मन

रे, किती वेळा सांगितलं तुला, ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींचा विचार नको करत जाऊ. सगळं कळत असून पण न कळल्यासारखं का वागतोस तू?
दुसऱ्याकडे असलेल्या एखाद्या वस्तूचं का आकर्षण वाटतंय तुला? नक्की 'आकर्षण; चं आहे ना? की ती वस्तू त्याच्याकडे आहे आणि तुझ्याकडे नाही ह्या गोष्टीची जळजळ होतीये तुला?
त्यांचे बाप बसलेत रे त्यांच्या पाठीशी. आहे त्यांची परिस्थिती तितकी. पण तुझी परिस्थिती आहे का त्यांच्यासारखी? 
नाही ना? मग कशाला हवाय इतका हव्यास? कशाला इतकं आकर्षण? कशाला जळजळ होतीये? 
तुला माहितीये, आज ना उद्या हे सगळं असणार आहेच की तुझ्याकडे. आणि समज नाही एखादी गोष्ट मिळाली, तर असा किती फरक पडणार आहे रे?
फक्त 'भौतिक अस्तित्वाशिवाय' काय आहे त्या वस्तूमध्ये? त्या वस्तूशिवाय जगलासच की इतकी वर्ष. तसाच पुढेही जगशीलच की.
बघ, विचार कर.
पैसा पैसा किती करशील रे? काय जग विकत घ्यायचंय की काय तुला? पूर्वीचे दिवस आठव. असा किती पैसा होता तुझ्याकडे?
पण तेव्हा मात्र पूर्ण समाधानी होतास की रे तू. आज पूर्वीपेक्षा बऱ्याच जास्ती प्रमाणात पैसा खेळतोय तुझ्या हातात. ज्याची तू फक्त स्वप्न च पहिली होतीस. 
मग आज ते समाधान कुठंय? तुझे हट्ट का संपत नाहीयेत? अजून किती आणि काय काय हवं तुला?
बघ, विचार कर.
म्हणे जग बदलायचंय. सगळ्यांना संघठीत करायचंय. अरे पामरा, जरा स्वतः:कडे बघ आधी. स्वतः:ला बदल आधी. 
काय करतोयस तू "जग बदलायला"? त्या गोष्टीचा फक्त विचार करतोस आणि पुढे काहीच नाही. स्वतः:च्या कामाच्या व्यापात कधी रमून जातोस हे तरी कळतं का तुला?. 
तुला वाटतंय का की असंच वागत राहून जग बदलेल? अरे तुझ्यासारखंच हे जग पण आपल्या आपल्या कामात रमून जातं आणि तुला विसरून जातं.
इथल्या लोकांची मानसिकता काय आहे? त्यांना एकत्र यायची इच्छा आहे का रे?
हे सगळं बदलायला किती वेळ लागेल ह्याची काही कल्पना आहे का तुला? तयार आहेस का इतका वेळ द्यायला? समाजासाठी स्वतः:च्या आयुष्यामध्ये 'कॉम्प्रमाईज' करायला तयार आहेस?
बघ. विचार कर.
तुला चांगलं माहितीये, तुझ्या नशिबात 'ती' नाहीये. मग का तिच्या मागे लागतोस मित्रा? कशाला इतके कष्ट, वेळ आणि पैसा घालवतोयस तिच्यासाठी?
तुला 'ती' मिळेल याची शक्यता नाकारत नाहीये मी. पण बरेच जोर मारायला लागतील. खूप त्रास सहन करावा लागेल.
मला माहितीये की तुझं तिच्याबद्दल चं प्रेम हा सगळा त्रास अगदी सहजपणे सहन करेल. पण मग तिच्यासाठी तुझी ध्येयं, अस्मिता, जबाबदाऱ्या; ह्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर? 
आणि तुलापण माहितीये की 'दुर्लक्ष' हे होणारच आहे. तरीपण असं का वागतोस?
बघ. विचार कर.
प्रसिद्धी प्रसिद्धी प्रसिद्धी !!! कशाला इतकं 'फेमस' व्हायचंय तुला ? त्यानं तू काय साध्य करणार आहेस? असं तू कोणाला 'इम्प्रेस' करणार आहेस? काय फायदा होणार आहे तुला?
गर्दी च्या बाहेर राहणं ही चांगली गोष्ट आहे. पण मग फक्त डोकं वर काढून परत आत का घालातोयस? कोणी एखादा तरी नीट बघतोय का तुला?
अनेक चांगली कामं करतोस खरं, पण ठराविक अंतरानं अर्धवट कशाला सोडून देतोस?
जर एखादी चांगली गोष्ट करावीशी वाटतीये तर मग त्याच्यात पूर्ण विलीन होऊन कर ना ! त्याचा तुला आणि समाजाला नक्कीच फायदा होईल. 
दुसऱ्यांना मदत करणे ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण ज्याला तू मदत करतोयस त्याला जाणीव आहे का रे? तो कृतज्ञ आहे की कृतघ्न आहे?
अनेक जणांनी कितीवेळा फायदा घेतलाय तुझ्या असल्या स्वभावाचा. किती वेळा फसलायस दोस्ता. अजून किती दिवस असाच वागणार आहेस तू? अजून माणूस ओळखता येत नाही का तुला?
अजून काय आणि किती सांगू तुला? दर वेळेस तुला जे वाटेल तेच व्हायला पाहिजे असं वाटतंय का तुला? फक्त एकच सांगतो.
थोडा विचार कर..