला तसं नीलने पुढे केलेल्या रुमालाने तिने डोळे पुसले. तो उठून उभा राहिला. त्याच्या हातात हात रोवत तीही उठली. गाडीत चढताना पहिल्याच पायरीशी ती अडखळली. तोल सावरत तिने थकल्या मनाला नव्या उमेदीने, उत्साहाने पुढच्या वाटेवर पाऊल टाकायला बजावलं.  सुमोने वेग घेतला तशी तिच्या मनाने आजोळच्या घरुन स्वत:च्या घरी उडी मारली. आई नसली तरी  वाट बघणारे दोन डोळे होते. तिने उत्साहाने नीलला म्हटलं,
"लवकर पोचायला हवं आपण, थोडसं आश्चर्य वाटेल आजोबांना एक दिवस लवकर परतलो म्हणून. पण खुष होतील नाही?" नील आणि इराने मान डोलावली आणि सारं काही लक्षात आल्यागत ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढविला.