ऑगस्ट २०११

अनामिक भटकंती २ - सांदण दरी.

अनामिक भटकंती
सांदण दरी.. वसुंधरेची खोल हाक

सांदण दरी... वसुंधरेच्या गर्भातील एक नितळ आनंद देणारी वाट.. पावलागणिक वसुंधराच आपल्याशी काही गूज सांगू पाहत आहे असेच वाटत राहते. वाटेत लागणाऱ्या रतनवाडी- अमृतेश्वराच्या मंदिरापासून फक्त ७ किमी पुढे सांम्रद या आदिवासी वस्तिवजा गावाशेजारी निसर्गाच्या कुशीत दडलेली ही वसुंधरेची गोड हाक.

वाटेतील अमृतेश्वराच्या स्पर्शाने पवित्र झालेले प्रवराचे बॅक वॉटर आणि अलंग-मदन-कुलंग आणि कळसुअबाई या सह्याद्रीच्या रौद्र रांगेचे रुप मोहीनी घालतेच..  

अमृतेश्वराचे मंदिर ( रतनगड वृत्तांत मध्ये सविस्तर माहिती देइनच)

प्रवराचे बॅक वॉटर आणि अलंग-मदन-कुलंग.

हृषिकेश

पुढे झाडाच्या आडोशाला मस्त गाड्या पार्क करून आम्ही गावाच्या जवळून चालू लागलो. कौलारू घरे आणि निरागस माणसे मनाला एकदम भिडत होती. मन नकळत काळाला छेद देऊन आपल्याच गावाच्या.. गावातल्या माणसांच्या पाऊलखुणा येथे शोधत होते. त्याच बरोबर मागे दिसणारा रतनगड आणि त्याचा खुंटा जो की मागच्याच आठवड्यात दिलेली भेट.. आठवणी सांगू पाहत होता.

रतनगड

पठाराच्या पुढून झाडांच्या गर्तेतून आम्ही एका घळी शेजारी आलो. हो हेच सांदन दरीचे मुख होते. तेथून पुढे आम्ही जमिनीच्या पातळी खाली प्रवास करणार होतो.. प्रथमतःच जमिनीच्या खोल घळीत उतरतानाचा आनंद गगनात मावत नव्हता. घळीच्या सुरुवातीलाच एक जिवंत झरा आहे. थंड निर्मळ पाणी पिवून आम्ही सुरुवातीचा कातळटप्पा पार करून पुढे दरीत प्रवेश केला.

थंडगार आल्हाद कातळांमधून चालताना खुपच प्रसन्न वाटते.   कोठे कोठे दरी १०-१५ फुट रुंद आणि तितक्याच मोठ्या दगडांनी भरलेली तर कधी कधी फक्त २-३ फुट रुंद होत गेलेली.   काही ठिकाणी तर सूर्यप्रकाश ही पोहचत नव्हता.

थोडेसे असेच पुढे गेलो की २ पाणीसाठे आपला मार्ग आडवून टाकतात. पावसाळा  आणि हिवाळ्यात या पाणीसाठ्यांपलिकडे जाणे अवघडच.   उन्हाळ्यामुळे बरेचसे पाणी कमी झालेले होते.   तरीही बर्फापेक्षाही सुखद थंड असा त्यांचा स्पर्श आपल्याला आपुलकीने पुढे बोलवत होता.   साधरणता ६ फुट खोल आणि १५-२० फुट लांब पसरलेला पहिला पाणीसाठा आम्ही एकमेकांच्या मदतीने पार केला. नितळ थंड आणि तळाचे खडक ही स्पष्ट दिसणारे पाणी म्हंटल्यावर मी १०-१५ मिनिटात मस्त डुंबून घेतले.   वसुंधरेच्या काळजाचा हा प्रेमाचा ओलावा खुपच प्रसन्न करत होता.   एकमेकांच्या सानिध्याने आमी पुढे निघालो..   उंच उंच कातळ आणि वळणवळणाची वाट.

थंड गार कातळातून पुढे चालताना कधी आम्ही पलीकडे टोकापाशी आलो कळलेच नाही, येथून पुढे समोरचा कोकणकडा प्रेक्षणीय दिसत होता. दरीच्या समोर ३५०० -४००० फुट सरळ तुटलेले कडे अतिशय आदबशीर वाटत होते. या अवघड वाटेने पुढे करोली घाटात जाता येते. परंतु अशी अवघड वाट मनात साठवून आम्ही मागे फिरलो.. मागे येताना ही जाताना जो अनुभव घेतला तोच पुन्हा पुन्हा घेतला. सरळ १५-२० फुट असणाऱ्या दगडावर पुढून चढणे म्हणजे खरेच खुप मस्त होते. गिर्यारोहन कधी केले नाही.. पण हा छोटासा अनुभव खुप छान वाटत होता. पुन्हा पाण्याच्या साठ्यात मनसोक्त दुंबून घेतले..

  माघारी आल्यानंतर नितळ झऱ्याशेजारी मस्त इडल्या खाउन आम्ही पुन्हा वरून जमीनीवरून दरीच्या कडेने चालू लागलो. आपण नक्की किती खोलवरून चालत होतो आणि वरील जमीनीच्या अनुभवाची एक उत्कंठा मनात होतीच. पुन्हा वरील नटलेले सौंदर्य मनात घर करून जात होतेच. वरून काढलेले दरीचे फोटो तर मनात धस्स करून जात होते.  

मागे फिरून पुन्हा जागेवर येताना नेहमीप्रमाणे आम्ही चुकलो आनी सुमारे २-३ किलोमिटर लांब प्रवराच्या बॅक वॉटर जवळ बाहेर आलो. आणि पुन्हा ते सर्व दृष्य चालत मनात साठवत आम्ही गाड्यांजवळ आलो. पुन्हा येथे येण्याचे मनोमन ठरवून आम्ही मार्गस्थ झालो.

  - शब्दमेघ _एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन

(नोट : फोटो कुठलेही एडिटींग न करता दिलेले आहेत, हौशी फोटोग्राफर )

Post to Feedगणेश, सुरेख वर्णन आणि फोटो!
चित्रांची पुनर्मांडणी आणि सरकचित्रदर्शन
सुंदर
शब्दमेघा..

Typing help hide