भगवान बुद्धांचे भिक्षापात्र

(Original Alms-Bowl of Buddha)
इ.स.1880-81 मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन मुख्य, मेजर जनरल ए. बकिंगहॅम यांनी बिहारच्या उत्तर व दक्षिण भागांचा एक दौरा केला होता. या दौर्‍यात बकिंगहॅम यांनी त्या वेळेस बेसार (Besarh) या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका गावाला भेट दिली होती. हे गाव म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासातील प्रसिद्ध असलेले वैशाली नगर आहे हे बकिंगहॅम यांनी लगेच ओळखले होते. वैशाली येथे जरी बकिंगहॅम यांना फारशा पुराण वस्तू सापडल्या नसल्या तरी त्यांना वैशाली या स्थानी भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र पुरातन कालापासून जतन करून ठेवलेले होते अशी माहिती समजली. या भिक्षा पात्रा बद्दलची बरीच माहिती बकिंगहॅम यांनी संकलन करून ठेवलेली आहे.
बौद्ध कथांमध्ये या भिक्षा पात्राबद्दल अशी कथा दिलेली आहे की गौतमाला महाब्रम्हाने दिलेले मूळ भिक्षा पात्र, गौतमाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हा नाहीसे झाले. त्यामुळे इंद्र, यम, वरूण व कुबेर या चारी दिक्‍पालांनी पाचू पासून बनवलेली चार भिक्षा पात्रे बुद्धांना आणून दिली. परंतु भगवान बुद्धांनी ती घेण्याचे नाकारले. नंतर या दिक्पालांनी आंब्याच्या रंगाच्या दगडाची चार पात्रे बुद्धांना आणून दिली. कोणाचीच निराशा करायची नाही म्हणून बुद्धांनी ही चारी पात्रे ठेवून घेतली आणि त्या चार पात्रांपासून चमत्काराने एकच पात्र बनवून घेतले. चार पात्रांपासून हे भिक्षा पात्र बनवले असल्याने वरच्या कडेजवळ या चारी पात्रांच्या कडा या भिक्षा पात्रात स्पष्टपणे दिसत राहिल्या.
वैशाली गावाच्या ईशान्येला साधारण 30 मैलावर असलेले केसरिया हे गाव (बकिंगहॅमच्या मताप्रमाणे), मगध देशाच्या सीमेवर होते. भगवान बुद्धांच्या अखेरच्या कालात, वैशालीच्या लच्छवी लोकांनी या गावात बुद्धांचा निरोप घेतला होता. त्या वेळेस बुद्धांनी हे भिक्षा पात्र त्यांना परत पाठवताना, आपली आठवण म्हणून दिले होते. सुप्रसिद्ध चिनी प्रवासी फा-शियान (AD 400) व ह्युएन त्सांग किंवा शुएन झांग (AD 520) या दोन्ही प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनात ही आख्यायिका नमूद करून ठेवलेली आहे.या लच्छवी लोकांनी हे भिक्षा पात्र, वैशाली गावात मोठ्या आदराने जपून ठेवलेले होते. पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात, सम्राट कनिष्क किंवा त्याच्यानंतर गादीवर आलेला सुविष्क यापैकी कोणीतरी, हे पात्र आणि बुद्धाचा प्रसिद्ध चरित्रकार अश्वघोष, यांना वैशालीहून गांधार राज्यातील पुष्पपूर (पुरुषपूर, पेशावर) येथे मगध देशाचा युद्धात पराभव करून नेले. बौद्ध मुनी तारानाथ याच्या ग्रंथात, सम्राट कनिष्क याच्या कारकीर्दीमध्ये झालेल्या तिसर्‍या बौद्ध महासभेचे नियंत्रक, पार्श्व या बौद्ध मुनींचा अश्वघोष हा शिष्य असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
