हा तर सवयीचा भाग!

माणसाच्या स्वभावाबद्दल बोलायचं झाल्यास, तो कधीही बदलत नाही हे नक्की. पण सवयीचं काय? सतत नवीन गोष्टीची  सवय  आपल्याला  होत  असते तसंच,   जुन्या  सवयी  मोडतही  असतात.   मनुष्य  हा  आजूबाजूचा  परिस्थितीची स्वतःला  सवय करून घेऊनच जगत असतो, म्हणजेच तो प्रत्येक वेळेस एका नवीन सवयीची सवय करून घेतो आणि जुन्या सवयीची सवय सोडून देतो. बापरे! फार कठिण झालंना हे वाक्य, पण सवयीबद्दलचं त्रिकालाबाधित सत्य हेच, असं मला वाटतं. कधी कोणाच्या सवयी आपल्याला अचंबित करणाऱ्या असतात तर कधी त्या आपल्या सवयीसारख्याच असतात. ह्या सवयींचं वर्गीकरण आपण चांगली आणि वाईट ह्यात करतो. प्रश्न असा आहे की एखादी गोष्ट चांगली की वाईट हे ठरवणं खरंच गरजेचं आहे का?

आताच मुंबईमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचंच घ्या ना! हल्ला झाला, मुंबई हादरली, मीडिया ह्याच गोष्टी मागे लागला. सगळीकडे अगदी हलकल्लोळ माजला. पण हे सगळं चाललं फक्त काही दिवसांपुरतं, पुढे काय? सततच्या होणाऱ्या ह्या हल्ल्यांची सवय झालेली असल्यामुळे, डोक्यावर टांगती तलवार असूनही सगळे मुंबईकर दुसऱ्या दिवशी कामावर हजर होते. काय करणार शेवटी पोटापाण्याचा प्रश्न प्रत्येकासमोर ठाण मांडून बसला आहे. हे सगळं जरी बरोबर असलं तरीही अश्या प्रकारची सवय हि योग्य की अयोग्य? ह्या सवयीचं वर्गीकरण करता येणं कठिण आहे, कारण ह्या अश्या सवयीची कारणंही फार वेगळी असतात.

वरती सांगितल्याप्रमाणेच अशीच अजून एक सवय आपणां भारतीयांना झाली आहे आणि ती म्हणजे सध्या होणाऱ्या घोटाळ्यांची. कोणतंही वर्तमान पत्र घ्या की अगर बातम्यांचा चॅनल लावा, सतत काही ना काहीतरी स्कॅम झालेलाच असतो. आतातर एकूण किती पैसा ह्यात गेला हे मोजणंही कठिण झालं आहे. अतिपरिचयात अवज्ञा ती हिच. एखादी सवय आणि तिचं गांभीर्य ह्या दोन गोष्टींचा मेळ जमणं सध्या कठिण.

ह्या आणि अश्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यांचं वर्गीकरण करता येत नाही. मग त्या गोष्टी "हा  तर सवयीचा भाग" असं म्हणून  सोडून  द्यायच्यात का? सवय हा शब्द म्हटल्यावर ती गोष्ट गृहीत धरण्यात येते. तात्पर्य काय तर सवय असणं हे वाईट नाही पण त्या सवयीची सवय असणं हे वाईट. बघूयात, विचार करूयात आणि ठरवूयात की कसली सवय करावी आणि कसली करू नये. कठिण आहे पण अगदीच अशक्य आहे असं नाही. हळूहळू ह्याचीही होईलच की "सवय"!