दोन जुळ्या गाण्यांच्या जोड्या

मराठी गाण्यांबद्दलची माझी माहिती हिंदीइतकी जास्त नाही. तरीही गाण्यांच्या दोन जोड्यांनी लक्ष वेधून घेतले. पहिली जोडी गाणे  "खेड्यामधले घर कौलारू" गाण्यांची.  एक आहे आशा भोसले यांनी गायलेले "आठवणीच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू" हे "ऊनपाऊस" चित्रपटामधले असून गदिमांनी लिहिलेले  व सुधीर फडक्यांनी स्वरबद्ध केले आहे. दुसरे गाणे " आज अचानक एकाएकी मानस लागे तिथे विहरू, खेड्यामधले घर कौलारू" असे आहे, गायिका मालती पांडे, गीतकार अनिल भारती. गदिमांचे गाणे इथे (डाव्या बाजूच्या उभ्या ओळीत वरून आठवे, बाजूच्या चौकोनात टिचकी मारून खाली प्ले वर टिचकी मारायची) ऐकता येते तर मालती पांड्यांचे गाणे इथे ऐकता येईल.

अशीच गोष्ट दुसऱ्या एका जोडीची . "या कातर वेळी पाहिजेस तू जवळी" अशीच सुरुवात असणारी दोन गाणी आहेत. एक गायले आहे मालती पांड्यांनी. गीतकार अनिल भारती. ते इथे (वरून पाचवे गाणे, अगदी उजवीकडच्या चौकोनात टिचकी मारून प्ले बटनावर टिचकी मारायची). दुसरे गाणे आशा भोसले यांनी गायले आहे, गीतकार गदिमा आणि संगीतकार सुधीर फडके. ते इथे ऐकता येईल (उजव्या बाजूच्या उभ्या ओळीत वरून सहावे, बाजूच्या चौकोनात टिचकी मारून खाली प्ले वर टिचकी मारायची)

मला  असा प्रश्न पडला आहे की या दोन जोड्यांमधली आधीची गाणी कुठली आणि नंतरची कुठली? नक्की कल्पना नाही पण उगीच असे वाटते की मालती पांड्यांची गाणी आधीची असावीत. असे असेल तर गदिमांसारख्या सिद्धहस्त कवीला आणि सुधीर फडक्यांसारख्या संगीतकाराला आधीच्या गाण्यांवरून पुन्हा तशीच गाणी का बेतावी लागली? अर्थात चारही गाण्यांचे संगीतकार सुधीर फडके असण्याची शक्यता आहेच. तरीही त्यांना अगदी सारखी गाणी परत का करावीशी वाटली?

दुसरा प्रश्न म्हणजे हे कवी अनिल भारती कोण?

हिंदीमध्ये अश्या जुळ्या गाण्यांच्या बऱ्याच जोड्या आहेत, त्याबद्दल पुन्हा कधी.

विनायक

जाता जाता - मालती पांडे यांचे नाव माणिक वर्मांच्याइतके प्रसिद्ध झाले नाही, तरी जालावर त्या, नावडीकर, वाटवे, पोवळे यांनी सादर केलेला भावगीतांचा कार्यक्रम आहे. त्याचे दुवे खाली देतो, त्यावरून त्यांच्या गायकीचा आनंद घेता  येईल.