इ.स. नंतरच्या चौथ्या शतकात चिनी प्रवासी फा-शियान याने हे भिक्षा पात्र, गांधार देशाची राजधानी असलेल्या पुष्पपूर (पुरुषपूर, पेशावर) येथे बघितल्याचे नमूद केलेले आहे. मात्र या नंतर हे पात्र पेशावर येथून हालवले गेले कारण इ.स. नंतरच्या सहाव्या शतकात आलेले दोन चिनी प्रवासी शुएन- झांग आणि सॉन्ग युन या दोघांच्याही प्रवास वर्णनात हे पात्र बघितल्याचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. फा-शियान याच्या वर्णनात तिसर्‍या शतकामध्ये हे पात्र बाल्ख किंवा काबूल येथे नेण्यासाठी गांधार देशावर यू-चि या राज्याकडून मोठे परकीय आक्रमण झाल्याचा उल्लेख आहे. फा-शियान च्या भेटीनंतर गांधारवर परत एकदा हे पात्र मिळवण्यासाठी यू-चि राज्याकडून मोठे आक्रमण होणार अशी चिन्हे दिसू लागल्याने बहुदा AD 425-450 मध्ये गांधारच्याच लोकांनी हे पात्र अफगाणिस्तान मधील कंदहार शहराच्या जवळ असलेल्या ठिकाणी नेले व या ठिकाणाला आपल्या देशाचेच म्हणजेच गांधार असे नाव दिले. कालांतराने गांधारचे कंदाहार झाले. सध्या या ठिकाणाला 'जुने कंदहार' या नावाने ओळखले जाते. हे पात्र अगदी अलीकडे म्हणजे मोहंमद नसिबुल्ला याच्या कारकीर्दीपर्यंत कंदहार मध्ये होते व त्यानंतर ते काबूल येथील राष्ट्रीय संग्रहालयात हालवण्यात आले आहे. तालिबान राजवटीत अतिरेक्यांनी काबूल संग्रहालयावर 3 किंवा 4 वेळा तरी हल्ले चढवले होते. त्यातून हा ठेवा बचावला हे आपले सुदैव आहे असेच म्हणावे लागेल.
हे पात्र दिसण्यास आहे तरी कसे या बद्दलचे फा-शियान याने केलेले वर्णनच फक्त आज उपलब्ध आहे. फा-शियानच्या मूळ चिनी वर्णनाची तीन भाषांतरे आहेत. या तिन्ही भाषांतरात हे पात्र संमिश्र रंगाचे असले तरी प्रामुख्याने काळे आहे असे वर्णन आहे. त्याच बरोबर अंदाजे 8 किंवा 9 लिटर क्षमता असल्याचाही उल्लेख आहे. त्याच प्रमाणे चार कडा स्पष्टपणे दिसून येतात असाही उल्लेख आहे. मात्र हे पात्र अपारदर्शी आहे का पारदर्शक या बद्दल या तिन्ही वर्णनात मतभेद आहे. डॉ.बेल्यु या संशोधकाच्या वर्णनाप्रमाणे कंदाहार येथील (आता काबूल संग्रहालयात असलेले) भिक्षा पात्र हे गडद हिरवट, काळसर किंवा एखाद्या सापाच्या रंगाचे असून त्यावर अरेबिक भाषेतील सहा ओळी कोरलेल्या आहेत.
या दोन्ही वर्णनांवरून काबूल संग्रहालयातील भिक्षा पात्र मूळ पात्र असण्याची बरीच शक्यता वाटते. पात्राच्या तळाचा भाग एखाद्या कमळाच्या आकाराचा बनवलेला असल्याने हे पात्र बौद्ध कालातील असण्याची खूपच शक्यता आहे. त्यावर अरेबिक भाषेत असलेल्या ओळी नंतरही कोरलेल्या असू शकतात. त्याच प्रमाणे हे पात्र एवढे मोठे आहे की ते हातात घेऊन भिक्षा मागण्यास जाणे कोणासही शक्य नाही. त्यामुळे हे पात्र बहुदा आपल्या देवळात हुंडी किंवा दान पेटी जशी ठेवलेली असते तसे बौद्ध विहारात ठेवलेले असावे. त्या काळात भिक्षा ही धान्य,सोने या स्वरूपातच दिली जात असणार. त्यामुळे एवढे मोठे पात्र असणे असंभवनीय वाटत नाही.
भगवान बुद्धांच्या भिक्षा पात्राची ही कहाणी मोठी विलक्षण आहे हे मात्र कोणीही नाकारणार नाही.
25 डिसेंबर 2011
संदर्भ :-
1. Report of Tours in north and south Bihar in 1980-81 By Maj.General A, Cunningham
2. Fa-Xian's record of Buddhistic Kingdoms By James Legge
(कनिंगहॅम यांनी बनवून घेतलेले या पात्राचे रेखाचित्र व काबूल संग्रहालयातील पात्राचे छायाचित्र या दुव्यावर बघता येईल.)