चीज सॉसेज फ्राय

  • स्किनलेस चिकन सॉसेजेस अर्धा किलो
  • एक्स्ट्रा शार्प चेडर चीज पाव किलो
  • कांदे अर्धा किलो
  • हिरव्या मिरच्या दहा
  • टमॅटो सॉस (चार टेबलस्पून)
  • सोय सॉस (एक टेबलस्पून)
  • गार्लिक चिली सॉस (दोन टेबलस्पून)
  • तेल
४५ मिनिटे
दोन - तीन जणांना पोटभर

सॉसेजेस नेहमीच्या तपमानाला आणावीत. त्यासाठी ती फ्रीजरमधून काढून त्यावर कोमट पाणी घालावे. ते पाणी दोन-तीन वेळेस बदलावे.
तोंडलीचे करतो तसे (२-३ मिमी जाडीचे) सॉसेजेसचे काप करून घ्यावेत. हिरव्या मिरच्यांचेही तेवढ्याच जाडीचे काप करून घ्यावेत.
कांदा जाडसर चिरून घ्यावा.
चेडर चीजचे छोटे (दाण्याच्या आकाराचे) तुकडे करून घ्यावेत.
नॉन-स्टिक फ्रायपॅनमध्ये एक पळी तेल गरम करावे. ते धुरावल्यावर ज्योत बारीक करून हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. ते खरपूस झाले की ज्योत मोठी करून चिरलेला कांदा घालावा. तो गुलाबी झाल्यावर त्यात निम्मे चीज घालावे नि पटापट हलवावे. चीजच्या तारा सुटून त्या कांद्याला लागू लागल्या की सॉसेजेसचे काप घालावेत. सगळे एकजीव झाले की त्यावर टमॅटो सॉस, सोय सॉस आणि गार्लिक चिली सॉस घालून हलवावे. ज्योत बारीक करून झाकण ठेवावे नि एक दणदणीत वाफ आणावी.
एव्हाना सगळे मिश्रण एकजीव झालेले असेल. ज्योत मोठी करून त्यावर उरलेले चीज घालून हलवावे. ते वितळले की ज्योत बारीक करून दहा मिनिटे हलवत राहावे. मग खाली उतरवावे.
आवडत असल्यास वरून मिरपूड भुरभुरवावी.

येथे लिहिलेले सगळे पदार्थ पुण्यात 'दोराबजी'मध्ये मिळतात.
एक्स्ट्रा शार्प चेडर नुसते खायला जरा जड जाते. ते शिजवल्यावर त्याचा दर्प नाहीसा होतो.
हे मिश्रण ब्राऊन ब्रेडच्या टोस्टवर पसरवून घेतल्यास प्रत्येकी चार/सहा स्लाईसप्रमाणे तीन/दोन जणांचे जेवण होते.