कोणासाठी, का आणि कसं लिहावं?

कोणासाठी, का आणि कसं लिहावं?

कोणासाठी लिहावं या प्रश्नाला माझ्याकडे एकच उत्तर आहे. कोणासाठी लिहावं
तर स्वतः:साठी लिहावं. प्रत्येका जिवंत हृदयात गोष्टी असतात, गाणी असतात
आणि कविताही असतात. प्रत्येका मनाकडे सांगण्यासारखं काहीतरी असतं आणि
प्रत्येका मनाला दुसऱ्यांच्या मनाचं ऐकावंसं वाटत असतं. पण मलातरी रोज,
नियमितपणे काही लिहिता येत नाही. पण लिहावंसं वाटलं आणि लिहिण्यासारखं काही
असलं तर ते लिहिल्याशिवाय झोपही लागत नाही. लिहून झालं की ते कोणालातरी
दाखवावंसं वाटतं. कदाचित प्रत्येका बरोबर असं होत असावं. खरं सांगायचं तर
कागदावर विचार किंवा भावना व्यक्त करायला जबरदस्ती चालत नाही. म्हणूनच
मनात येईल तेव्हा स्वतः:च्या समाधानासाठी आणि आनंदासाठी लिहावं.

का लिहावं या प्रश्नावर येऊन मी बरेच वेळा अडकतो. असं वाटतं की आपण का
लिहावं. आपल्याकडे सांगण्यासारखं असं काय आहे जे लोकांना आधीच माहीत नाही
आणि जर काही वेगळं नसेल तर उगीच लिहून वाचणाऱ्यांचा वेळ का घालवायचा. पण
मग वाटतं की कुणी वाचलं नाही तरी आपल्याला लिहावंसं वाटलं म्हणून लिहावं.
वर लिहिलंय मी की प्रत्येका हृदयाला काहीतरी सांगावंसं वाटत असतं आणि ऐकावंसं
पण वाटत असतं. म्हणून पाडगावकर म्हणतात तसं आपलं गाणं आपणच गावं, लिहावं.
काही वेळा तुम्ही लिहिलेलं वाचून दुसऱ्यांना आशा मिळते, प्रेरणा मिळते
किंवा नवे विचार मिळतात. लिखाणातून लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्यामध्ये एक अबोल
संवाद सुरू होतो. आपल्याला काहीतरी लिहावंसं वाटतंय म्हणजे ते आपल्यासाठी
महत्त्वाचं आहे, एवढ्या कारणासाठी तरी लिहावं.

काही लोक म्हणतात की 'आम्ही कधीच लिहिलं नाही, आम्ही अचानक कसं लिहिणार? '
पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी शिक्षकांच्या भितीने शाळेत काहीतरी
लिहिलं आहे. म्हणून काहीच लिहिलं नाही म्हणण्यापेक्षा काहीच मनासारखं
लिहिलं नाही हे सांगणं जास्त योग्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लिहिणं हे
क्रिकेट सारखं आहे. तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करत असाल किंवा भरपूर सामने
खेळला असाल तरी परत बॅटिंगला जाताना तुमच्या धावा शून्यच असतात. सचिन
तेंडुलकर पण दर सामन्यात शून्यातूनच सुरुवात करतो. तसंच लेखक जुना असो
किंवा नवा, नवं लेखन कोऱ्या कागदावरच सुरू होतं. म्हणून कसं लिहावं याला
एक सोपं उत्तर आहे. कॉफी जशी तयार होते तसं लिहावं. थोडीशी कॉफी उकळत्या
पाण्यात टाकली, मग नीट मिसळली की मस्त कॉफी होते. त्यात साखर आणि दूध
घालून त्याची चव वाढवता येते. तसंच एखाद्या लहानशा विषयावर नीट सगळ्या
बाजूने विचार केला, म्हणजे विचार नीट मिसळतात आणि लिहिलेल्या शब्दांना चव
येते. मग ही चव चांगलं लिहून आणि लिखाणातून काहीतरी संदेश देऊन वाढवता
येते. म्हणूनच संपूर्ण विचार करून होईपर्यंत लिहू नये, आणि विचार केल्यावर
लिहायचं थांबू नये.

-- मयुरेश कुलकर्णी