मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा.

महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमध्ये या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही. नोकऱ्यांमध्येही अजून उच्चपदावर पुरुष अधिक संख्येने दिसतात.

कदाचित असे म्हणता येईल की वीस-तीस वर्षांपूर्वी जे सुशिक्षित झाले त्यांचेच प्रमाण उच्चपदस्थांत अधिक दिसेल. हाच युक्तिवाद थोडाफार एकंदरीत सुशिक्षितांच्या संख्येला लागू होतो. थोडक्यात पंचवीस तीस वर्षांपूर्वी जे खूपच अधिक संख्येने पुरुष शिकले ते व त्यांच्याबरोबर न शिकलेल्या स्त्रिया अजूनही लोकसंख्येमध्ये दिसतात. कदाचित आजची पिढी घेतली तर हे प्रमाण अधिक समसमान दिसेल. महाराष्ट्र हे भारतातले पुरोगामी राज्य. तेव्हा सध्याच्या मराठी पिढीत चित्र वेगळे दिसते का? ते शोधण्यासाठी मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला असे दिसले की मराठी इंटरनेटवर स्त्रिया आणि स्त्री-आयडींचे प्रमाण खूप कमी दिसते.   पुराव्यादाखल अलेक्सा. कॉम वरून घेतलेले हे स्टॅटिस्टिक्स पाहा.

मनोगतावर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणाऱ्या प्रमाणासारखेच आहे. मायबोलीवर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरेचे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅटस उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅटसपैकी मायबोलीच्या स्टॅटसमध्ये  Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅटसबद्दल Confidence: low आहे. पण या साईटसवर पाहिल्यास लॉगीन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच.

मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमध्ये शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइटसवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइटस पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?