मिरची ठेचा

  • कच्चे शेंगदाणे एक वाटी
  • सुके खोबरे एक वाटी
  • हिरव्या मिरच्या मध्यम (एक पेर) कातरलेल्या एक वाटी
  • लसूण एक गड्डी
  • लाल तिखट एक चमचा
  • मीठ चवीनुसार
४५ मिनिटे
गरजेप्रमाणे

शेंगदाणे आदल्या रात्री दुप्पट पाण्यात भिजत घालावेत. चारपाचदा पाणी बदलावे.
सुके खोबरे मध्यम किसून घ्यावे. लसूण सोलून घ्यावी.
शेंगदाण्यांतले पाणी निथळवून कोरडे करून घ्यावे.
सोललेली लसूण ठेचून घ्यावी.
तापलेल्या लोखंडी तव्यावर शेंगदाणे आंच कमजास्त करीत खरपूस भाजावेत. चटचटू लागल्यावर आच कमी करून किसलेले सुके खोबरे घालावे आणि हलवत राहावे. हळूहळू खोबऱ्याचे तेल सुटू लागेल. खोबऱ्याचा रंग बदलेस्तोवर परतावे आणि गॅस बंद करून खोबरे-दाणे ताटलीत उतरवावे.
तोच तवा मोठ्या ज्योतीवर गरम करून त्यावर ठेचलेली लसूण घालून ज्योत बारीक करावी आणि लसूण खरपूस भाजून घ्यावी. त्यात कातरलेल्या मिरच्या घालून ज्योत मोठी करावी आणि जळकटल्याचा वास येईस्तोवर परतावे. ज्योत बंद करून लाल तिखट नि मीठ घालून नीट मिसळावे. तवा थंड होईस्तोवर थांबावे.
हे मिश्रण आणि ताटलीत उतरवलेले खोबरे-शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

हा ठेचा बिनतेलाचा असल्याने कुणाला दुःख होत असेल तर त्यावर (ठेच्यावर; दुःखावर नव्हे) गोडेतेलाची जिवंत फोडणी  घालावी.