'वाई'च्या निमित्ताने

'मनोगत दिवाळी अंक २०११' मधील मीरा फाटकांच्या'वाई' वरील लेखाने अनेक संदर्भ मनात जागे झाले. अगदी लहानपणी 'वाईच्या तू गणराया जागराला या या, पसरणीच्या भैरीद्येवा जागराला या या' ह्या शाहीर साबळे यांनी गायलेल्या लोकगीतातून वाई आणि परिसराची ओळख झाली. त्या वेळी 'पसरणी' हे नाव अगदी वेगळं वाटलं होतं आणि 'पसर्णी' की 'पस्रणी' असाही गोंधळ झाला होता. नंतर वाई मनात ठसतच गेली. इतिहासात आधी अफ्जल्खान भेटला. मग माहुली आणि मेणवली यांची भेट झाली. नंतर हळूहळू तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीजी, विश्वकोश, प्राज्ञपाठशाळा, एकेक निमित्ताने वाई सतत भेटत राहिली. तर्कतीर्थांशी अनेक नामवंतांची चर्चासत्रं, गप्पाष्टकं, मैफली झडत. त्यांतल्या अनेकांनी वेळोवेळी त्या स्मृती आपल्या लेखनातून जागवल्या आहेत. त्यातूनही वाई उलगडत राहिली. नंतर कधीतरी वाईचे सुंदर घाट, देवळं, यांची देखणी रेखाचित्रं, जलरंगचित्रं पाहाण्यात आली. कृष्णामाईची पूजा, तिची ओटी भरणं याविषयी सतत काही उल्लेख वाचनात येतच राहिले.

कृष्णा-कोयनेविषयी मुळातच आकर्षण. 'कृष्णा मिळाली कोयनेला, तसंच माझं माहेर बाई येऊन मिळालं सासरला, ' या गाण्यातल्या या सुरुवातीच्या शब्दांचा प्रथम प्रथम अर्थबोध होत नसे. कोयना ही कृष्णेची उपनदी. कृष्णा मुख्य, कोयना दुय्यम. कृष्णा कशी कोयनेला येऊन मिळेल? पुढे कधीतरी समजलं की कोयनेचा पाणलोट कृष्णेपेक्षा मोठा. पण कोयनेने काहीही खळखळ न करता आपली जळं कृष्णेच्या त्या मानाने छोट्या पात्रात ओतली आणि तिला मोठं केलं. माहेरच्या मोठेपणाचा काहीही अभिमान न बाळगता ती अल्लाद कृष्णेमध्ये विरून गेली, आपली नावनिशाणीही मागे न ठेवता.

याच कोयनेविषयी पन्नास वर्षांपूर्वी  जन्मलेली एक किंवदंती ऐकायला मिळाली.जेव्हा कोयना धरण बांधायचं  ठरत होतं तेव्हा कर्नाटक सरकारने आक्षेप  घेतला की यामुळे कर्नाटकाला मिळणारं पाणी कमी होईल. तेव्हा म्हणे त्यांची समजूत काढण्यात आली की हे धरण मूळ कृष्णा नदीवर नसून तिच्या एका उपनदीवर आहे. त्यामुळे कर्नाटकाला फारसा फरक पडणार नाही. यातली गोम अशी होती की कोयनेचा पाणीसाठा कृष्णेपेक्षा अधिक होता! अर्थात यामुळे कर्नाटकातलं सर्वसामान्य जनमत अनुकूल करून घेण्यात यश मिळालंही असेल पण अभियंते, स्थापत्यविशारद, योजनाकार फसले असतील असं वाटत नाही. शेवटी किंवदंतीच ती.

काही शहरांचं वैशिष्ट्य असं असतं की ती आपण कधीही पाहिली नसली तरी साहित्यातून इतकी परिचित होतात की तिथे गेल्यावर अजिबात नवखं वाटत नाही. याचं श्रेय त्या शहरावर प्रेम करणाऱ्या आणि त्या विषयी आपुलकीने, भरभरून लिहिणाऱ्या तिथल्या साहित्यिकांना. यशवंत पाठकांच्या रसाळ लेखनातून नाशिक शहराचं अंतर्मन कळत जातं. कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांवर इतरांनी केलेल्या स्मृतिलेखनातूनही नाशिक उलगडत जातं. पु. भा. भावे, माडखोलकर यांच्या लेखनातून आणि त्यांच्याविषयींच्या आठवणींतून नागपूर समजत जातं. श्री.ज.जोशींच्या लिखाणातून त्यावेळच्या पुण्याचा चेहेरा समोर येतो. गुरुनाथ शेणईंच्या(कवीच्या नावाविषयी खात्री नाही. कविता मात्र आठवते.) 'आंबोली' कवितेतून एरवी चर्मचक्षूंना न दिसलेली आंबोली आरपार लख्ख दिसून जाते. प्रकाश संतांच्या लंपनकथांमधून एक वेगळंच बेळगाव प्रत्ययाला येतं.

साहित्यातून डोकावणारी ही शहरं कधीकधी प्रत्यक्षदर्शनापेक्षा अधिक मनोरम भासतात. पण स्थळदर्शनापेक्षा शहराची प्रकृती जाणून घेण्यात अधिक रस असलेल्या माझ्यासारख्याचा त्यामुळे अपेक्षाभंग होत नाही. कारण शोध भूगोलाचा असतोच,पण त्याहीपेक्षा अधिक, इतिहासाचा, संस्कृतीचा असतो.