ठ्ठो

              रंगमंचावर नाटक सुरू होते. खरे तर संपायला आले होते. शेवटचा प्रवेश सुरू होता. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. गरीब प्रियकराला नकार देऊन प्रेयसीने दुसऱ्याच श्रीमंत तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.रंगमंचावर दोघेही समोरासमोर आले होते. संतापलेला प्रियकर प्रेयसीला गोळी घालून तिची हत्या करतो व तिथेच नाटक संपते असा तो प्रवेश होता. प्रेयसीवर पिस्तूल रोखून संतापलेला प्रियकर तिचा उद्धार करीत आहे.प्रेयसी भीतीने थरथर कापत आहे. "तू प्रेमाच्या नावाला कलंक आहेस. मी तुझ्यावर जिवापाड प्रेम केले, पण तू श्रीमतीला भुललीस . तुझा धिक्कार असो. तुला जगण्याचा काडीचा अधिकार नाही. चल, मरायला तयार हो."असे संवाद म्हणून तो पिस्तुलाचा चाप ओढतो.

             आता ह्या क्षणी ठ्ठो असा आवाज होऊन प्रेयसी खाली कोसळणे अपेक्षित आहे. पूर्वी नाटकात असा ठ्ठो आवाज पडद्यामागचा एखादा सहकलाकार फटाका फोडून निर्माण करीत असे.आता ह्या मोक्याच्या क्षणी काही कारणास्तव(सहकलाकार झिंगून पडला आहे.) पडद्यामागून काही ठ्ठो आवाज येत नाही,प्रेयसी खाली कोसळत नाही व त्यामुळे नाटक काही संपत नाही. प्रियकराचे काम करणारा कलाकार कसलेला नट आहे. तो पुन्हा  संवाद म्हणतो,पिस्तूल रोखतो, व चाप ओढतो, तरीही पडद्यामागून काही आवाज येत नाही. आता तो मनोमन वैतागतो. रंगमंचावरील मांडणीत एक टेबल, त्यावर काही फळे व एक फळे कापण्याचा चाकू असतो.

              तो कसलेला नट क्षणार्धात निर्णय घेतो. पिस्तूल भिरकावून देतो,चाकू हातात घेतो व पुन्हा संवाद टाकतो. "तुझ्यासारख्या दगाबाज मुलीसाठी पिस्तुलाची गोळी खर्च करणेही पाप आहे. थांब, ह्या चाकूनेच मी तुझा खातमा करतो. हो मरायला तयार. " प्रेयसीचे काम करणारी नटीही कसलेली कलाकार आहे. बदललेला प्रसंग ती समजून चुकते. प्रियकराने चाकू  तिच्या पोटापर्यंत पुढे केल्यावर तो अलगद दोन्ही हाती धरून खाली कोसळायचे आहे, हे तिच्या ध्यानात येते.

                प्रियकर आवेगात पुढे होतो. चाकूने प्रेयसीच्या पोटावर "वार" करतो............

               आणि................

               त्याच क्षणी पडद्यामागे जोरदार   ठ्ठो असा आवाज होतो व संपूर्ण नाट्यगृह हास्यकल्लोळात बुडून जाते.

           (हा किस्सा ८-१० वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात वाचला होता. मनोगतवर शेअर करावासा वाटला म्हणून हा

लेखनप्रपंच.)