प्यार से पुकार लो जहाँ हो तुम.... एक आठवण !

याद किया दिल ने कहाँ हो तूम.... प्यार से पुकार लो जहाँ हो तुम....

विविधभारती वर  'बेला के फुल' मध्ये हि अशी गाणी लागतात आणि मग आमची परीक्षेच्या वेळी नेहमी गच खाणारी 'स्मरणशक्ती' नामक विद्या अचानकच जागृत होते... क्षणाचा  शेकड्यातला भाग आणि घटनांचा कण् न कण सुद्धा आठवतो.. अगदी जसा च्या तसा...!

"राहुल, ही घे तुझी नोटबुक... झाल्या माझ्या नोटस कॉपी करून.... " नेहा म्हणाली. गेले २ आठवडे नेहा कॉलेजला गेली नव्हती,  आठवडाभर ताप काढून झाल्यावर तिने विश्रांती घेणेच पसंत केले... मास्टर डिग्री संपायच्या आत तिच्या वडिलांच्याच ऑफिसमधून अमेरिकेतली जॉब ऑफर आलेली होती, परंतु लास्ट सेमीस्टर चा क्लास टिकवणे महत्त्वाचे होते, राहुल आणि नेहा ह्यांची ओळखसुद्धा इंटरव्ह्यू मध्येच झाली होती.

"नेहा, ही तर माझी नोटबुक नाहीये... म्हणजे... ", राहुल गडबडला एवढी स्वच्छ आणि नीटनेटकी वही त्याची फक्त मिनिकेजी मध्ये असताना होती कारण तेव्हा सगळं आई लिहायची...   नेहा म्हणाली, "अरे मीच लिहून काढली डबल, एकतर तुझी ती रफ वही, वर्षभर सगळ्या लेक्चर्स ची खिचडी त्यात आणि जे महत्त्वाचे तेच असे कुठेतरी वर, मागे, लहान अक्षरात लिहिलेले... म्हटलं माझी रिव्हिजन होईल आणि तुला सुद्धा सुंदर नोटस कश्या असतात पाहायला मिळेल... "

आता मात्र राहुल उसळून म्हणाला... "ए प्लीज बरं का... माझ्या नोटस कळतात मला....  इंटर्व्यू च्या दिवशी तुलाच तुझं काही बेस्ट आन्सर्स वगैरे सापडत नव्हतं...   शेवटी माझीच मदत घेतलीस ना तिथे? " - हा राहुल चा रामबाण होता... किमान नेहाच्या बाबतीत तरी तो प्रत्येक वेळी बुल्स आय म्हणतात तसा वर्मी बसायचा!

" ते ठीक आहे.. त्याचं एवढं काय... कोणाला मदत केली तर एवढं कशाला बोलून दाखवायचं लगेच?... त्याची भरपाई केलीये गेल्या वर्षभरात तुझ्या सगळ्या असाइन्मेन्ट्स  सोडवून कळलं ना... त्यामुळे तो विषय प्लीज सोड!! "

वर्षभरात अनेकदा नेहा आणि राहुल एकमेकांसोबत असे भांडत होते,  पण सहवास हा भांडणाचा असो किंवा प्रेमाचा... एकदा सवय झाली की मोडणे कठीण... एकमेकांची सवय एवढी लागून गेली होती की मास्टर डिग्री घेऊन मग बॅचलर डिग्री घालवण्याचा विचार किंवा तत्सम गप्पाटप्पा देखील त्यांनी सोबतच केल्या होता...

राहुल म्हणाला - "आपण एकमेकांना किती फिट आहोत हे तर माहीत नाही पण, निदान एकमेकांना राग कशामुळे येतो किंवा भांडणाचे कारण काय असते हे तर आपल्याला नक्की समजते ना... तेवढे सांभाळले की झाले  ". पण नेहाचा विचार जरासा वेगळा होता "भांडण ह्या दुव्याने एकत्र आलो तर त्रास वाढेल आणि प्रेम म्हणावे तर तसे प्रेम नाही पण सहवासाची सवय झाली आहे.. त्यामुळे अजून वेळ द्यायला हवाय... "

शेवटच्या सेमिस्टरच्या रिझल्ट लागण्याआधी कॉलेजची ट्रीप ठरली, सगळी गँग महाबळेश्वर ला गेली, कँप-फायर, गप्पा गोष्टींत लक्ष लागत नव्हतं... शेकोटीजवळच्या एका मोठ्या दगडावर राहुल आणि नेहा हातात हात घेऊन बसले होते...

राहुल  तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, "इटस ओके डिअर... तू खूप छान आहेस, आणि तुझे आई-बाबा अमेरिकेत जायचा निर्णय घेत आहेत तो सुद्धा तुझ्या करीअर आणि पुढिल आयुश्यासाठी चांगलाच आहे... अगं खूपं इंडियन्स आहेत तिकडे... तुला खूप शुभेच्छा... चल आता प्लीज स्माईल....! आणि इटस ओके.. आपण जे ठरवलं जसं ठरवलं तसंच तर आहे सगळं.... वी आर ऑलवेज गुड बडीज.... "

पाणावलेल्या डोळ्याने नेहा म्हणाली " राहुल, समहाऊ थिंग्स आर नॉट वर्किंग रे... खुप कंफ्युज स्टेट ऑफ माईंड मध्ये आहे.....आपण खूप चांगले मित्र आहोत, पण मला त्यामध्ये प्रेमाच्या भावनेला १००% न्याय देता येत नाहीये.....  आय लाइक यू अ लॉट... आय लव्ह यू ऍज अ व्हेरी गुड फ्रेंड... पण त्यापलीकडचा विचार जमत नाहीये, किंवा रुचत नाहीये.... आणि त्याहिपेक्षा जास्त महत्त्वाचे -माझा मित्र म्हणून मला तुला गमवायचं नाहीये.... "

राहुल म्हणाला "अगं वेडे मी कायम तुझ्यासोबत आहेच की... ईमेल आहे... चॅट आहे... स्काइप... आणि त्याहीपलीकडे जाऊन  टेलीपथी तर आहेच ना...... "  बस्स... प्यार सें पुकार लो जहाँ हो तुम.... "

सगळ्या सिक्वेन्स चा फ्लॅशबॅक डोळ्यासमोरून सरकला, आणि राहुल चटकन उठला,

रेडिओ बंद करून त्याने हेडसेट कानात घातला, आणि नेहाचा +१ चा लाँग डिस्टन्स नंबर ला कॉल लावून... "खो रहे हो आज किस खयाल में.....म्हणत  रेंज व्यवस्थित मिळावी म्हणून गॅलरीत पळाला.......!

--

आशुतोष दीक्षित.